किनवट :
विश्वरत्न, अर्थतज्ज्ञ, पत्रकार,जलतज्ज्ञ, कायदेपंडीत, स्त्री उध्दारक, कामगारमसिहा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संगीताचे उपासक होते. दिल्लीवरून मुंबईला दिलेल्या वेळेवर पोहचून पंडीत बाळासाहेब साठे यांचेकडे त्यांनी व्हायोलीन वादन शिकले. अशा ह्या संगीत प्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना " एक संध्या निळ्या पाखरांची " ह्या संगीतम आदरांजली कार्यक्रमाने ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता किनवट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात महानायकास अभिवादन करण्यात आले.
जगत् विख्यात गायक पंडीत सुरेश वाडकर यांचेकडून गौरविलेले प्रज्ञाचक्षू कलावंत अनिल उमरे यांच्या ' यमन ' रागातील ' धम्मदीप हा मानवतेचा... ' या वंदन गीताने क्रार्यक्रमास प्रारंभ झाला. वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी ' मिश्र ' रागातील 'कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले.. ' हे महाकवि वामनदादा कर्डक यांचे संदेश गीत व ' एक संध्या निळ्या पाखरांची... ' हे पद गाऊन रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. शाहीर नरेंद्र दोराटे यांनी ' सागर किनारीची चैत्यभूमी पाहिली... ' हे ' तार सप्तकात ' गीत गाऊन भीमानुयायांची थंडी पळवली.
उदयोन्मुख गायक भिमराव पाटील यांनी ' भिमरायावरी कसा दृष्ट काळ आला... ' व गजानन पंडीत( हदगाव ) यांनी वामनदादांचे ' जरी संकटाची काळरात होती ... ' हे ' तर्कनिष्ठ ' गीत तयारीनिशीगाईले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ' जोग ' रागातील तुझ विन भिमा संसार सुना ... ' ही काव्यमयी रचना प्रा.सुरेश पाटील यांना गाईली. अनिल उमरे यांनी 'भिमाईची याद येते.. ' व ' माझ्या सवे जगाया... ' या ' दरबारी कानडा ' रागातील गीताने कार्यक्रमाचा समारोप केला. ऐतिहासिक संदर्भ देत उत्तम कानिंदे यांनी बहारदार निवेदन केले. आयोजक किशन परेकार यांनी आभार मानले. सिंथोसायझर अनिल उमरे, तबला व्यंकटेश मुंडावरे, ढोलकी साहेबराव वाढवे व सुनिल चोपडे (लातूर ) यांनी साथ -संगत करून कार्यक्रमात रंगत आणली.
भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे, सावित्रीबाई फुले विचार मंचच्या संस्थापिका प्राचार्या शुभांगीताई ठमके, अखिल भारतीय बौध्द उपासक संघाचे राज्य सचिव ऍड. मिलिंद सर्पे, गर्जे जयभीमचे संस्थापक दीपक ओंकार, गीतकार सुरेश शेंडे, क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे रमेश मुनेश्वर, दिलीप भगत, रिपाईंचे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार,मल्लूजी येरेकार, गंगूबाई परेकार, राजू येरेकार, शुक्रलता येरेकार, ऍड. सचिन येरेकार, बौध्दाचार्य पेंटर अनिल उमरे, युवा पँथरचे निखिल कावळे, पवन सर्पे, विजय वाठोरे, जीवन लाठे आदी मान्यवरांसह बहुसंख्य संगीतप्रेमी रसिकांनी कार्यक्रमास हजेरी लावली होती.




No comments:
Post a Comment