किनवट :
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १० - १ (अ ) मधील तरतुदीनुसार राखीव असलेल्या जागेसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नामनिर्देशनपत्राबरोबर सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य होते ; परंतु बुधवारी ( दि.११ ) राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार
आता ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील हमीपत्र व जातपडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती घेवून नामनिर्देशनपत्र स्विकारण्याबाबतचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले असल्याचे तहसिलदार नरेंद्र देशमुख यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता हमीपत्र व जातपडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती देऊन ग्रामपंचायत निवडणूक लढविता येणार.
राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रान्वये , ग्रामविकास विभाग , शासन अध्यादेश क्रमांक २६ , दि . २० सप्टेंबर २०१९ चे अधिनियमात रुपांतर झाले नसल्यामुळे , महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १० - १ (अ ) मधील तरतुदीनुसार राखीव असलेल्या जागेसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नामनिर्देशनपत्राबरोबर सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल , असे सर्व संबंधित निवडणूक अधिकारी , निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित उमेदवार यांना तात्काळ अवगत करण्याबाबत यापूर्वी कळविण्यात आले होते.
आता , सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४ , दिनांक ११ मार्च २०२० अन्वये , राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सार्वत्रिक किंवा पोटनिवडणूक कार्यक्रमांकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिनांक हा २८ फेब्रुवारी , २०२१ किंवा त्यापूर्वीचा असेल , त्याबाबतीत नामनिर्देशनपत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील , असे हमीपत्र सादर करण्याची मुभा उमेदवारांना दिली आहे .
सबब , राज्य निवडणूक आयोगाने दिनांक २४ फेब्रुवारी २०२० रोजी जाहिर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांकडून विहित नमुन्यातील हमीपत्र व जातपडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती घेवून नामनिर्देशनपत्र स्विकारण्याबाबत सर्व संबंधित निवडणूक अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांना राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्रचे उपायुक्त अविनाश सणस यांनी शासनादेशाद्वारे कळविले आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार नरेंद्र देशमुख यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment