मा. संजय राऊत यांचा ' देवांनी मैदान सोडले' हा लेख वाचला. भारताती .ल लोकांची अंधश्रद्धाळू मानसिकता व ईश्वराची निष्क्रियता याचा खरपूस समाचार या लेखात घेतला आहे असे वाचल्यानंतर आपणास समजते. इथे मा. संजय राऊत यांनी देवांवर / ईश्वरावर हल्ला चढवताना बुद्धांनाही ईश्वराचा दर्जा देऊन त्याच चौकटीत उभे केल्याचे आपणास वाचावयास मिळते.
आता प्रश्न असा आहे की
बुद्धांनी स्वतःला कधीही ईश्वर म्हटले आहे का ?
बुद्धांनी स्वतःला कधीही मी मोक्षदाता आहे असे म्हटले आहे का ?
उत्तर आहे "नाही."
जगात कोणत्याही धर्मापेक्षा जास्त असलेले साहित्य हे बुद्ध धम्माचे आहे. बुद्ध धम्मातील कोणताही ग्रंथ चाळा आणि बुद्धांनी स्वतःला मी ईश्वर आहे हे म्हटल्याचे दाखवून द्या.
बुद्धांनी आपल्या ज्ञानप्राप्तीपासून ते त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत जगाला धम्म शिकवला आहे म्हणजेच माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे शिकवले आहे, निसर्ग नियम शिकवले आहे, निसर्गावर प्रेम करायला शिकवले आहे व निसर्गाची काळजी घेण्यास शिकवले आहे ( आणखी खूप काही लिहू शकतो परंतु इथे थोडक्यात )
मनुष्य जेव्हा निसर्ग नियमांविरुद्ध वागतो तेव्हाच अनेक रोग जन्म घेत असतात. आपल्या लेखात बोधगया महाविहार देखील बंद केल्याचा उल्लेख आहे. बुद्धांची शिकवण ही विज्ञानाला धरूनच असते त्यामुळे बोधगया महाविहार देखील बंद ठेवणे उचितच आहे.
भगवान बुद्ध कोणताही अतिरेक शिकवत नाहीत. त्यामुळे बुद्धांना प्रथम जाणून घेऊन नंतरच त्यांच्यावर कोणतीही टिका टिप्पणी करावी ही आमची बुद्ध अनुयायांची आपणांस नम्र विनंती आहे.
मा. संजय राऊत यांचा हा लेख वाचून आमचे काही पुढारलेले बौद्ध बांधव त्यांचे अभिनंदन करण्यास सरसावले, सोशल माध्यमांवर त्यांचे लेख ही प्रसारित करू लागले. परंतु बौद्ध बांधवांना ईश्वरासोबतच बुद्धांबाबत सुद्धा असे लिहिणे जराही खटकले नाही.
का खटकले नसावे ?
याचे कारण एकच आहे आहे ते म्हणजे स्वतःच्या धम्माबाबत असलेले अज्ञान.
या लेखाला एक तात्काळ उत्तर / प्रतिसाद मा. पुरुषोत्तम खेडेकर यांचा आला. त्यांनी आपल्या पत्रात संजय राऊत यांना म्हटले आहे - आपण या लेखाचा हिंदी, इंग्रजी व इतर भाषेत अनुवाद करावा जेणेकरून भारतीय जनता धार्मिक कोरोनामुक्त होईल. यात त्यांनी पुरोहित, भटजी, मुल्ला मौलवी, पाद्री, फादर यांच्यासोबतच भन्ते म्हणजेच बौद्ध भिक्खु गणालाही कोरोना विषाणू संबोधले आहे.
मा. पुरुषोत्तम खेडेकर यांना भिक्खु गणाचा असा कोणता अनुभव आला की त्यांनी त्यांना विषाणू संबोधले ?
भिक्खु गणाकडून समाजाला आजपर्यंत अशी कोणती गंभीर हानी पोहचली आहे ?
एक दोन धर्मावर टीका करण्यासाठी सर्व धर्मांना एकाच नजरेतून पाहणे हे योग्य नव्हे.
तरी समस्त बुद्ध अनुयायांनी असल्या लेखांचा / पत्रांचा उदोउदो करून नवोदित बौद्धांची बुद्ध धम्माच्या बाबतीत दिशाभूल करू नये. आपण विद्वान असाल आपली विद्वत्ता ज्या क्षेत्रात कामी येते तिथे वापरावी अन्यथा बुद्धांनीच सांगितले आहे 'एही पस्सिको' - या आणि पहा. हा धम्म येऊन पाहण्यासारखा आहे, अनुभवण्यासारखा आहे.
-अरविंद भंडारे
अध्यक्ष,
पालि रिसर्च इन्स्टिट्यूट, मुंबई




No comments:
Post a Comment