डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अमर्याद व्यक्तिमत्त्व असून जेवढे लिहू तेवढे कमीच आहे. लेखक, कवी, साहित्यिक नवनाथ रणखांबे यांनी त्यांचा थोडक्यात दिलेला परिचय -संपादक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लष्करी पार्श्वभूमी होती त्यांचे वडिल आणि आजोबा ब्रिटिशांच्या सैन्यात नोकरीला होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्यप्रदेश येथील महू येथे झाला. त्यांचे गाव आंबावडे, रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर मेजर रामजी सपकाळ रत्नागिरीतील दापोली येथे स्थलांतरित झाले. तेथे त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी बाबासाहेबांना मराठी शाळेत टाकले. पुढे उदरनिर्वाहासाठी वडिल रामजी सपकाळ सातारा येथे नोकरीस गेले. तेथे बाबासाहेबांनी त्यांचे 'आंबेडकर' हे आडनाव स्वीकारले.
पुढे आंबेडकर हे आडनाव रूढ झाले.
त्याकाळात लहानपणापासून त्यांना विटाळ आणि हीन रुढी परंपरेला सामोरे जावे लागले. पुढे त्यांचे वडिल रामजीबाबा हे १९०४ मध्ये मुंबईला परळमध्ये स्थलांतरित झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी बाबासाहेबांचा विवाह रमाई यांच्याशी झाला. मराठी उच्च माध्यमिक विद्यालय आणि एल्फिन्स्टन उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेऊन ते १९०७ मध्ये मॅट्रिक पास झाले. डॉ. बाबासाहेब १९१३ मध्ये इंग्रजी आणि पशिर्यन हे विषय घेऊन बी.ए. पास झाले. याचवर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. बडोदा राज्यात त्यांनी नोकरी केली. तेथेही त्यांना अस्पृश्य असल्यामुळे सतत अपमान सहन करावा लागला. ते १९१३ मध्ये न्यूयॉर्क येथे कोलंबिया विद्यापिठात उच्च शिक्षणास गेले. पुढे बाबासाहेबांनी हिमालया एवढे शिक्षण घेतले आणि बाबासाहेब एक आभाळा एवढे व्यक्तिमत्त्व झाले.
बाबासाहेबांनी सामाजिक समतेच्या चळवळीला सुरूवात केली. विविध वर्तमानपत्र काढली. सामाजिक समतेसाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केले. सामाजिक समतेच्या एल्गारा बरोबर राजकीय चळवळीत आघाडी घेतली आणि धार्मिक बौद्ध क्रांती घडवून आणली.
बौद्ध धम्माच्या मार्गावर
हिंदू धर्मात सामाजिक, धार्मिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक पिढ्यानपिढ्या पिचलेल्या समाजाला, स्वतःच्या धर्मात माणसापेक्षाही हीन दर्जा दिल्यामुळे आत्मसन्मानही इथल्या व्यवस्थेने हिरावून घेतला होता, यावर धर्मांतर करणे हाच एकमेव सन्मानाचा मार्ग होता.
प्रत्येक मानवाला धर्माची गरज आहे. धर्म ही ऐतिहासिक निर्मिती आहे. धर्मात स्वातंत्र्य, समता, आणि बंधुता असायला हवी. धर्म माणसाला जगायला शिकवतो. धर्म माणसाला वागायला शिकवतो, चांगले संस्कार, चांगल्या परंपरा चांगल्या धर्मात असतात म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात धर्माला महत्त्वाचे स्थान आहे. मनुष्याच्या उत्कर्षाला धर्म ही फार महत्त्वाचीच बाब आहे. हिंदू धर्मातील स्पृश्य - अस्पृश्य, उच्च-नीच जातीच्या विविध सामाजिक उतरंडीने भेदभावाला कंटाळून बाबासाहेबांनी समतेसाठी मानवी हक्कासाठी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, महाड चवदार तळे सत्याग्रह इ. करूनही हिंदू धर्मात समानतेचा न्याय मिळत नाही याची जाणीव सर्व समाजाला करून दिली आणि मग प्रज्ञासूर्य, महामानव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे बहिष्कृत वर्गांच्या परिषदेचे अध्यक्षीय भाषणात त्यांनी "मी हिंदू धर्मात जन्माला आलो, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही !" धर्मांतराची अशी घोषणा केली.
बौद्ध धम्माशी संबंधित अनेक परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला.१९४९ मध्ये काठमांडू येथे झालेल्या बौद्धांच्या परिषदेत ते सहभागी झाले. १९५० मध्ये त्यांनी जागतिक बौद्ध धम्म परिषदेत सहभाग घेतला. १९५१ मध्ये जुलै महिन्यात भारतीय बौद्ध जनसंघाची स्थापना करून बौद्ध धम्माचे प्रार्थना पुस्तक 'बुद्ध उपासना पंथ ' लिहिले. १९५४ मध्ये रंगून येथे झालेली जागतिक बौद्ध परिषदेमध्ये सहभागी झाले. १९५५ मध्ये त्यांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. 'द बुद्ध अँड हिज धम्म' हा महान ग्रंथ लिहिला.
विविध धर्माचा सखोल अभ्यास करून बौध्दधम्म अशोका विजयादशमी दिनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी समारंभ पूर्वक लाखो अनुयायांसोबत नागपूर येथे बौध्द धम्म स्वीकारला. नागपूर ही बौध्द नाग लोकांची भूमी असल्यामुळे नागपूर हे शहर निवडले. नाग लोकांच्या वास्तव्यामुळे नागपूर हे नाव पडले. महाराष्ट्रातील प्रामुख्याने हिंदू महार आणि अन्य जातीतील लोक १९५६ नंतर बौध्द झाले. १९५६ नंतर बौध्द धर्मात आल्यानंतर बौध्द झालेल्यांचे सर्वांचे कल्याण आणि मंगल झाले. अस्पृश्य, हरिजन इ. अशा हीनताबोध शब्दाला जाळून टाकले.
धर्मांतर म्हणजे एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे होय
धर्मांतर म्हणजे जुन्या धर्माची जुनी कपडे काढून नवीन धर्माची नवीन कपडे परिधान करण्याची प्रक्रिया होय. या प्रक्रियेतून पुढे जुन्या धर्माप्रमाणे न वागता नव्या धर्माप्रमाणे आपले सर्व जीवनाचे आचरण दिनचर्या करणे होय.
नव्या युगाची नवी पहाट उगवून नवी धम्मक्रांती बोधीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात घडवून आणली. बाबासाहेबांचे संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचे स्वप्नं होते.
६ डिसेंबर १९५६ रोजी महामानवाचे महापरिनिर्वाण झाले. एका महान युगाचा अंत झाला.
बौद्धधम्म स्वीकारल्यामुळे काय परिवर्तन झाले. काय बदल झाला. भारत बौद्धमय करण्यासाठी काय केले पाहिजे ? हा विचार करण्याचा महत्त्वाचा भाग आहे....
धम्म स्वीकारल्यामुळे नेमकं काय झाले हा महत्वाचा मुद्दा आहे
धम्मामुळे लोकांनी जात आणि जातीतील पोट जाती, ती जाता जात नाही ती जातफेकून दिली आणि नव्या युगाची पहाट उजाडली.........! आत्मसन्मानाच्या लढाईत धर्मांतराने विजय मिळवला. विषमतावादी, यातनावादी आणि जुल्मीवादी सामाजिक बहिष्काराला मूठ माती दिली गेली. समानतेचे वारे वाहू लागले. सर्वत्र नवचैतन्य पसरले. सुकलेल्या झाडाला पालवी फुटली. बौद्ध झाल्याचा अभिमान वाटू लागला. धर्मांतर हा हजारो वर्षाच्या निःशब्द मुक्या भावनांचा उद्रेक मुकनायकाच्या समतेच्या एल्गारने उद्याचा परिवर्तन वादी सूर्योदय उगवला आहे. धम्म स्वीकारल्यामुळे मानसिक बदल मोठ्या प्रमाणात झाला. मानवी मूल्य प्रस्थापनेसाठी आणि माणूस म्हणून जगण्यासाठी वैज्ञानिक बौद्धधम्म स्वीकारणे, हा महत्त्वपूर्ण सामाजिक बदल होता. मानवाच्या बाह्य जगावर आणि आतील जगावर धम्मामुळे चांगले परिणाम झाले. जीवन तेजोमय झाले. 'अत्त दीप भव्' या क्रांतीकारी तत्त्वज्ञानाने जीवन बदलवले. कोणी आपला उद्धार करणार नाही तर आपला उद्धार आपणच केला पाहिजे मरगळलेल्या समाजाला बाबासाहेबांनी नवचैतन्य दिले. बुद्धांचे एकूण तत्त्वज्ञान हे माणसाच्या आतल्या अंधाराला मुक्त करून उजेड देण्याचे आहे. बाह्य जगात चांगले वागायचे आणि राहायचे कसे ? हे बुद्ध तत्वज्ञान सांगते ! युद्धाचा मार्ग न दाखवता शांतीचा मार्ग दाखवते. इथल्या व्यवस्थेने हिरावून घेतलेला आत्मसन्मान बौद्ध धर्मांतरामुळे परत मिळाला. धम्मामुळे मोठ्या प्रमाणात आज सर्वोत्कृष्ट जीवन झाले. जीवनाचे राहणीमान सुधारले. जातीच्या दाखल्यावर नवबौद्ध आणि बौद्ध शब्द आला. ज्या जातीतील आणि धर्मातील लोकांनी बौद्धधम्म स्वीकारला त्यांचे मंगल झाले.....
नवीन दीक्षा घेणाऱ्यांना नवबौद्ध हा शब्द वापरल्यामुळे बौद्ध आणि नव बौद्ध असा फरक निर्माण होतो म्हणून नवबौद्ध हा शब्द न वापरता बौद्ध हाच सर्वांसाठी शब्द वापरला पाहिजे असे माझे ठाम मत आहे.
बाबा ....
स्वप्न पहायचं, संकटाशी लढण्याचं, बळ दिलं!
तुम्हीच वाट दाखवली, प्रगती केली....अन् उंच माझी भरारी !
तुम्हीच बुद्धांचे तत्त्वज्ञान पंचशील अष्टांग मार्ग, प्रज्ञा शील करुणा, अत्त दीप भव् शिकवलं मला!
सांगा मी फेडू कसे ?........
न फिटणारे ऋण असे !........
बौद्ध धम्म स्वीकारल्यामुळे झालेले बदल माझ्या 'नशा' या कवितेत व्यक्त होतांना.......
धम्माने फुलले जीवन
धम्माने हसले जीवन
धम्माने ओतप्रोत प्रबुद्ध जीवन
असे सहज मी व्यक्त झालो आहे.
हे धर्मांतरीत बौद्धांची प्रगती पाहिल्यावर आज पाहतो तर पन्नाशी नंतर इतर धर्म, भटके आणि ओबीसी समाजही धम्मात प्रवेश मोठ्या प्रमाणात करीत आहे. ही विचार करणारी गोष्ट आहे, बौद्ध धर्मांतर ही आत्मसन्मान मिळवणाऱ्या समतेच्या महायुद्धाचे यश आहे. असे मला वाटते.
आज ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात बौद्धधम्माच्या वाटेवर आहे. काही बौद्ध झाले आहेत. त्यापैकी स्मृतिशेष हनुमंत उपरे, बंजारा समाजाचे उल्लास राठोड, उत्तरप्रदेशातील शिवशंकर यादव, कुणबी समाजाचे प्रदीप भावे, नरेंद्र कदम, बंजारा समाजाचे मनोहर रामभाऊ चव्हाण बौद्ध झालेले आहेत. उत्तरप्रदेशातील बौद्ध झालेले ओमप्रकाश मौर्या (भिवंडी, ठाणे येथे वास्तव आहे) आहेत. मिशन 'बा' या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात भारतात बौद्ध धम्मात ओबीसी बांधवांना आणण्याचे काम केले जात आहे. (संदर्भ - द्वितीय बुद्ध शासन ओबीसी बौद्ध धम्माच्या वाटेवर लेखक जगदेव भटू ) उपराकार लक्ष्मण माने, कवी सुरेश भट, एन. एस. भालेराव (डोंबिवली) यांनी बौद्ध धम्म स्वीकारला तर गोयंका गुरुजी आपले संपूर्ण आयुष्य बौद्ध धम्मात जगले म्हणजे बौद्ध धम्माची पाटी लावून चालणार नाही तर बौद्ध धम्म आत्मसात केला पाहिजे. बौद्ध धम्माने जगले पाहिजे. बौद्ध धर्माप्रमाणे वागले पाहिजे. भारतीय बौद्ध महासभा आज बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करीत आहेत. आपल्या समाज बांधवांना इतर धर्म, ब्राम्हण, भटके विमुक्त जाती, ओबीसी, बांधव बौद्धधम्मात आणत आहेत. यामुळे धर्मांतरित बौद्धांसंबंधी बौद्ध धम्माची सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी वाढली आहे.
१) रोटी बेटी व्यवहार-: जे धर्मांतर करून बौद्ध होत आहेत. यांना बौद्धांनी समानतेचीच वागणूक दिली पाहिजे. ओबीसी, भटके विमुक्त जाती, वेगवेळ्या जातीतील लोक आणि वेगवेगळ्या धर्मातील लोकं ई. ज्यांनी बौद्धधम्म स्वीकारला आहे त्यांच्याशी रोटी बेटी व्यवहार केला पाहिजे, नाते संबंध निर्माण केला पाहिजे. असे केले तरच ते खरे बौद्ध झाले असे मला वाटते.
बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्या बौद्धांसाठी मोठ्या भावाची भूमिका निभावली पाहिजे. त्यांना आपल्यात सामावून घेतले पाहिजे असे मला वाटते.
२) बौद्ध म्हणून वागवणे:- धर्मांतरीत केलेल्या वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना बौद्ध म्हणून समानतेची वागणूक दिली पाहिजे . कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता समानतेची वागणूक देण्याचे कर्तव्य आणि जबाबदारी ही बौद्धांची आहे. आपला आणि परका हा भेद राहिला नाही पाहिजे. बौद्ध ही एकमेव ओळख सर्वांची झाली पाहिजे. यामध्ये हेवेदावे नको आहेत.
३) सामाजिक कार्यक्रम:- धर्मांतरित बौद्धांना आपल्यामध्ये बौद्धांनी सामावून घेऊन सामाजिक कार्यक्रम आखले पाहिजेत . सामाजिक कार्यक्रमात दीक्षा घेणाऱ्या बौद्धांचा सहभाग वाढला पाहिजे. कौटुंबिक कार्यक्रमात त्यांना एकत्र घेतले पाहिजे. बौद्ध म्हणून नातेसंबंध जोडले पाहिजे. एकमेकांशी प्रेमाने वागणे, हेवेदावे न करणे ही दीक्षा घेणाऱ्या धर्मातरीत बौद्धसाठी आणि बौद्ध धर्मियांची सामुहिक जबाबदारी आहे. असे मला वाटते
४) दीक्षा घेणाऱ्या बौद्धांसाठी संस्कार वर्ग-: दीक्षा घेऊ पाहणाऱ्या आणि दीक्षा घेणाऱ्या बौद्धांसाठी बौद्धांनी संस्कार वर्ग घेतले पाहिजेत. बौद्ध धम्मात येतांना बौद्ध धम्माचा अभ्यास केला पाहिजे. त्याप्रमाणे वागले पाहिजे. जुन्या प्रथा रूढी परंपर सोडून दिल्या पाहिजेत . बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञाचे पालन काटेकोर पणे केले पाहिजे. संस्कार वर्गातून बौद्ध धर्माचे ज्ञान दीक्षा घेणाऱ्या बौद्धांना दिले पाहिजे. दीक्षा घेणाऱ्या बौद्ध बांधवाना बौद्ध धर्माबद्दल आपुलकी प्रेम, जिव्हाळा, निर्माण करण्यासाठी बौद्धांनी प्रयत्न केले पाहिजेत. बुद्धांचे तत्वज्ञान आणि धम्माचे संस्कार वर्ग घेणे ही बौद्धांची जबाबदारी आहे.
५) आंतरराष्ट्रीय बौद्ध बांधव:-
आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद आज मोठ्या प्रमाणात होत आहेत. आंतरराष्ट्रीय बौद्धांशी जवळीक संबंध साधून तेथे ही रोटीबेटी व्यवहार झाले पाहिजेत. इथल्या खऱ्या बौद्धांना आंतरराष्ट्रीय निधी मिळाला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे. नकली बौद्धांपासून धम्म वाचवला पाहिजे. नकली बौद्ध आज आंतरराष्ट्रीय निधी लाटत आहे. त्यांना वेळीच ओळखले पाहिजे आणि *बौद्ध सांस्कृतिक हानी वाचवली पाहिजे* ही काळाजी गरज आहे. बौद्धांची स्थळे बौद्धांच्या ताब्यातच राहिली पाहिजे. यासाठी दक्ष आणि कार्यतत्पर बौद्धांनी राहिले पाहिजे. ही आता बौद्धांची सामूहिक जबाबदारी आहे.
६) बौद्धांवरील अन्याय जगाला कळला पाहिजे:-
इथल्या बौद्धांवरील अन्याय हा दलितांवर झालेला अन्याय असे मीडिया दाखवते त्यावेळी भारताचे खरे रुप जगासमोर जात नाही आणि जगभरातल्या बौद्ध राष्ट्रांची मदत मिळत नाही. इथल्या बौद्धांवरील अन्याय हा दलितांवरील नसून तो बौद्धांवर आणि बौध्द धर्मावर होत आहे, हे जगाला समजले पाहिजे त्यासाठी स्वतंत्र मीडिया उभारणे ही बौद्धांची जबाबदारी आहे. बौद्ध धर्माची मासिक, वर्तमानपत्र, टिव्ही चॅनेल इ. मीडिया कायम स्वरूपी उभा राहण्याचा प्रयत्न यशस्वी केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय बौद्ध देशांच्या मीडियाशी जवळीक साधने ही इथल्या बौद्धांची जबाबदारी आहे. त्यांच्या मदतीने मिडियाचे रोप भारतात लावणे गरजेचे आहे. त्यामुळे भारतातील बौद्ध धर्मिय बौद्धांचा आत्मविश्वास वाढेल.
या सर्व गोष्टींचा विचार योग्य केल्यास भारत बौद्धमय होईल असे माझे ठाम मत आहे.
(©® नवनाथ आनंदा रणखांबे, ठाणे, मोबाईल ९९६७४३५०३२, लेखक हे इंडियन टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड विजेता आहेत)




No comments:
Post a Comment