किनवट:
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर प्रशासनाने किनवट - माहूर विधानसभा मतदारसंघात उत्तम प्रकारे उपाययोजना आखल्या आहेत. परंतु आपल्या भागातील जनता भोळी -भाबडी आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून आजीवन कसं काढायंचं हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. परंतु बाहेरून आलेल्यांच्या भितीने ती घाबरून गेली आहेत. त्यांच्यातील भिती घालविण्यासाठी वाडी -तांडा, पाड्या -गुड्यात आरोग्यासह सर्व शासकीय यंत्रणा त्यांच्या पर्यंत जाऊन त्यांना दिलासा देण्याची नितांत गरज आहे, असे मत आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केले.
जगात हाहाःकार माजविणाऱ्या कोरोनाच्या निमित्ताने किनवटमध्ये केलेल्या प्रशासकीय बाबीचा शुक्रवारी ( दि. २७ ) त्यांनी आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसिलदार नरेंद्र देशमुख, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, पोलिस निरिक्षक मारोती थोरात उपस्थित होते.
पुढे बोलतांना केराम म्हणाले, एकेवीस दिवसाच्या लॉकडाऊनमुळे सर्व शेतकरी, शेतमजूर, हमाल, कामगार, हातावर पोट असणारे कष्टकरी आपापल्या घरीच आहेत. ह्या पैकी कुणीही उपाशी राहू नये यासाठी शासनस्तरावरून मिळणारं राशन थेट त्यांच्या पर्यंत तातडीनं कसं पोहचवता येईल याची सबंधित यंत्रणेनं तातडीने दखल घ्यावी. तसेच सर्व दानशूर मंडळी, व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांनाही विनंती करतो की, अशा वंचित, उपेक्षितांपर्यंत अन्न, धान्य व इतर आवश्यक वैद्यकीय सुविधा पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तालुकास्तरावर स्थापन केलेल्या " कोरोना प्रतिबंध सहायता कोष किनवट " यामध्ये सढळ हाताने दान देऊन आलेल्या या जीवघेण्या महामारीपासून सर्वांना कसे सुरक्षित ठेवता येईल यासाठी प्रयत्न करावा. घाबरून न जाता सर्वांनी आपापल्या घरीच राहावे.




No comments:
Post a Comment