संविधान -दंगलकार नितीनदादा चंदनशिवे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, December 5, 2019

संविधान -दंगलकार नितीनदादा चंदनशिवे



महानायकाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी- दंगलकार नितीनदादा चंदनशिवे यांची संविधानाचे महत्व सांगणारी  जबरदस्त कविता
-संपादक

  संविधान

त्यांनी माझ्या हातात
कुराण दिलं आणि म्हणाले,
ये आमच्या धर्मात
हे कुराण एकदा वाच
मी उपाशी होतो
मला भूक लागली होती
मी मागणार होतो पोटासाठी दोन घास
नाही मागता आलं
बाजूला आई उभी होती..

थोड्या वेळाने दुसरे आले
त्यांनी मला बायबल दिलं
म्हणाले आमच्यात ये
हे बायबल एकदा वाच
मी उपाशी होतो 
मला भूक लागली होती
मागणार होतो पोटाला दोन घास
नाही मागता आलं 
बाजूला आई उभी होती..

पुन्हा जरा वेळाने
तिसरे कोणीतरी आले
माझ्या हातात गीता दिली
म्हणाले आमच्या धर्मात ये
अगोदर गीता वाच....
मला भूक लागली होती
मागणार होतो पोटाला दोन घास
नाही मागता आलं
बाजूला आई उभी होती..

असे कित्येक येऊन गेले
धर्मग्रंथ देऊन गेले
धर्मप्रसारकाना भूक कळलीच नाही..

ग्रंथांच्या नुसत्या ओझ्यानीच
कंबर वाकली माझी
आणि खोल खोल नजरेतून
आईकडे पाहिलं तेव्हा,
ती डोळं पुसत बाहेर गेली
आणलं दोन भाकरीचं पीठ
भिक मागून

तेव्हा चूल कशी पेटवावी?
हा प्रश्न भयंकर वाटला
कारण भाकरीच्या पिठापेक्षा लाकडं महाग झाली होती...

आईने घातले सगळेच धर्मग्रंथ चुलीत..
आणि पेटलेल्या चुलीवर
दोन भाकरी भाजल्या...
तेव्हा,
एवढंच कळलं मला
या धर्मप्रसारकाना माझी भूक दिसली नाही
पण या ग्रंथांनी मला भाकरी भाजून दिली....
पोटभरून जेवलो
तेव्हा,
आईनं दडवून ठेवलेलं एक पुस्तक हातात दिलं
आणि म्हणाली फक्त एवढंच वाच...

त्यावर लिहलं होतं
भारताचे संविधान.....
मी वाचायला सुरवात करणार तेवढ्यात
एक प्रश्न मनात आला
अडाणी आईला वाचता येत नाही
मग हा ग्रंथच कसा तिनं जपून ठेवला बरं?

मी विचारले आईला याचे उत्तर
तेव्हा ती म्हणाली,
परवा हे बी मी चुलीत घालून पाहिलं
पण बाळा याला आग लागलीच नाही

सगळं वाचलं
तेव्हा कळलं,
आभाळाकडे बोट केलेल्या
या महामानवाने आमची भूक
समजून घेणारं
आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारं
हे संविधान 
लिहिलं....
हेच वाचलं पाहिजे.
म्हणजे मला माणूस होता येईल.

-दंगलकार नितीन सुभाष चंदनशिवे
मु.पो.कवठेमहांकाळ.
जि. सांगली..

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News