नांदेड :
स्वसरंक्षणासह आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी किशोरवयीन मुलींना 'स्मार्ट गर्ल' प्रशिक्षणातून धडे दिले जात आहेत, त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलांसाठी देखील 'स्मार्ट बॉय ' उपक्रम राबवून त्यांच्यावर योग्य संस्कार रुजवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी केले.
लोहा तालुक्यातील दगड सांगवी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी दोन दिवशीय स्मार्ट गर्ल प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. गट शिक्षणधिकारी रविंद्र सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे सचिव बन्सीधर फाजगे, प्राचार्य मोहनराव फाजगे, जिल्हा परिषदेचे मिलिंद व्यवहारे, विशाल कदम, सरपंच संतराव ढवळे, उपसरपंच श्रीधर फाजगे, केंद्र प्रमुख वैजनाथ सिध्दुसरे, प्रभाकर कदम, प्रशिक्षिका पल्लवी चौंडेकर, प्रिया पारसेवार आदींची मंचावर उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, इयत्ता सातवी ते दहावीच्या वर्गातून मुलांवर शिक्षणासह चांगले संस्कार होण्याची गरज आहे. मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येक शाळेतून प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. परंतू मुलांनी देखील मोठयांसोबत कसे वागावे, शाळेत मुलां-मुलींसोबत कसे रहावे, घरी व समाजात वावरतांना कसे वागावे. याचे शिक्षण देण्यासाठी स्मार्ट बॉय सारखा उपक्रम शिक्षण विभागाने हाती घेतल्यास स्मार्ट गर्ल सारखे प्रशिक्षण घेण्याची गरज भासणार नाही. मुलींनी शाळा-महाविद्यालयात समुहाने राहणे आवश्यक आहे. एकदा वाईट प्रसंग ओढावला तर ती घटना आईला सांगावी. कारण आपली आई हीच आपली खरी मैत्रीण असते. वेळे प्रसंगी पोलीसात तक्रार देवून कायद्याचा आधार घ्यावा असेही जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर म्हणाल्या.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या वतीने उपस्थितांचा शॉल व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. यावेळी गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांनी स्मार्ट गर्ल प्रशिक्षणाची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मोहनराव फाजगे यांनी केले. राजू सूर्यवंशी यांनी सुत्रसंचालन केले ; तर एस.आर. कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला पोलीस पाटील शिवाजी फाजगे, रामरावजी देवकत्ते, प्रदीप पाटील फाजगे, पंडीतराव फाजगे, उत्तमराव फाजगे, गोविंदराव फाजगे, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी, पालक व गावकरी यांची उपस्थिती होती.





No comments:
Post a Comment