किनवट :
अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुभाषनगर, किनवटच्या छतावरील टीनपत्रांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
सुभाषनगर येथील पोलिस वसाहतीला लागून जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून या भागातील कष्टकरी, हमाल, रिक्षाचालक, मजूर अशा गोरगरीबांची मुले येथे शिकतात. जुन्या इमारतीचा स्लॅब कमकुवत झाल्याने थोड्याच अंतरावर एका भाडयाच्या इमारतीत शाळा भरविण्यात येत होती. मागील काही वर्षाचे भाडे जिल्हा परिषदेकडे थकल्याने मालकाने इमारतीला कुलूप लावले.विद्यार्थी उघड्यावर आले. जुन्या जागेवर जावे तर नगरपालिकेने वाचनालयासाठी ती जागा आम्हाला दिल्याचे पोलिस म्हणाले.
पालकांनी आंदोलन केल्याने १४ ऑगष्टच्या सायंकाळी पालिकेने पत्र व ठराव देऊन जागा शाळेला दिली. शिक्षकांनी तिथे सकाळी तिरंगा फडकावला. नंतर काय ?
पालिका स्थापनेपासून नागरिकाकडून शिक्षणकर घेत असली तरी एकाही शाळेला कायमची इमारत उपलब्ध करून देत नाही. जागा मालकीची नसल्याने जिल्हा परिषद बांधकामाला निधी देत नाही. अशा अवस्थेत येथील शिक्षकांनी स्वतः खिशातून ८० हजार रुपये खर्चून येथे टिनशेड उभारले. आकर्षक रंगरंगोटी करून ज्ञानदान चालू केले.
लॉकडाऊनमुळे सध्या शाळेला लॉक आहे. परंतु अवकाळी पाऊस व वादळाने छताची ऐशी -तैशी करून शाळेला पुन्हा अवकळा आणली. कोणी कार्यकर्ता, पुढारी मदतीसाठी धावून येईल न येईल परंतु नयाकॅम्प, किनवट केंद्राचे कर्तव्य तत्पर केंद्रप्रमुख रमेश राठोड यांनी पाच हजार रुपये शाळा दुरुस्तीसाठी देणगी दिली आहे. तन मन धनाने आमच्या पाठीशी कुणी आहेत याचे समाधान येथील शिक्षक व्यक्त करत आहेत.




No comments:
Post a Comment