यवतमाळ :
संपूर्ण देश कोरोना विषाणू (कोव्हीड- 19 ) च्या संसर्ग आजाराने भयभीत झाला असून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात, राज्यात अचानक लॉकडाऊन करण्यात आल्याने हातावर आणून पानावर खाणाऱ्याचे या आठवड्यात कंबरडे मोडले आहे. निराधार, निराश्रित व वृद्धांना याचा फटका बसला आहे. घरचे राशन संपले जवळ पैसे नाही अशा अनेक कुटुंबियांना फुले आंबेडकरी साहित्य संस्थेद्वारा फुले-आंबेडकरी साहित्य संसदेचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ भगत व परिवाराने महिना पंधरवडा पुरेल इतका किराणा देऊन दान पारामीतेचे पालन केले आहे. यवतमाळ मधील उमरसरा परिसरातील गरजूंना त्यांनी धान्य देऊन कुशल कर्म केले आहे.
फुले-आंबेडकरी साहित्य संसद गेल्या वीस वर्षापासून सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे नित्य नियमाने आयोजन करीत असते. चार साहित्य संमेलने व गेल्या बारा वर्षापासून महावंदना व धम्मदेसना कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून ते आपले समाजाप्रती असलेले ऋण फेडत आहेत.
एवढेच नाहीतर दुष्काळ व पूर परिस्थिती मध्ये सुद्धा आर्णी व घाटंजी तालुक्यातील पूरग्रस्तांच्या शिक्षण घेणाऱ्या मुलांना कपड्याचे वाटप करून त्यांना दिलासा देण्याचे काम त्यांनी केले आहे. आता कोरोनाच्या सावटाखाली रंजल्या-गांजल्या लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाल्याने त्यांनी लॉकडाऊन असल्यामुळे नियमाचे पालन करून व दक्षता घेऊन प्रत्येक गरजूंना घरी बोलाविले व त्यांना महिना व 15 दिवस पुरेल इतके साखर, तांदूळ,तेल, चना, मटकी, चहापत्ती, तिखट, हळद, मीठ, कपड्याच्या व अंघोळीच्या साबूण इत्यादी सामान देऊन आपल्यातील माणुसकीचा परिचय दिला. सदर वस्तूचे दान देताना राखी भगत, कश्यप भगत, रीया भगत व सचिन वानखेडे यांचे सहकार्य लाभले.
त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. एप्रिल महिन्यात घाटंजी व आर्णी तालुक्यातील काही गरजू व्यक्तींना अशीच मदत करणार असल्याचा मनोदय फुले आंबेडकरी साहित्य संस्थेचे जिल्हाध्यक्ष किशोर भगत यांनी यावेळी व्यक्त केला.




No comments:
Post a Comment