विद्यार्थ्‍यांच्‍या गुणवत्‍तेसाठी शैक्षणिक साहित्‍याचा वर्गात प्रत्‍यक्ष वापर करावा -अशोक काकडे,जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, October 15, 2019

विद्यार्थ्‍यांच्‍या गुणवत्‍तेसाठी शैक्षणिक साहित्‍याचा वर्गात प्रत्‍यक्ष वापर करावा -अशोक काकडे,जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी


नांदेड :
विद्यार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक गुणवत्‍तेत वाढ होण्‍याच्‍या उद्देशाने जिल्‍हयातील सर्व जिल्‍हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्‍यांचा पुरवठा करण्‍यात आला आहे. परंतु अनेक शाळांमध्‍ये या साहित्‍याचा वापर होतांना दिसत नाही, ही गं‍भीर बाब असून विद्यार्थ्‍यांच्‍या  गुणवत्‍तेसाठी शैक्षणिक साहित्‍याचा वर्गात प्रत्‍यक्ष उपयोग करुन अंमलबजावणी करण्‍याचे निर्देश जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत.


     शुक्रवार दिनांक 11 आक्‍टोबर रोजी नांदेडच्‍या ईतवारा भागातील जिल्‍हा परिषद हायस्‍कूल उर्दू माध्‍यम शाळेस मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी तपासणी करुन विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक नईम कुरेशी, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, डायटचे अभय परिहार, अतुल कुलकर्णी व नवील शेख यांची उपस्थिती होती.

     सकाळी सव्‍वा आकरा वाजता शाळेत मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे पोहोचले तेव्‍हा मुख्‍याध्‍यापिका हजर नसल्‍याचे दिसून आले. त्‍यांनी हजेरीपटावर स्‍वाक्षरी केली होती. त्‍यांना शाळेत फोन करुन बोलावण्‍यात आले. त्‍यांनी शाळेत पूर्णवेळ म्‍हणजेच सकाळी दहा ते पाच या वेळेत दोन्‍ही सत्रामध्‍ये उपस्थित राहणे अपेक्षित आहे. उर्दूचे सकाळ सत्रातील इयत्‍ता पाचवी ते सातवीचे हजरीपट व गोषवारा रजिस्‍टरमध्‍ये 90 पैकी 75 विद्यार्थी उपस्थित असल्‍याचे दर्शविलेले होते. परंतु प्रत्‍यक्षात तपासणीमध्‍ये फक्‍त अकरा विद्यार्थीच उपस्थित असल्‍याचे आढळून आले. 64 विद्यार्थी हजेरी पटावर उपस्थित असल्‍याचे खोटे दर्शविण्‍यात आले. इयत्‍ता पाचवी ते सातवीतील उपस्थित विद्यार्थ्‍यांना गणित विषयाचे प्रश्‍न विचारले असता. 11 पैकी 3 विद्यार्थ्‍यांना उत्‍तरे देता आली. भाषेबाबत वाचन करुन घेण्‍यात आले तेव्‍हा बहुतांश विद्यार्थ्‍यांना वाचन केलेल्‍या वाक्‍याचा अर्थ सांगता आला नाही. उर्दू शब्‍दांचे वाचन अनेक विद्यार्थ्‍यांना जमलेले नाही. इयत्‍ता पाचवी ते सातवी वर्गाच्‍या विद्यार्थ्‍यांना गणित आणि उर्दूचे शिक्षण प्राप्‍त नाही याबाबत त्‍यांनी या आधीच्‍या शिक्षकांनी शिकवले नसल्‍याचे शिक्षक वारंवार सांगत होते.

दुपारच्‍या सत्रात इयत्‍ता दहावी उर्दू माध्‍यमाचे फक्‍त 8 विद्यार्थी उपस्थित होते. वर्गातील मागच्‍या बाकांवर मोठया प्रमाणात धुळ दिूसन आली. मुख्‍याध्‍यापिका ह्या इयत्‍ता आठवी ते दहावी वर्गास गणित हा विषय शिकवितात. शाळा तपासणी वेळी डायटचे अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्‍यांना गणिताच्या पाठयक्रमातील दुस-या धडयातील प्रश्‍न विचारले असता विद्यार्थ्‍यांना उत्‍तरे देता आली नाहीत. 8 पैकी 2 विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्‍यांना इंग्रजी वाक्‍यांचा अर्थ सांगता आलेला नाही.

      शालेयस्‍तरावर विद्यार्थ्‍यांच्‍या गुणवत्‍तेसाठी गणित व भाषा विषयाचे शैक्षणिक साहित्‍याचा पुरवठा एप्रिल महिन्‍यात करण्‍यात आला. या शाळेस देखील शैक्षणिक साहित्‍याच्‍या चार पेटया देण्‍यात आल्‍या. त्‍यापैकी तीन पेटयांचे कुलूप व सील आजपर्यंत शाळेने उघडलेले नाही. एका पेटीचे फक्‍त सील उघडलेले होते. परंतू आतील शैक्षणिक साहित्‍य तसेच पडून होते. जून महिन्‍यापासून अध्‍यापनासाठी या साहित्‍याचा वापर विद्यार्थ्‍यांसाठी करणे अपेक्षीत होते. पण या शाळेत शैक्षणिक साहित्‍याचा उपयोग होतांना दिूसन आलेला नाही.

तसेच शालेय विद्यार्थ्‍यांना वाचनाची गोडी निर्माण व्‍हावी यासाठी शाळेस ग्रंथलयासाठी निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात येतो. परंतू सन 2015 पासून वाचनालयातील पुस्‍तके वाटप करण्‍यात आलेली नाहीत. अत्‍यंत सोपी व उपयुक्‍त मराठी भाषेतील पुस्‍तके या शाळेत असूनही ग्रंथालयातील ही पुस्‍तके विद्यार्थ्‍यांना वाचनासाठी देण्‍यात आली नाहीत. या शाळेत उर्दू माध्‍यमाचे विद्यार्थी असूनही वाचनालयात उर्दू माध्‍यमाची पुस्‍तके नाहीत. ही पुस्‍तके घेण्‍यासाठी शाळेस अनुदान यापूर्वीच देण्‍यात आले आहे.

      मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी शाळा भेटी दरम्‍यान शाळेतील केलेल्‍या अक्षम्‍य दूर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली. विद्यार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक गुणवत्‍तेसाठी शैक्षणिक साहित्‍याचा वापर होणे आवश्‍यक आहे. दिवाळी सुटी दरम्‍यान जादा तासीका घेवून दहावीच्‍या विद्यार्थ्‍यांना शिकवावे व इयत्‍ता द‍हावीचा निकाल 100% लागण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांना प्रश्‍नपत्रिका सोडविण्‍याचा सराव घेण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. वाचनालय सुरु करुन आठवडयातून किमान एक तास विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या पसंतीचे पुस्‍तके वाचण्‍यासाठी देण्‍यात यावे असे त्‍यांनी सांगितले. गट शिक्षणाधिकारी, विस्‍तार अधिकारी शिक्षण व केंद्र प्रमुख यांनी शाळा भेटी दरम्‍यान सूचना देण्‍यापेक्षा प्रत्‍यक्ष अंमलबजावणी करुन घेणे अपेक्षीत असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगीतले. प्रत्‍यक्ष अंमलबजावणी न केल्‍यास या शाळेतील मुख्‍याध्‍यापक व शिक्षकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News