नांदेड :
भाषा ही माणसं जोडण्याचे माध्यम आहे .सध्याच्या स्फोटक सामाजिक परिस्थितीत मराठी भाषेचे साहित्य माणसातील दरी सांधण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहे. मराठी साहित्य परंपरेतील संत ज्ञानेश्वर ते संत तुकारामांचा प्रवास हा विवेकशील समाज निर्माण करणारा जागर आहे. त्यामुळे मराठी सारस्वतांनी सर्व मराठी माणसांनी माणसं जोडण्याचे काम हाती घ्यावे. माणूस म्हणून जात पंथाच्या आधारावरील भेद दूर करून समग्र विवेकी मानवी समाज निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन लेखक डॉ. विलास ढवळे यांनी आज केले .
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन महाराष्ट्रात मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नांदेड येथील बस आगाराच्यावतीने मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहन महामंडळाचे नांदेड विभागीय नियंत्रक अविनाश कचरे हे होते. मंचावर आगार प्रमुख पुरुषोत्तम व्यवहारे, बसस्थानक प्रमुख राजकुमार टिपराळे, ज्येष्ठ पत्रकार कृष्णा उमरीकर, पत्रकार सचिन कवडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, भाषा ही समग्र संस्कृतीचे वहन करते म्हणून भाषेची टिकवणूक करण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शासन, समाज व कुटुंब पातळीवर मराठीचे संवर्धन होण्यासाठी लेखन-वाचन अधिकाधिक संवादावर भर देण्याची गरज आहे. एसटी ही महाराष्ट्राची ग्राम वाहिनी आहे, खेडीपाडी ,वाडी वस्त्यांना जोडणारा दुवा आहे .एसटीत काम करणारे कर्मचारी अव्याहत धडपडत राहतात. त्यांचे श्रम वंदनीय आहेत.असे सांगून विविध आंदोलनात एसटीचा बळी जातो ही शोकांतिका असल्याचे म्हटले . महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमात सर्व बोर्डाच्या शाळांसाठी मराठी विषय अनिवार्य केल्याची घटना अत्यंत आनंददायी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे त्यांनी आभार मानले.
आगार प्रमुख पुरुषोत्तम व्यवहारे यांनी प्रास्ताविक केले. मराठी भाषा व कवी कुसुमाग्रज यांच्या कविता उद्धृत करून एसटीने मराठीपण निरंतर जपले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय नियंत्रक अविनाश कचरे यांनी मराठी भाषा मराठी साहित्याचा आढावा घेत मराठीतून व्यवहार करण्यावर भर देणे आवश्यक आहे असे सांगून पत्रलेखन, कथालेखन, वाचन वाढवणे गरजेचे असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांना मराठी भाषा समृद्ध करू शकते असे त्यांनी सांगितले.
नितीन मांजरमकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास वाहतूक नियंत्रक, वाहतूक कर्मचारी,प्रवासी आदी उपस्थित होते. यावेळी कविवर्य कुसुमाग्रज यांची प्रतिमा असलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन ज्येष्ठ प्रवासी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.






No comments:
Post a Comment