किनवट : येथूनच 5 किमी अंतरावरील माहूर मार्गावरील घोटी येथील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने बाजूला थातूरमातूर बनवलेला वळणरस्ता पावसाळ्यापूर्वी भरभक्कम न केल्यास शारदा कंन्स्ट्रक्शन कंपनी कृत्रिम आपत्ती आणून माहूर, मांडवी व मोहपूरचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. तेव्हा संभाव्य नैसर्गिक पूर आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी सजग असणाऱ्या प्रशासनाने कोरोनाच्या प्रादूर्भावात या बाबीकडे कटाक्षाने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
किनवट ते माहूर रस्त्यावर घोटी गावानजीक नाल्यावर मोठा पूल होता. धनोडा ते कोठारी (चि.) पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम नांदेडची शारदा कंन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. माहूर ते किनवट पर्यंत अनेक छोट्या -छोट्या नाल्यावरील पुलाचे काम या कंपनीने पूर्ण केले. परंतु या मार्गावरील सर्वात मोठ्या घोटी नाल्यावरील पुलाचे काम अलीकडे हाती घेतले. जुने पुल तोडून त्याच्या पश्चिमेस नळकांड्या अंथरून त्यावर मुरूम टाकून थातूरमातूर वळणरस्ता तयार केला.
पहिल्याच पावसात हे वाहून जाणार
कशी बशी कामाला सुरूवात झाली. त्यावर परप्रांतातील मजूर कामाला होते. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे काम ठप्प झाले. ते सर्व मजूर आपापल्या गावी गेले. आता काम ठप्प झाले. या नाल्यास पूर्वेकडील डोंगर - दऱ्यातील पाणी वेगाने येते. त्यामुळे पहिल्याच पावसाच्या दणक्यात वळण रस्ता वाहून जाणार!
या एकमेव मार्गाने मांडवी, उनकेश्वर, माहूर, मोहपूर, कुपटी या सर्व भागाकडे जाता येतं. परंतु पुराने रस्ताच बंद झाल्यास पूर्ण वाहतूकीचा खोळंबा झाल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ये-जा करावी लागते. त्याचबरोबर शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी अशा सर्वांना आपापल्या कामासाठी किनवट शहरात यावे लागते. परंतु पावसाच्या पाण्यात हा रस्ताच वाहून गेल्यास हा मार्ग पूर्णत: बंद पडल्यास या कृत्रिम आपत्तीला शारदा कन्स्ट्रक्शन कंपनी जबाबदार राहणार आहे.
एकीकडे पूरग्रस्त 22 गावातील संभाव्य नैसर्गिक पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज आहे. त्यामार्फत अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे हलगर्जीपणामुळे घोटी नाल्यावर कृत्रिमरित्या आपत्ती उभी राहणार आहे. या करीता संबंधित प्रशासकीय यंत्रणेने संबंधित शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीला तंबी देऊन तात्काळ घोटी नाल्यावरील वळण रस्ता पक्का, मजबूत करून घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा आपतकालीन स्थितीत अग्निशमन, अॅम्बुलंस, पोलीस वाहन किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांची वाहने या मार्गावरून नेताच येणार नाहीत. यासाठी तातडीने पूर्व खबरदारी घेणे गरजेचे आहे.




No comments:
Post a Comment