नांदेड ( मिलिंद व्यवहारे ) :
विषमता आणि कल्पनेवर आधारित निर्माण झालेला धर्म माणसाला माणूसपण नाकरतो पण भगवान बुद्धाचा धम्म माणसाला माणूसपण देत असतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत मराठा सेवा संघाचे प्रा. डॉ. गणेश शिंदे यांनी केले.
भोकर तालुक्यातील नागापूर येथे शनिवार दिनांक २९ फेब्रुवारी रोजी आठवी बौध्द धम्मपरिषद संपन्न झाली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालाजी शानमवाड हे होते. प्रथम भगवान बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्वागताध्यक्ष एल.ए.हिरे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्मृती चिन्ह व पुष्पहार देवून स्वागत केले. यावेळी किनवटचे माजी नगराध्यक्ष जागतिक धम्म परिषदेचे आयोजक अरुण आळणे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मंचावर माधव तिडके, प्रल्हाद तेलंग, जोगदंड , गिरीधारी जंगमे, बबन धात्रक, मारुती दासरवाड, बाबाराव बेरदेवाड, बालाजी उलेवाडी, बालाजी दासरवाड, दिगंबर शानमवाड, डॉ.साईनाथ वाघमारे, मिलिंद गायकवाड आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी परखड विचार व्यक्त करताना डॉ. गणेश शिंदे म्हणाले, मनुवादी व्यवस्थेवर आधारलेल्या विषमतावादी हिंदू धर्मामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खूप त्रास सहन करावा लागला. तरीही त्यांनी जातीयतेचे चटके सहन करीत व्यवस्थेशी संघर्ष केला. १९३५ साली धर्मांतराची घोषणा करून एक प्रकारे हिंदूधर्म सुधारण्याचा त्यांनी इशाराच दिला होता असे सांगून शिंदे म्हणाले, बाबासाहेबांनी मागास, पिडीत व उपेक्षित समाजाला माणूसपण देण्याची न्यायाची भूमिका घेत होते. परंतु माणसा-माणसात स्त्री-पुरुषात भेदभाव निर्माण करणाऱ्या धर्मातील पंडितांनी त्यांच्या विचाराला गांभीर्याने घेतले नाही. त्यांनी शिख, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन धर्माचा अभ्यास केला. मुस्लिम धर्माचा त्यांना खूप आग्रह झाला . अमिषही दाखवल्या गेले होते. परंतु त्यांनी शिख धर्म स्विकारण्याचा विचार केला . तेव्हा रोटीबेटीचा करण्याचा व्यवहार आड आल्याने अखेर १९५६ ला तब्बल २१ वर्षांनंतर अभ्यास करून नागपूरच्या दीक्षाभूमीवर पाच लाख लोकांसह बौद्ध धम्म स्वीकारला. हा धम्म याच मातीतला भारत देशातला आहे. आता जगाला बुद्धाच्या शिकवणुकीची गरज भासत आहे. विषमतावादी हिंदूधर्म व्यवस्थेमुळे येथे थोर समाजसुधारकांचे बळी घेतले गेले. अलीकडच्या काळात डॉ. नरेंद्र दाभोळकर, अँड.गोविंद पानसरे, कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली, हे देशासाठी घातक आहे. थोर पुरुषांचे विचार मरत नसतात. मराठा सेवासंघ थोर समाज सुधारकांचे विचार घेऊन समाज परिवर्तनाचे काम करीत आहे. बुद्धाचे विचार मानवतेचा संदेश देणारा आहे असेही ते म्हणाले.
बुद्ध विचाराशिवाय पर्याय नाही
– सुरेश गायकवाड
या बौध्द धम्म परिषदेला आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, हिंदुधर्मात विषमता अंधश्रद्धेचा डोंगर उभा केल्या गेला आहे. माणसांला भीती दाखविण्यासाठी देवाची निर्मिती करण्यात आली. बौद्ध धम्म विषमता विकारमुक्त आहे. हजारो वर्षापासून गुलामीचे जीवन जगणार्या समाजाला स्वातंत्र्य नव्हते ते मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर धडपडत होते. त्यांना वंचित उपेक्षित समाजाची चिंता वाटत होती म्हणून त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य व न्याय देणारे संविधान लिहिले. आपल्या संविधानाने आचार संहिता दिली आहे. त्या आचार संहिते प्रमाणे राज्यकर्ते चालत नसल्याने संविधानावर मनुवादी व्यवस्थेकडून हल्ले होतांना दिसत आहेत. याची चिंता तेव्हाही बाबासाहेबांना होती आजही वाटत आहे. सामाजिक व आर्थिक समानता निर्माण करायची असेल तर बुद्ध विचाराशिवाय पर्याय नाही असे मत सुरेश गायकवाड यांनी व्यक्त केले.
यावेळी अरुण आळणे यांनी आपल्या कार्याची दखल घेऊन आपला गौरव केल्याबद्दल धम्म परिषदेच्या आयोजकांना धन्यवाद दिले. अध्यक्षीय समारोप सरपंच बालाजी शानमवाड यांनी केला. प्रथम प्रास्ताविक आयोजक दत्ता व्यवहारे यांनी केले तर सूत्रसंचालन बी.एस. सरोदे यांनी तर उपस्थितांचे आभार ऍड. शिवाजी कदम यांनी मानले. सभेनंतर रात्री प्रसिद्ध गायक प्रकाशनाथ कळमकर व गायिका नंदा नांद्रेकर यांचा समाज प्रबोधनपर गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. धम्मपरिषद यशस्वी करण्यासाठी दशरथ जोंधळे, प्रकाश रावळे, गंगाधर कसबे, किसन कसबे, प्रकाश सरपे, मनोज रिंगणमोडे, उतम डूमेराव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावकरी, परिसरातील नागरीक, प्रतिष्ठित व्यक्ती, महिला व पुरुष यांची मोठया संख्येने उपस्थित होते.






No comments:
Post a Comment