भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे धगधगते अग्नीकुंड त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक दु:ख, हालअपेष्टा, स्पृश्य-अस्पृश्यतेचे चटके सहन करुन तमाम भारतीयांचे जीवनमान उजळवले. म्हणून अशा या महापुरुषाला प्रखर राष्ट्रभक्ताचीच उपमा देणे संयुक्तिक ठरेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 1891 साली झाला व त्यांचे महापरिनिर्वाण 1956 ला झाले म्हणजे त्यांना केवळ 65 वर्षांचेच आयुष्य लाभले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विद्यार्थी होते किंवा बालवयात होते तेव्हा त्यांचे वडील रामजी सुभेदार यांनी त्यांच्यावर खूप चांगले संस्कार केले होते. आपला मुलगा खूप शिकला पाहिजे शिकुन त्याने समाजाचा उध्दार केला पाहिजे व देशामध्ये नाव कमावले पाहिजे अशी त्यांच्या वडीलांची धारणा होती. त्यांच्यावर लहानपणी त्यांनी पाच मुल्य संस्कार बिंबवले होते त्यामध्ये शिक्षण, शिस्त, स्वावलंबन, स्वाभिमान व कठोर परिश्रम यांचा समावेश होता. हे लहानपणी झालेले त्यांच्यावरील संस्कार त्यांना सबंध आयुष्यात खुप उपयुक्त ठरले म्हणून ते आपल्या उभ्या आयुष्यात लोकांसाठी विशेषत: देशासाठी झिजले. त्यांनी आयुष्यभर ज्ञानार्जन करुन अठरा-अठरा, बावीस-बावीस तास अभ्यास करुन आठ-आठ वर्षांचे अभ्यासक्रम दोन-दोन वर्षात पूर्ण करुन प्रचंड ज्ञान संपादन केले. परदेशात शिकायला गेल्यानंतर सुरुवातीचे चार महिने त्यांनी आपल्या सवंगडयांसमवेत हसण्या बागडण्यात खेळण्यात घातली. पण जेव्हा चार-पाच महिन्यानंतर त्यांना जाणीव झाली आपण इथे कशासाठी आलो आहोत. असे जर आपण खेळण्यात वेळ घालवू लागलो तर आपण विद्वानांच्या पंक्तीत कसा जावून बसेल? तेव्हा त्यांनी झपाटून अभ्यासाला सुरुवात केली. त्यांचे सवंगडी त्यांना चिडवत होते. भिमराव तु एवढा अभ्यास करतोस अभ्यास करुन तु काय झेंडा लावणार आहेस का? परुतु त्यांनी प्रचंड अभ्यास करुन आपल्या ज्ञानाचा जगभर झेंडा लावला. त्यांनी मिळवलेल्या या ज्ञानाचा उपयोग त्यांनी स्वत:साठी किंवा स्वत:च्या कुटुंबासाठी, इतर आप्तेष्टांसाठी कधीच केला नाही. असे जर केले असते तर डॉ. आंबेडकर खूप श्रीमंत झाले असते, त्यांनी प्रचंड पैसा, संपत्ती कमावली असती व ते खूपच आनंदी जीवन जगू शकले असते. पण त्यांच्यासमोर अज्ञान, अंधकारात सापडलेले लोक होते. देशातील वंचित, उपेक्षित लोक होते. देशसेवेचे त्यांच्यासमोर स्वप्नं होते, म्हणूनच डॉ. आंबेडकर विदेशात शिकूनही, त्यांना तिथे बडया हुद्यांच्या नोकरीच्या संधी असूनही ते मायदेशात म्हणजेच भारतभूमित परतले आणि त्यांनी या देशाच्या जनतेसाठी काम केले. यावरुन त्यांची राष्ट्रनिष्ठा लक्षात येते. जर ते परदेशात स्थायिक झाले असते तर त्यांचा भारतीयांना काही फायदा झाला असता का? नाही, अर्थातच त्यांची ओढ भारतीय माणसासाठी होती, भारतीयांच्या कल्याणाचा त्यांच्या उत्थानाचा, त्यांच्या उत्कर्षाचा विचार बाबासाहेबांना स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणून त्यांनी आपल्या विद्वतेचा उपयोग या देशासाठी केला. 1930 साली जेव्हा ब्रिटीश सरकारने राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्या कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांना भारतीय दलितांचे प्रतिनीधी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा त्यांनी या परिषदेत ब्रिटीशांना रोखठोक सवाल केला. ते म्हणाले, तुम्ही अजुनही या देशातल्या शेतकरी, मजूर, अस्पृश्य वर्गासाठी काहीच केले नाही. तुम्ही त्यांच्या उत्थानाचे कार्यक्रम आखले पाहिजे होते, त्यामुळे तुम्हाला या देशाला स्वातंत्र्य द्यावे लागेल. व तुम्ही देश सोडून गेलं पाहिजे, अशी स्वातंत्र्याची मागणी करणारे महापुरुष डॉ. आंबेडकर होते, यावरुनही त्यांच्या राष्ट्रभक्तीची प्रचिती आपणास येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काही मंडळी दलितांचे कैवारी अशी उपमा देतात, पण हे संबोधणे चुकीचे वाटते, ते या देशातील कोटयावधी पददलितांचे मुक्तीदाते होते, मात्र त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याला केवळ दलितांपुरते मर्यादित करणे चुकीचे ठरते. कारण ते मानवी लढ्याचे मुक्तीदाते होते. त्यांनी या देशातील सवर्णांचा, आदिवासींचा, स्त्रियांचा, कामगारांचा इतर अन्य धर्मीयांचा विचार केला व राज्यघटनेच्या माध्यमातून तर त्यांनी सर्वांचेच हीत साधले. त्यांनी राज्यघटनेत कुणा एका समाजाला झुकते माप दिले नाही. या वरुनही त्यांची सर्व प्रतीची उदात्त भावना दिसून येते. त्यांची मानवतावादी वृत्ती व त्यांची राष्ट्रभक्ती ही अतिशय जाज्वल्य होती. राष्ट्राला कोणती दिशा द्यायची याचा अचूक आराखडा त्यांच्या विचारात दिसतो. एक प्रकारे राष्ट्रचिंतन हा त्यांचा स्थायीभावच होता. पत्रकारांच्या एका प्रश्नाच्या उत्तरातही बाबासाहेब राष्ट्रहित कि समाजहित असा प्रश्न आल्यावर ते राष्ट्रहितालाच मी प्राधान्य देईल असे सांगतात. 1938 मध्ये जेव्हा कर्नाटक प्रांताची स्वतंत्र प्रांतरचना झाली होती त्यावेळी प्रांतीय वादावर भाष्य करताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते, ‘आपण सर्व भारतीय आहोत. तेव्हा आपण हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हा भेदभाव विसरुन आपण सर्व केवळ भारतीय आहोत ही भावना प्रत्येकाने बाळगायला पाहिजे. त्यांनी भारतीय राज्यघटनेतही ‘आम्ही भारताचे लोक’ या वाक्याने राज्यघटनेच्या प्रास्ताविकेची सुरुवात केली यावरुन त्यांची भारतीय निष्ठा किती प्रखर होती याची प्रचिती येते.
त्यांनी आपल्या सुरु केलेल्या नियतकालीकांच्या माध्यमांतूनही इंग्रजी राजवटी विरुध्द वेळोवेळी टीका त्यांनी केली. बहिष्कृत भारतच्या एका लेखात ते म्हणतात, ‘इंग्रज राजवट जो पर्यंत आहे तो पर्यंत दलितांनी जे जे पदरात पाडून घेता येईल ते घ्यावे. पण ही राजवट जितक्या लवकर संपुष्टात येईल तेवढे आपल्या हिताचे आहे, याची खूणगाठही मनाशी पक्की करावी. इंग्रजांनी भारत देश गुलाम केला या देशाचे आर्थिक शोषण मोठया प्रमाणावर केले याची जाणीव त्यांना विद्यार्थी दशेपासूनच होती. म्हणून त्यांनी विद्यार्थी असताना जे प्रबंध सादर केले त्या प्रबंधातही ब्रिटीश भारताचे आर्थिक शोषण कसे करतात, याबाबत मते मांडून त्यांनी आपला राष्ट्रवाद जोपासला.
विनंती : प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करूया आणि कोरोनाला हरवूया!




No comments:
Post a Comment