किनवट :
अतिदूर्गम कोलामपोड वस्तीत जाऊन लॅाकडाऊनमुळे उपाशीपोटी असलेल्या
मूळनिवासी अतिमागास कोलाम छपन्न कुटूंबांना पंधरा दिवस पुरेल एवढं अन्नधान्य अभियंता प्रशांत ठमके यांनी वाटप केलं.
कोरोना ( कोव्हीड- 19 ) प्रतिबंधासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारांची उपासमार होत असल्याची खबर लागताच. अनेक सामाजिक कार्यक्रमात अन्नदान करणारे मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी समाजऋण फेडण्याच्या उद्देशाने त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवायचं ठरवलं. प्रत्येकी एक किलो मुगदाळ, मसूरदाळ, गूळ, खाद्यतेल, मीठ, पाच किलो तांदूळ, चहापत्ती, हळद, मिरची पावडर, बिस्कीट,अंघोळीचा व कपड्यांचा साबूण अशा अन्नधान्य साहित्याची किट घरीच तयार केली. याकामी त्यांच्या अर्धांगिणी प्राचार्या शुभांगी ठमके यांनी मोलाचं सहकार्य केलं. किनवट तालुका मुख्यालयापासून चाळीस किमी अंतरावर असलेल्या राज्यपाल दत्तक जावरला ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या काझीपोड व पळशीडाग येथे चिरंजीव सुशांत ठमके यांना सोबत घेऊन छप्पन्न कुटूंबियांना पंधरा दिवस पुरेल एवढं अन्नधान्य वाटप केलं. यापूर्वीही त्यांनी कोलामगुडा, लिंबगुडा व सिडामखेडा येथील पन्नास कुटूबांना अन्नधान्य दिलं आहे.
याप्रसंगी मांडवीचे सहायक पोलिस निरिक्षक संतोष केंद्रे यांनी कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या काळजीबद्दल जनजागृती संदेश दिला. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी गोवर्धन मुंडे, प्रकाश टारपे, अनिरूध्द केंद्रे, रामेश्वर केंद्रे, सूर्यकांत शहाणे, रवि भालेराव उपस्थित होते.






No comments:
Post a Comment