किनवट : तालुक्यातील अतिदूर्गम डोंगरदरीत असलेल्या सिंदगी ( मोहपूर ) या गावातील असहाय्य विधवा व निराधार महिलांसह पंचेवीस कुटूंबियांना भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी अन्नधान्य वाटप करून लॉकडाऊनमुळे उपाशीपोटी राहणारांना मायेचा आधार दिला आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळा 'मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश स्कूल, कोठारी ( चि) ' या शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी या शाळेत शिकणाऱ्या अतिमागास कोलाम समाजातील पाच विद्यार्थ्यांच्या आई - वडिलांसह लॉकडाऊनमुळे उपासमार होणाऱ्या छप्पन्न कुटूंबांना अतिदुर्गम काझीपोड व पळशीडाग येथे जाऊन यापूर्वीही अन्नधान्य वाटप केले आहे.
समाजऋण फेडण्याच्या उद्देशाने त्यांनी त्यांच्या अर्धांगिणी प्राचार्या शुभांगी ठमके व सुपुत्र सुशांत ठमके यांच्यासमवेत प्रत्येकी एक किलो मुगदाळ, मसूरदाळ, गूळ, खाद्यतेल, मीठ, पाच किलो तांदूळ, चहापत्ती, हळद, मिरची पावडर, बिस्कीट,अंघोळीचा व कपड्यांचा साबूण अशा अन्नधान्य साहित्याची किट वाटप केली.
यावेळी कोरोना नियंत्रण जनजागृती व मिडीया कक्षाचे सहायक उत्तम कानिंदे यांनी माहिती दिली व सूत्रसंचालन केले. सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगी ठमके यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबद्दल सर्व ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले. समता सैनिक दलाचे तालुका उपाध्यक्ष केंद्रिय शिक्षक राहूल उमरे यांनी कोरोनाविषयी जनजागृती संदेश दिला.
याप्रसंगी पोलिस पाटील बालाजी वानखेडे, उत्तमराव धुप्पे, डॉ. सागर भवरे, माधव धुप्पे, आशा राहूल उमरे आदींसह लाभार्थी सोशल डिस्टंन्सिगचं पालन करून उपस्थित होते.







No comments:
Post a Comment