कोरोनाच्या प्रादुर्भावाने झालेल्या लॉकडाऊनमुळे दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे ट्रकने जाणाऱ्या 40 जणांना छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद मंगल कार्यालय, किनवट येथे व पायी जाणाऱ्या 33 परप्रांतीय मजूरांना ताब्यात घेऊन शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह गोकुंदा ( पूर्व ) ता. किनवट जि. नांदेड येथे " मदत शिबीरात " ठेवले आहे. त्यांना येथे मिळणाऱ्या सोयी -सुविधांच्या अनुषंगाने प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास यांचा विशेष लेख -संपादक
कोरोना विषाणू संसर्गा पासून बचाव व्हावा म्हणून देशभरात जाहीर झालेल्या लॉकडाउन नंतर रोजगाराच्या निमित्तानं आलेले अनेक लोक जसे जमेल तसे आपापल्या जन्मभूमीकडे निघाले होते. राज्याच्या व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकांनी जिथे आहे तिथे थांबावे असे शासनाने जाहीर केले होते. अशातच राजस्थानचे 36, गुजरातचे 2 व ट्रकचालक, क्लिनर असे एकूण 40 जण एका ट्रकने निघाले होते. तेलंगाणातून महाराष्ट्रात येणाऱ्या रस्त्यावर किनवट तालुक्यातील घणपूर सिमेवर तपासणी नाका आहे. येथे कर्तव्यावर असलेल्या नांदेड पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले. त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद मंगल कार्यालय, किनवट येथे " मदत शिबीरात " ठेवले.
हैद्राबादजवळील रामोजी फिल्मसिटी परिसरात संगारेड्डी जिल्ह्यात कामानिमित्त आलेले स्थलांतरीत मजूर राहात होते. त्यापैकी काहीजन आईस्क्रिम विकायचे तर काहीजन ठेकेदाराच्या अधिनस्त काम करायचे. कोरोना ( कोव्हीड- 19 ) प्रादुर्भावाने झालेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचं काम थांबलं. जवळचं राशन पाणी संपलं. ठेकेदार वा सरकार कामाला जाऊ देईना, अन् जेऊ देईना. तेथे उपाशी मरण्यापेक्षा ते आपल्या बाड -बिस्तऱ्यासह ते आपल्या लेकरा-बाळासह रविवारी (ता. 29 ) पायी निघाले. रस्त्याने गावकऱ्यांकडून मिळेल ते खात-पित, मजल- दरमजल करत ते पुढं निघाले. तेलंगाणात त्यांना कुठच अडविलं नाही उलट सोनाळ्याजवळील महामार्गाच्या चार किमी अंतरावर पोलिसांनी त्यांना बोलेरे पिकअपमध्ये बसवून महाराष्ट्राच्या सीमेवर घनपूर नाक्याच्या काही अंतरावर सोडले. मुख्य रस्त्याने न जात डोंगराच्या, शेताच्या आडमार्गाने जा अन्यथा नाक्यावरील पोलिस तुम्हाला ताब्यात घेतील असा सल्लाही त्यांनी दिला.
ते असेच मुख्य रस्ता सोडून कोठारी ( चि) गावाजवळ आले. सकाळीच ग्रामस्थांनी त्यांना जेवन दिले. त्यानंतर एमआयडीसी, आयटीआय मागील रस्त्याने ते आनंदवाडी परिसरातून दत्तनगरमार्गे नागपूरकडे जाणार होते. गुरुवारी ( ता. दोन ) सकाळी 11 वाजता पुरी यांनी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल यांना खबर देताच त्यांनी तहसीलदार नरेंद्र देशमुख व पोलिस निरिक्षक मारोती थोरात यांना ' त्या स्थलांतरीत मजूरांना ' ताब्यात घेऊन शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह, गोकुंदा ( पूर्व ) येथे ठेवण्याचे सूचित केले. तिथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गजानन काळे यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्या सर्वांच्या हातावर 'होम कोरोंटाईनचा ' शिक्का मारला. त्या तेहत्तीस मजूरात मध्य प्रदेशचे एकेवीस, बिहारचे सात, उत्तर प्रदेशचे तीन व राजस्थानच्या दोघांचा समावेश आहे. पुरूष : 23, महिला: 6 व मुलं : 4
लॉकडाऊनमुळे इतर राज्यातून आलेले महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याच्या किनवटमध्ये अडकलेले होते. या अवस्थेत जिल्हाबंदी आणि राज्याच्या सीमाभाग प्रवेशसाठी बंद झाल्याने या नागरिकांची राहण्याची व जेवणाची सोय किनवटचे सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केली. किनवट मध्ये दोन "मदत शिबीरा"मध्ये सोय केली असून यामध्ये इतर राज्यातून एकूण 73 व्यक्तीची संख्या आहे . शिवाजी मंगल कार्यालयात राजस्थान मधील ,गुजरात मधील 2 व चालक - क्लिनर 2 असे एकूण 40 तसेच दुसऱ्या "मदत शिबीरात" जे शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह गोकुंदा ( पूर्व ) येथे तयार केले असून 33 नागरिकांची सोय यामध्ये करण्यात आली आहे. ठिकाणी राजस्थान मधील दोन बिहार मधील 7 उत्तर प्रदेश मधील तीन आणि मध्यप्रदेश मधील 21 अशा विविध राज्यातील नागरिकांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे .या दोन्ही "मदत शिबीरा"मध्ये नागरिकांना दोन वेळचे जेवण, चहा-नाश्ता तसेच स्वयंसेवी संस्थांकडून फळे पुरवण्यात येतात. त्याचप्रमाणे दिनचर्येमध्ये सकाळी योगाचे प्रशिक्षण वर्ग दररोज घेतले जातात, या नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले असून त्यांच्या दोन्ही "मदत शिबीरा"च्या ठिकाणी फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण केले आहे. व्यक्तींना मानसिक आधार मिळावा म्हणून प्रशिक्षीत समुपदेशका मार्फत त्यांचे समुपदेशनही केले जात आहे जेणेकरून त्यांच्यामध्ये एकलेपणाची भावना येऊ नये, तसेच मनोरंजनाची सुविधा म्हणून टीव्ही बघण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. या 73 जणांची प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली असून आरोग्याच्या बाबतीतही किनवट प्रशासन जागरूकतेने व आस्थेने लोकांना काळजी घेत आहे. त्याचबरोबर सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी देखील त्यांच्या सेवेत तत्पर आहेत.
या नागरिकांपैकी मोहम्मद शकील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की "सर्व व्यवस्था उत्तम केले असून आमची खूप छान काळजी घेतली जाते , स्वच्छतेच्या बाबतीत आरोग्य तपासणी करून आमच्या आरोग्याची काळजी घेतली जाते."
माणूस कितीही बदलला ,प्रगत झाला तरी माणसातील माणूसपणाची संवेदना आजही जागृत आहे तीच संवेदना घेऊन नांदेड जिल्हा प्रशासनाअंतर्गत किनवट प्रशासनांनी या नागरिकांची ज्याप्रकारे मायेने आणि आपुलकीने व्यवस्था केली यावरून असे म्हणता येईल की प्रशासनाचा मानवी चेहरा संवेदना जपत जबाबदारीने काम करते आहे आणि गरजूंना मायेचा निवारा व माणुसकीची प्रचितीच देत आहे.
-मीरा ढास,
प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी,
नांदेड






No comments:
Post a Comment