नांदेड :
एका पेक्षा एक सरस शृंगार गीते, द्विअर्थी कविता, नॉनव्हेज जोक आणि मनमोहक नृत्य यांची उधळण झाल्यामुळे नांदेड येथील महामुर्ख कविसंमेलनाला उपस्थित हजारो श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
गंधर्वनगरी कलामंदिर येथील मैदानावर कापूर आणि लवंग यांची होळी करून परिसर कोरोना मुक्त करण्यात आला. भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावण भिलवंडे आणि मर्चंट बँक अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी मुर्ख शिरोमणी गर्दभराज यांचे पुजन करून कविसंमेलनाचे उदघाटन केले. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले आणि विरोधी पक्ष नेते दीपकसिंग रावत यांनी खास बनविलेल्या पुष्पहार तृतीयपंथीच्या गळ्यात टाकल्यामुळे खसखस पिकली.
व्यासपीठावर पोलीस निरीक्षक संदीप शिवलकर, भाजयुवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सोनू कल्याणकर, काँग्रेस शहर जिल्हा सचिव सरदार रविंद्रसिंघ बुंगई, जैन समाज जिल्हाध्यक्ष राजू जैन, प्रसिद्ध उद्योजक अखिलेश गुप्ता, भाजपा उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष शिवप्रसाद राठी, नांदेडभूषण राजेंद्र हुरणे, प्रतिष्ठित व्यापारी शिवाजीराव ईबितवार, सुमेर राजपुरोहित, दीपक बोधने हे उपस्थित होते.
स्वागताध्यक्ष व्यंकट मोकले यांनी सर्वांचे स्वागत केले. संयोजक ऍड. दिलीप ठाकूर यांनी सर्व मान्यवर व कवींवर विविध मार्मिक विनोद सांगून कार्यक्रमाची झकास सुरुवात केली. हास्य सम्राट सिद्धार्थ खिलारे यांनी गायलेल्या आती क्या खंडाळा या विडम्बन गिताला श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली. शाहीर रमेश गिरी यांच्या सदाबहार विनोदांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. मुंबईचे एकनाथ माळी यांनी आपल्या द्विअर्थी गीतातून रसिकांना होळीच्या आनंदात रंगवून चिंब केले. टीव्ही स्टार सतीश कासेवार यांच्या मिमिक्रीने कार्यक्रमात रंगत आणली. पत्रकार राजेंद्र शर्मा यांनी सांगितलेल्या सह अभिनय विनोदाला टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. प्रा .रविंद्र अंबेकर, बजरंग पारीख, सिनेस्टार लच्छु देशमुख, विठ्ठल पतंगे, विलास जोगदंड, कुलदीप नांदुरकर यांनी मनाच्या कोपऱ्यात दडलेले विनोद सांगून श्रोत्यांना मनसोक्त हसविले. गणेश वैद्य यांच्या लावणीला वन्स मोर मिळाला. चार तास रंगलेल्या या मस्तीच्या कार्यक्रमात रसिकांना पोट दुखेपर्यंत हसविले. कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, शिनूअण्णा नक्का, गौतम सावने, राहुल बनसोडे, करण जाधव, आनंद गांधारी, सदाशिव जोगदंड यांनी परिश्रम घेतले. बनारस नंतर फक्त नांदेड येथेच होळी निमित्त कविसंमेलनाचे सतत अठरा वर्षापासून आयोजन करत असल्यामुळे संयोजकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment