किनवट :
युवकांनी समाजाच्या प्रश्नांकडे संवेदनशीलपणे पाहावे व आपल्या प्रतिभेचा वापरकरून साहित्यात मांडावे असे प्रतिपादन कवी व गीतकार प्रा. डॉ. विनायक पवार (पेन, जि. रायगड ) यांनी केले.
येथील सरस्वती महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने लेखक आपल्या भेटीला उपक्रम व सत्कार समारंभाचे शनिवारी ( दि. 28 ) आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यर्थ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. प्राचार्य डॉ. आनंद भंडारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष अनिल भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे प्रा.डॉ. पवार म्हणाले, कविमन हळवे असते ; पण त्यातून समाजाचे प्रश्न मांडले गेले पाहिजे. तरुणपणी आपल्या आयुष्याचे स्वप्न पाहत असताना जाणिवेची ज्योत मात्र सतत तेवत ठेवली पाहिजे. त्यातूनच आपल्याला जीवनाचा मार्ग सापडेल. यावेळी त्यांनी आपल्या अनेक रचना सादर करून तरुणाईला लेखनाची वैशिष्ट्ये सांगितली. प्रारंभी संविधानप्रत देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. अनिल भंडारे यांनी 'फिटे अंधाराचे जाळे ' हे गीत सादर केले.
विद्यार्थ्यांच्या मनात जाणिवेचे, विचारांचे बीजारोपण व्हावे यासाठी विचारवंत व लेखकांना बोलावून असे उपक्रम महाविद्यालयात राबविण्यात येतात असे अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. भंडारे यांनी सांगितले. मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. द्वारकाप्रसाद वायाळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा.डॉ सुनील व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मनोहर थोरात यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment