"शिक्षणसम्राट डॉ. बाबासाहेब आंबेडकर.... -सुरज पी. दहागावकर,चंद्रपूर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, December 5, 2019

"शिक्षणसम्राट डॉ. बाबासाहेब आंबेडकर.... -सुरज पी. दहागावकर,चंद्रपूर



अभ्यासू, स्वाभिमानी, अनेक पदव्यांचा एकनिष्ठ साधक, लोकहितदक्ष महानायक, न्यायाचा रक्षक, अन्यायाचा निर्भय शत्रू, मानवतेचा मित्र, बहुजनांचा भाग्यविधाता, स्त्रियांचा कैवारी, विघातक रुढींचा विध्वंसक, धुरंधर राजकारणी, भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार, दूरदृष्टीचा विचारवंत, प्रभावी वक्ता, विविध ग्रंथांचा नित्य वाचक, बहुभाषिक भाषाप्रेमी अशा बहुविध गुणरूपी अलंकारांनी विभूषित असलेल्या राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या शैक्षणिक दृष्टीवर 'सुरज पी. दहागावकर,चंद्रपूर ' यांनी टाकलेला दृष्टीक्षेप 
-संपादक


       आज केवळ भारत नव्हे तर, जगभरात या महामानवाने आपल्या आयुष्यात केलेल्या कार्याचा आणि लिहून ठेवलेल्या ज्ञानभांडाराचा आधार घेतला जातो. देशाच्या एकुणच जडणघडणीवर नजर टाकता या महामानवाच्या नावाला टाळून पूढे जाणे अशक्य आहे. जगभ्रमंती, वाचन आणि व्यासंग यांचा प्रचंड मोठा आवाका, समाजव्यवस्थेची पक्की जाण आणि त्यातील बदलांचे पक्के आणि निर्णायक उपाय या सर्वांचे एकत्रीत मिश्रण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.....

          अभ्यासू, स्वाभिमानी, अनेक पदव्यांचा एकनिष्ठ साधक, लोकहितदक्ष महानायक, न्यायाचा रक्षक, अन्यायाचा निर्भय शत्रू, मानवतेचा मित्र, बहुजनांचा भाग्यविधाता, स्त्रियांचा कैवारी, विघातक रुढींचा विध्वंसक, धुरंधर राजकारणी, भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार, दूरदृष्टीचा विचारवंत, प्रभावी वक्ता, विविध ग्रंथांचा नित्य वाचक, बहुभाषिक भाषाप्रेमी अशा बहुविध गुणरूपी अलंकारांनी विभूषित असूनही फक्त अस्पृश्य जातीमध्ये जन्म झाला म्हणून लहानपणी वर्गात बसू दिले जात नव्हते हि गोष्ट मनाला छेद करणारीच होती...

           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर ज्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत, त्या पदव्यांकडे नजर जरी टाकली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रचंड जगमान्य विद्वता लक्षात येते. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्चशिक्षण मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या संस्थांमधून घेतले आहे. त्यांनी इ.स. १९१२ मध्ये एलफिस्टन कॉलेज मुंबई मधून बी.ए., इ.स. १९१५ मध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून एम.ए. आणि इ.स. १९१७ मध्ये पी.एचडी., इ.स. १९२१ मध्ये लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मधून एम.एस्‌‍सी., इ.स. १९२२ मध्ये ग्रेज इन लंडन येथून बार-ॲट-लॉ, इ.स. १९२३ मध्ये लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मधून  डी.एस्सी., इ.स. १९५२ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून एल्‌एल.डी., इ.स. १९५३ मध्ये उस्मानिया विद्यापीठातून डी.लिट अशा एकापेक्षा एक श्रेष्ठ पदव्या प्राप्त केल्या.....

             वर्णवादी व्यवस्थेच्या नियमानुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. केवळ उच्च जातींच्या लोकांचा शिक्षण क्षेत्रावर मक्तेदारी होती. त्यामुळे कनिष्ठ जातीच्या लोकांना शिक्षण घेण्याची बंदी असल्याने माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारून त्याच्यातील क्षमता मारून टाकण्यात आली होती. शिक्षण नसल्यामुळे अस्पृश्य कनिष्ठ जातींची स्थिती गुलामापेक्षाही भयंकर झाली होती....

          कनिष्ठ जातीतच जन्मलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित होते. त्यामुळे बाबासाहेबांना शिक्षणाचे महत्व कळले होते. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल हे त्यांनी ओळखले म्हणून त्यांनी अश्या शोषित,पीडित,गुलाम असलेल्या जातीमध्ये शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून अनेक क्रांतिकारी पावले उचलली.....

           विद्यार्थी आणि शिक्षण यांचा अतूट संबंध आहे. पण शिक्षण हे सामाजिक परिस्थितीला अनुकूल नसेल, उच्चतम जीवन मूल्ये त्यातून शिकवली जात नसेल तर असे शिक्षण हे समाजाच्या उन्नतीसाठी धोकादायक ठरू शकते. शिक्षण हे दुधारी तलवारीसारखे आहे. त्यामुळे शिक्षणाचा उपयोग अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठविण्यासाठी केला जाऊ शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६ मे १९२९ साली दिलेल्या भाषणात स्पष्ट करतात की, *"प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे."* त्यामुळे बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ (अ) आणि अनुच्छेद ४५ नुसार ६ ते १४ वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्याची तरतूदच केली होती पण दुर्दैवाने आजपर्यत भारतीय संविधानाची १००% अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.....
   
           पुणे येथे भरलेल्या ११ व्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनात केलेल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, *"मी आजन्म विद्यार्थी आहे"* पुढे बोलतांना विद्यार्थ्यांनो नुसते शिक्षण घेऊ नका तर, पुढारलेल्या जातीपेक्षा सरस सिद्ध व्हाल असे शिक्षण घ्या. कारण पुढारलेल्या जातीच्या लोकांशी स्पर्धा करून तेथे बुद्धीचा प्रभाव पाडल्याशिवाय नुसत्या शिक्षणाचे चीज होणार नाही. ज्या प्रमाणे हजारो वर्षापासून तुमच्या बापजाद्यांना त्यांनी दाबले तसेच ते तुम्हाला दाबल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तुम्ही जे शिक्षण घेता ते असे घ्या की त्यामुळे आपले सर्व विद्यार्थी सरस झाले पाहिजेत.....

            हजारो वर्षापासून शिक्षण क्षेत्रात उच्चवर्णीयांनी आपली मक्तेदारी निर्माण केली होती. आणि यामुळेच देशातल्या शोषित,पीडित समाजाची दशा गोठ्यात बांधलेल्या ढोर-मेंढरासारखी झाली होती. हि भयानक परिस्थिती बदलायची असल्यास "शिक्षण" हे एकमेव शस्त्र आहे हे बाबासाहेबांनी ओळखले होते त्यामुळे "मुकनायक" वृत्तपत्राच्या ०९ ऑक्टोबर १९२० च्या "उन्नतीचे साधन" या संपादकीय लेखात *"अस्पृश्यांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही"* असे ठळकपणे डॉ.बाबासाहेबांनी नमूद केले होते......

         स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय तत्त्वावर आधारित समाजरचना घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली. बाबासाहेबांनी संविधानाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरून केलेली कामगिरी आणि त्यांची संविधान सभेतील सर्व कलमांवर केलेली भाषणे म्हणजे या देशाचे भवितव्यच होते. त्यामुळे त्यांचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून गुणगौरव केला जातो......

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रचंड ज्ञान, त्यांचे वाचन, चिंतन, लेखन आणि वक्तृत्वामधील विविधांगी व्यासंग बघितल्यावर त्यांच्या तोडीचा असा चौफेर बुद्धिमान माणूस शोधूनही सापडणार नाही.....

सुरज पी. दहागावकर,
चंद्रपूर
(८६९८६१५८४८)

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News