किनवट : लॉक डाऊनच्या काळात ग्रामीण भागात गोरगरीब कुटुंबावर उद्भवलेली भीषण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन किनवट तालुक्यातील खाजगी बचत गटांचे कर्ज माफ करण्याची मागणी मनसेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की गेल्या कित्येक वर्षापासून किनवट तालुक्यात असंख्य खाजगी महिला बचत गट कार्यरत आहेत. बहुतांश खाजगी फायनान्स कंपन्याकडून या महिला बचत गटांना अल्पव्याज व दीर्घ मुदतीत परतफेड करण्याच्या अटीवर अर्थपुरवठा केला जातो. मागील चार ते पाच वर्षात तालुक्यातील प्रत्येक गावात गोरगरीब शेतकरी तसेच मजुरी करणाऱ्या महिलांना खाजगी फायनान्स कंपन्यांनी दहा हजार रुपयापासून ते एक लाख रुपयापर्यंत कर्ज दिलेले आहे. खाजगी फायनान्स कंपन्यांनी दिलेल्या या पैशावर कित्येक महिलांनी स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला. परंतु मागील दोन महिन्याच्या लॉकडाउनच्या काळात शहरासह ग्रामीण भागातले सर्व व्यवसाय बंद झाले आहेत तसेच मजुरीची कामेसुद्धा कोठेही उपलब्ध न झाल्याने किनवट तालुक्यातील जवळपास सर्वच महिला बचत गटाचे कर्ज थकले आहे.
फायनान्स कंपनी देखील गेल्या दोन महिन्यात बचत गटांना दिलेल्या कर्जाची वसुली केली नाही परंतु शासनाने लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर मागील काही दिवसांपासून या खाजगी फायनान्स कंपन्यांनी महिला बचत गटाकडे कर्जाच्या वसुलीस सुरुवात केली आहे. लॉकडाउन मुळे हाताला काम नाही आणि काम नसल्यामुळे पदरात दमडीही नसलेल्या महिला बचत गटांना कर्जफेडीची चिंता लागली असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून कर्ज परतफेड करणे अतिशय अवघड बनले आहे.त्यामुळे लॉकडाउनच्या काळात ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबावर उद्भवलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने किनवट तालुक्यातील महिला बचत गटाचे खाजगी फायनान्सचे कर्ज माफ करून गोरगरीब महिलांना दिलासा द्यावा अशी मागणी किनवट तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष नितीन मोरे, शहराध्यक्ष सुनील ईरावार, मनविसेचे तालुकाध्यक्ष रोहित भिसे यांनी मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात केली आहे.निवेदनाची प्रत सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment