मनसळ... एक विजय (विश्वकर्मा ) अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विविध किमान 35 छोटी मोठी नोकरी करत शिक्षण क्षेत्रात स्थिरावला... आणि तिथेच रमला..एक अजय योद्धा ....मार्गदर्शक...
जि. प. शाळेत विद्यापीठ दर्जाचे काम करणारा.....आपल्या कामामुळे किमान 15000 च्या वर विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांना जि. प. शाळा कशीअसावी. शिक्षण कसे असावे यासाठी आकर्षित करणारा.... संपूर्ण सेवेत विविध स्तरावर किमान 50000 च्या वर लोकांपर्यंत पोहोचून आपल्या कार्याचा ठसा उमटवणारा....
अनेक उपहासात्मक अपमान. विरोध. आरोप यांना शस्त्र बनवून विजय पथावर मार्गक्रमण करणारा...
सुट्टीच्या दिवशी शाळेत कामकरणारा सेवेतुन निवृत्त होतांना सुट्टी होतांना तो पण दिवस सुट्टीचा नियतिचा खेळ....
पुरस्कारापेक्षा ही मोठा माणूस ...
आज नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून निवृत्त होणार आहे... आदरणीय विजय विश्वकर्मा यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देणारा लेख
मनसळचे भाग्यविधाता : विश्वकर्मा सर ३१मे२०२०ला सेवानिवृत्त
सेवानिवृत्तीच्या जड अंतःकरणाने शुभेच्छा!!!
।।शिक्षणक्षेत्र होईल पोरके।।
सिंहाला पहावं वनात, मोराला पहावं रानात,गाडगेबाबांना पहावं कीर्तनात; तसं विश्वकर्मांना पहावं मनसळपँटर्नच्या सादरीकरणात.....
शाळेवरील दोन अडीच तासांचं- जणू चित्रपट पाहतोय,असा भास निर्माण करणारं,स्वयंनिर्मित मनसळपँटर्नचं सादरीकरण आता यापुढे कधीच पाहण्यास भेटणार नाही.... यामुळे या पँटर्नची गंगोत्री-मूळ स्रोत,मूळ रूपात पाहायला भेटणार नाही,हे आपलं दुर्भाग्य!!! इथल्यासारखा प्रयत्न काही ध्येयवेडे करतात, पण विश्वकर्मांची उंची त्यांना गाठता आली नाही... चित्रपटगृहात ३डी चित्रपट पाहणं अन् मोबाईलवर पाहणं,यात फरक असतोच की!!!
आयुष्यभर 'एकला चलो रे'या न्यायानं हा माणूस आपल्या पँटर्नद्वारे आपल्या शाळेच्या मुलांमध्ये खूप खूप रमला... स्वानंदाबरोबर आमच्यासारख्या भेट देणाऱ्यांना परमानंद देऊन गेला...
सादरीकरण करता करता कधी कधी त्यांची ब्रम्हानंदी टाळी लागायची अन् हा शिक्षणमहर्षी ऋषीमुनींच्या 'अहं ब्रम्हास्मि'सारखा 'मैं विश्वकर्मा हूँ'अशी घोषणा करायचा... या मुलांचा मीच रचयिता,मीच निर्माता,मीच भाग्यविधाता असं शिक्षकध्येय ते भावनेच्या भरात घोषित करायचे....
स्वपरिसरात,स्वभागात मनसळ पँटर्न उपेक्षित राहिला,असं तटस्थपणे निरीक्षणातून दिसलं...जिथं पिकतं,तिथं विकत नाही, असंच काहीतरी असावं...
ध्येयवेड्या शिक्षकांसाठी मनसळ ही शिक्षणपंढरी झाली होती...पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनानं वारकऱ्यांना जसा ब्रम्हानंद व्हायचा, तसंच काहीसं मनसळभेटीनं व्हायचं...
"आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण तनमनधनाने शैक्षणिक कार्य केलं की आपल्याला काही कमी पडत नाही... आपल्या लेकराबाळांचं कल्याण होतं,आपलंही होतं... माझंच बघा ना...माझा मुलगा अमेरिकेत आहे. त्यानं मला माझ्या वाढदिवसाला सप्रेम भेट म्हणून कार दिली आहे..." असा आध्यात्मिक स्वानुभवही ते कधीतरी सांगायचे...
प्रसिद्धीपराङमुख अशा या माणसानं विद्यार्थ्यांना कृतीयुक्त,आनंददायी,गुणवत्तापूर्ण शिक्षण भरभरून दिलं;त्याबरोबरच शाळाभेटीला येणाऱ्यांनाही काहीही न राखून ठेवता निगर्वीपणे पूर्णपणे भरभरून दिलं...
वैशिष्ट्यपूर्ण दीर्घ परिपाठ,परिपाठाचे वैशिष्ट्यपूर्ण संचालन, परिपाठातून देशभक्ती, स्वावलंबन नारे ,कथा सांगणे व त्यावर मुलांनी प्रश्न विचारणे,भरपूर सामान्य ज्ञान;;अंकजीना,अक्षरजीना(मराठी, इंग्रजी),काडी ते कोटी,पहिलीच्या मुलांचे कोटीपर्यंत संख्यावाचन लेखन(मी होणार करोडपती),थंडाबर्फ काड्या वापरून बेरीज, वजाबाकी, गुणाकार,भागाकार; मराठीची सांकेतिक भाषा,अक्षरक्रम सांगितला तर शब्द ओळखणे(उदा.3-1-20 सांगितले तरCAT म्हणजे मांजर असं मुलं सांगतात);सांकेतिक भाषेला चित्रशब्दांची-मूळाक्षरांची जोड;एकक-दशक-शतक कल्पना=वस्तूंवरून संख्या लिहिणे,संख्येइतक्या वस्तू ठेवणे,संख्या वाचणे; जिल्हा, राज्य,देश,जग यांच्या कोऱ्या नकाशावर अनुक्रमे तालुके,जिल्हे,राज्य, देश यांच्या नामपट्ट्या ठेवणे-त्यांची वैशिष्ट्ये सांगणे--हे चारही नकाशे पहिलीची मुले विक्रमी वेळात-अनुक्रमे१मिनिट,१.५मिनिट,१.५मिनिट,२मिनिटे पूर्ण करतात... जगाच्या नकाशावर ६०देशांची नावे इयत्ता पहिलीची मुले ठेवतात...,स्थानिक किंमत साहित्य, हसतखेळत बे.व.गु.भागाकार सापशिडीसारखे साहित्य वापरून, दिलेले ३शब्द वापरून कथा,कविता, संवाद तयार करणे,चुटकी (एककासाठी)व टाळी(दशकासाठी)उपक्रम,जमिनीवर लिहिलेल्या एक ते नऊ संख्यांवर २/३खडे टाकणे-ज्यांच्या वर खडे पडतील त्या अंकांपासून संख्या तयार करणे, त्याप्रमाणे मराठी, इंग्रजी मुळांक्षरांवर २/३ खडे टाकणे-ज्या अक्षरांवर खडे पडले त्यापासून शब्द बनवणे; सुईदोरागुंडी,आरसाकंगवा,आजचे तापमान, आजचा सूर्योदय,पक्षी रेस्टॉरंट(पक्ष्यांना चारापाणी), भूतदया(खरडपडले कुत्रे,कुत्री मुलांच्या अधूनमधून हिंडायची,पण-ना मुलांनी त्यांना कधी मारलं,ना शिक्षकांनी!);गतीमंद-मतीमंद मुलांना शिक्षणप्रवाहात आणणे-त्यांना वेगळेपणाची भावना न वाटू देता(ना मुलांनी त्यांचा द्वेष केला, ना शिक्षकांनी),शाळेत मैत्रीपूर्ण, बालकेंद्रीत,आनंददायी वातावरण; ऊन लागू नये म्हणून छोट्याशा मैदानावर हिरवी जाळी(नेट)बांधणे,स्वच्छ स्वच्छता संकुल,कितीही शिक्षक येवोत-त्यांना चहा व फिल्टर पाण्याची स्वखर्चाने सोय,शैक्षणिक साहित्य भरपूर प्रमाणात, इ.उपक्रम मनसळपँटर्नमध्ये आहेत...
अशा या शिक्षणपंढरीला भेट देणाऱ्यांनी स्वर्गीय आनंद अनुभवला.... आणि जे भेट देऊ शकले नाहीत, ते अभागे होत...
मनसळपँटर्न जशास तसा पाहता यावा यासाठी त्याचे अडीच तासाचे नैसर्गिक व्हीडिओ शुटींगही इस्लापूरबीटवाल्यांनी केले....पुन्हा पुन्हा विश्वकर्मांना बघण्यासाठी,प्रेरणा घेण्यासाठी!!!
अशा या मनसळच्या 'आनबानशान'असणाऱ्या आदरणीय श्री.विश्वकर्मा सरांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा!!!आपले भावी आयुष्य आयुआरोग्यपूर्ण,समाधानी,
आपल्या मनाजोगे जावो,हीच प्रार्थना!!! आपल्या शिक्षणकार्यास मानाचा मुजरा!!!आपला मनसळपँटर्न,ध्येयवेडे शिक्षकपण आम्हांमध्ये जिवंत राहो,हीच त्या अनामिकास प्रार्थना!!!
-सूर्यकांत बाच्छे,
शिक्षण विस्तार अधिकारी,
ईस्लापूर ( किनवट )




No comments:
Post a Comment