पुस्तकावर बोलू काही...
" असे आत्मकथन यापूर्वी कुणीही लिहीलेले नाही"
-प्रा.डॉ. प्रकाश मोगले
पुस्तकावर बोलू काही......."संगराच्या पायवाटा" हे मारोतराव गोविंदराव भवरे यांचे 2018 साली प्रकाशित झालेले 277 पेजेसचे आत्मकथन.आर्थिक परिस्थीती बेतास बेत असलेल्या नि इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण झालेल्या माणसाने 277 पेजेस भरतील असे पुस्तक लिहावे, हेच आश्चर्य आहे. मराठीतील महत्वाचे समीक्षक,कवी असलेले डॉ.महेंद्र भवरे यांचे मारोतराव वडिल. महेंद्र भवरे यांनी बापाच्या आत्मकथनाला एक छोटे पण महत्वाचे टिपण लिहिले आहे.त्यात ते लिहीतात " दलित साहित्याच्या प्रांतात आत्मकथनांची लाट आली.मात्र प्रत्यक्ष चळवळीत राबलेल्या कार्यकर्त्यांची आत्मकथने आली नाहीत." हे त्यांचे मत तपासले तर काय दिसते? कार्यकर्ते जनसामान्यांच्या प्रश्नासाठी लढत झगडत असतात. मोर्चे काढत असतात, आंदोलने करत असतात. त्यांना कुठे वेळ असतो लिहायला? रस्त्यावरची लढाई लढणारांनी आपले अनुभव लिहीले नाही अन् ज्यांनी कधिच रस्त्यवरील लढ्यात सहभाग घेतला नाही ते लेखक म्हणून सभा,संमेलनातून मिरवू लागले. मंचावरून रस्त्यावरील लढाई करणार्या समाजाच्या खर्या नायकांची टिंगल टवाळी करू लागले.त्यांच्या फक्त पळवाटाच दाखवू लागले. त्यामुळे एकुणच आंबेडकरीचळवळीला बाबासाहेबांमाघारी दिशाहिनता आली. त्याला बहुतांश कारणीभूत ही लाचारीचं,दैन्यदास्याचं भांडवल करणारी,आत्मकथनं आहेत,असं म्हणलं तर वावगं होणार नाही. म्हणून मारोतराव भवरे यांच्यासारख्या धाडशी,लढाऊ कार्यकर्त्यांची आत्मकथने आली तरच तरूणांना दिशा आणि प्रेरणा मिळू शकेल. अन्यथा पद,पैसा,पुरस्काराचं बलुतं मागण्याचं दुष्ट चक्र थांबणार नाही . डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार,कार्यापासून प्रेरणा घेतलेल्या ध्येयवादी मारोतरावांनी पुसद,दिग्रस,यवतमाळ नि एकुनच विदर्भाच्या ग्रामिण भागात, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नि कार्य रूजविण्याचे महत्वाचे कार्य केले.2. संगराच्या पायवाटा हे आत्मकथन त्यांनी पत्नी मीराला अर्पण केले आहे.दलित समाजासाठी झोकून देउन प्रामामिकपणे कार्य करणारा कार्यकर्ता हा मुळातच कफल्लक असतो.त्याच्या धेय्यवादी,समर्पित कार्यामुळे समाजाचे प्रश्न सुटायला मदत होते पण बायकांपोरांचे प्रचंड हाल होतात.अनेक हालअपेष्टांना तोंड देत त्यांना पतीच्या समाजकार्याची जबर किंमत मोजावी लागते. मारोतरावांच्या माघारी मीराचे, लेकरांचे खूप हाल झाले. घर,गाव,गणगोत सोडावे लागले.लोकांच्या रोजगाराला जावे लागले. हालअपेष्ठांमुळे पोटची तिन लेकरं मेली.नवर्यामाघारी सासुचे अंत्यसंस्कार करावे लागले.पण चुकूनही या माऊलीने मारोतरावांना त्यांच्या नियत धेय्यवादापासून रोखले नाही.3. संगराच्या पायवाटाच्या केंद्रस्थानी आंबेडकरी समाज आहे.लेखकाच्या 81 वर्षातील आयुष्यांपैकी ऊणीपुरी 60 वर्षे त्यांनी समाजसेवेसाठी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार,चळवळ समाजजीवनात रूजण्यासाठी खर्ची घातली.त्यांच्या जीवनातील घटना,प्रसंगांच्या आधारे त्यांचं आयुष्य कळतेच पण त्याच बरोबर आंबेडकरी चळवळी ईतिहास कळायलाही मदत होते. त्यातील गटबाजी, चढऊतार, समजून घेण्यासाठी संगराच्या पायवाटा ऊपयुक्त साधन आहे.4. लेखकाचा जन्म मटण न खाणार्या, धार्मिक वृत्तीच्या कुटुंबात झाला.विठ्ठल रखुमाईची पूर्वापार भक्ती परंपरा घरात होती. साधुसंताची किर्तने ऐकत ऐकत ते लहानाचे मोठे झाले.पंढरपूरला पायी पायी चालत जाणारे मारोतराव बाबासाहेब आंबेडकरांची अकोला येथे होउ घातलेली सभा ऐकण्यासाठी नि बाबासाहेबांना डोळे भरून पाहाण्यासाठी जवळ दमडा नसतांना,खायची प्यायची सोय नसतांना पन्नास ते साठ किमी पायी जातात. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे पंढरपूर ते सारणाथ,बुद्धगयाकडे झालेला मारोतरावांचा हा दुहेरी प्रवास मूल्यात्मक आहे. शारीरिक आणि मानसिक या दोनही अंगाने झालेला आहे. या प्रवासाची ऊजेडगामी कहाणी म्हणजे संगराच्या पायवाटा. 5. डॉ.ऊत्तम अंभोरे यांनी या पुस्तकाला अभिप्राय देतांना लिहीले आहे " असे आत्मकथन यापूर्वी कुणीही लिहीलेले नाही" इंग्रजी,मराठीचे व्यासंगी अभ्यासक असलेल्या ऊत्तम अंभोरे यांनी दया पवारांच्या बलुतं पासून आमचा बाप आणि आम्ही पर्यंतची आत्मकथने वाचली नसतील का? तरीही ते असा अभिप्राय का बरं देउ शकले? त्यांच्या मताची तपासणी केल्यानंतर त्यांचे मत खरे आहे असे दिसते. या अगोदर आलेली बहुतांश आत्मकथने दलित,हरिजन मानसिकतेने लिहीलेली आहेत.या मानसिकतेच्या लेखकांनी आपले/ इतरांचे/ सांगोवांगीचे/ स्वाभिमानशून्य, लाचार, दुबळे,नेभळट,विकृत,लैंगिक,बदफैली अनुभव आत्मकथनाच्या नावाखाली लिहून ईतरांची सहानुभूती मिळवली. ऊदा. बलुतं,अक्करमाशी,ईत्यादी.या आत्मकथनांनी दलित शब्द नि दलितत्व आजरामर केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली झुगारलेलं,नाकारलेलं, दलितत्व या लेखक कवींनी मेडलसारखं कपाळावर मिरवलं. या पार्श्वभूमिवर मारोतराव भवरे यांनी स्वतंत्र,स्वाभिमानी, बंडखोर,संघर्षशील संगराची पायवाट निर्माण केली.या आत्मकथनात लाचारीचं भांडवल नाही तर तीव्र लढा आहे.दैन्याचं,दास्याचं ऊदात्तीकरण नाही तर दोन हात करणारं स्वाभिमानी जगणे आहे.ऊपाशीपोटी राहून ही जिगरबाज माणसे भीमजयंतीच्या मिरवणूकीसाठी गावांशी संघर्ष करतात.एक घटना अत्यंत बोलकी आहे .एका गावातील बाहुबली मुसलमानाचा मुलगा बुध्दवाड्यातील एका महिलेला दिवसाढवळ्या पळवून नेतो. तिच्या सासरकडचे नि माहेरकडचे कुणीच मुसलमानाला जाब विचारून महिलेला परत आणायची हिम्मत करत नाहीत. ही बातमी मारोतरावला समजते, मारोतराव काही माणसांना घेउन मुसलमानाच्या वस्तीत जातात. त्याला जाब विचारतात. तोही समजून जातो नि ती महिला यांच्या हावाली करतो. मारोतराव त्या महिलेला घरी आणतात,एका कार्यकर्त्यासोबत तिचं लग्न लाऊन देतात.तिचं जीवन बदलवतात. अशी घटना दलित मानसिकतेने लिहीलेल्या कुठल्या आत्मकथनात आलीय? म्हणून ऊत्तम अंभोरे सरांचा अभिप्राय रास्त आहे. एकवेळ दाढी करायला पैसे नसलेल्या मारोतरावांकडे विरोधक 20000 रूपयांची ऑफर घेउन येतात. मारोतराव ते पैसे नाकारतात. स्वत: च्या ऊदाहरणाने नि: स्वार्थ कार्यकर्त्याचा आदर्श ईतरांना घालून देतात. विद्रोही कविता लिहून फ्यासिष्ट पक्ष,संघटनाकडून पद्मश्री मिळवणार्या महाकवीपेक्षा मारोतरावांचा त्याग ऊठून दिसणारा आहे. 6. बावणकशी जिवनानुभव,अनलंकृत थेट भिडणारी भाषा,रोखठोक स्वभाव,स्वाभिमानी बाणा,समाजकार्याची तळमळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या चळवळीप्रती असणारी प्रगाढ निष्ठा, ईत्यादी गुणांमुळे संगराच्या पायवाटा या मारोतराव गोविंदराव भवरे यांच्या आत्मकथनाने मराठी भाषेत मोलाची भर घातली, असे म्हणने अनाठायी होणार नाही.
-प्रा.डॉ. प्रकाश मोगले,
नांदेड




No comments:
Post a Comment