किनवट:
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, कमठाला येथे सावित्रीमाई फुले जयंती निमित्त केंद्रांतर्गत कार्यरत सर्व महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी खुडे तर प्रमुख पाहुण्या म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा श्रीमती बेबीताई बडेवाड उपस्थित होत्या.
प्रारंभी सावित्री माई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले. त्यानंतर स्त्रीमुक्ती दिन तथा बालिका दिनानिमित्त केंद्रामध्ये कार्यरत सावित्रीच्या लेकी महिला शिक्षिकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमाचं औचित्य साधून या शाळेतून याचवर्षी बदली झालेल्या शिक्षिका क्रांती सिरमनवार यांना निरोप देण्यात आला.
यानंतर सावित्री माई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनकार्यावर रोहिदासतांडा येथील महाराष्ट्र शासन राज्यपुरस्कारप्राप्त शिक्षिका शालिनी सेलूकर यांनी व लोणी येथील मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी यांनी आपले विचार मांडले.
शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सावित्री माईंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. सातवीतील शुभांगी बडेवाड व शुभांगी तवरकर व सहावीतील कांचन भोयर या विद्यार्थीनींनी केलेल्या भाषणांनी सर्वांची ह्रदये काबीज केली.
मुख्याध्यापक शरद कुरूंदकर यांनी प्रास्ताविक केले. रोहीदासतांडा शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत शेरे यांनी सूत्रसंचालन केले. अंकुश राऊत यांनी आभार मानले. यावेळी लोणीच्या विद्या श्रीमेवार , शाहीन गुलाबबेग, गणेशपूर जूने येथील उर्मिला परभणकर, गणेशपूर नवे येथील प्रेमिलाताई जाधव, झेंडीगुडा येथील अनुसया वाकोडे, कमठाला येथील धनरेखा सांगवीकर, भारती देवकते उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment