किनवट (नांदेड ) :
परजिल्हा व परप्रांतातून चिटपाखरूही येऊ देऊ नये व लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तरच आपला जिल्हा कोरोनामुक्त ग्रीन झोनमध्ये राहील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन ड्टनकर यांनी केले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढु नये या करीता देशात लॉकडाऊन आणखी १९ दिवसांनी वाढविण्यात आला आहे. यानुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांनी बुधवारी ( ता. १५ ) सायंकाळी सव्वापाच वाजता किनवट तालुक्याला भेट देऊन किनवट प्रशासना कडुन करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी केली.
किनवट तालुक्याला असलेल्या विदर्भ व तेलंगणा राज्याच्या सिमावरील चेक पोस्टची पाहणी केली. किनवट तालुक्यातील इंजेगावजवळील घनपूरफाटा येथील तेलंगाणा राज्याच्या सीमेवरील चेकपोस्टला त्यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले, तपासणी नाका असल्याने रस्ता मार्गाने कुणी आता येणार नाहीत ; तर डोंगरदऱ्यातील आडवळणाचे रस्ते, शेतातील पाऊलवाटा धरून तेलंगणातून आपल्याकडे लोकं येण्याचा प्रयत्न करतील त्यांनाच काय तर परजिल्हा व परप्रांतातून चिटपाखरूही येऊ देऊ नये ही जबाबदारी वन विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी व पोलिस विभागाच्या सर्वांनी काटेकोरपणे काळजीपूर्वक पार पाडण्याची नितांत आवश्यकता आहे.
किनवट शहरात नविन तहसिल इमारती मध्ये उभारण्यात आलेल्या कोरांटाईन कक्षास त्यांनी भेट दिली. त्यानंतर किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरपालिका मंगल कार्यालय येथील मदत शिबीरात राहात असलेल्या ४० परप्रांतीय मजूरांची भेट घेऊन प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. त्यांचेशी संवाद साधला. त्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या मनोरंजनासाठी तिथे टी.व्ही. संच उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सूचविले.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसिलदार नरेंद्र देशमुख, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, तालुका कृषी अधिकारी गायकवाड, उपविभागिय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मुरमुरे, डॉ. काळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सूचना देतांना पुढे म्हणाले, आता एक उत्कृष्ठ हॉस्पिटल उभारण्याची गरज आहे. त्याची उभारणी तत्काळ करावी. जे नागरीक आता बाहेर ठिकाणावरुन शहरात व गावात येत आहेत त्यांना होमकोरोंनटाईन न करता त्यांना शासकीय कोरोंनटाईन कक्षात व उपजिल्हा रुग्णालयात १४ दिवस कोरोंटाईन करणे बंधनकारक करावे. आताच हाती आलेल्या तपासणी अहवालावरून शिवणी येथिल ' तो ' संशयित रुग्ण हा निगेटिव्ह निघाला आहे. ही किनवट तालुक्याकरिता आनंदाची बातमी आहे. तरी त्याचा दुसरा तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले. किनवट तालुक्यातील घनपूर फाटा हा चेक पोस्ट असलेला तेलंगणा राज्याचा सीमाभाग आणि नांदेड जिल्याच्या सर्व सीमा सिल केल्या आहेत. पोलीस प्रशासनाने आता तत्पर राहावे तसेच सर्व नागरिकांनी लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तरच आपला जिल्हा कोरोनामुक्त ग्रीन झोनमध्ये राहील असे
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.




No comments:
Post a Comment