नांदेड:
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्हयात शौचालय बांधकामे मोठया प्रमाणात करण्यात येत असून स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचीत अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी जिल्हयातील विविध विकास कामांचा ध्यास घेतला असून जिल्हयात चालू असलेल्या विविध कामांचा त्यांनी खाते प्रमुखांकडून आढावा घेण्यास सुरवात केली आहे. ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी त्यांनी स्वच्छतेच्या कामाकडे अधिक लक्ष देण्याचे ठरविले आहे. यासाठी गावस्तरावर जनजागृती व विविध अभियान हाती घेवून उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगीतले.
सन 2012 मध्ये शौचालय बांधकामासाठी पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले होते, त्या सर्वेक्षणातील सर्व शौचालयाच्या बांधकामाचे उदिष्ट पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणात सुटलेल्या लाभार्थ्यांना देखील शौचालयाची सुविधा देण्यात येत आहे. ही कामे देखील प्रगतीपथावर असून ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. एप्रिल 2020 पासून जणगणनेच्या कामाला सुरवात होणार आहे. या सर्वेक्षणात ग्रामीण भगातील सर्व कुटूंबांकडे वापरातले शौचालय असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी स्वच्छता अभियानात पुढाकार घेवून शौचालय बांधकाम करण्यासाठी नागरिकांना प्रर्वत करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी गावस्तरावर धार्मीक स्थळे, समाज मंदीर, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत व गावस्तरावरील सार्वजनिक ठिकाणांसह परिसराची स्वच्छता करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी आठवडयातून एक दिवस गावासाठी या अभियानातून गावात स्वच्छता केली जाणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरी, महिला बचत गटाच्या कॉर्नर बैठका, शालयेस्तरावर चित्रकला, रांगोळी आदी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. मासिकपाळी व्यवस्थानासाठी इयत्ता आठवी ते बरावीच्या विद्यार्थींनींसाठी प्रशिक्षण घेतले जाणार आहे. यासाठी अंगणवाडी कार्यकर्ती, शिक्षीका व आशा वर्कर यांचा सहभाग घेतला जाणार आहे. तरी गावस्तरावर कायम स्वच्छता राहण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहभागी होऊन स्वच्छतेचे विशेष अभियाना यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment