"वाचन " आयुष्यभर आनंद देणारा छंद -भारती सावंत,मुंबई - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, June 12, 2020

"वाचन " आयुष्यभर आनंद देणारा छंद -भारती सावंत,मुंबई


"वाचन " आयुष्यभर आनंद देणारा छंद
-भारती सावंत,मुंबई

        'ए फ्रेंड इन नीड इस फ्रेंड इंडीड' या उक्तीप्रमाणे संकटाच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र असे माणसाबाबत होते. परंतु त्याचा ग्रंथ हाच खरा मित्र असतो. तो त्याचाच खरा सखा सोबती असतो. 'वाचाल तर वाचाल' ही म्हण उगीच नाही म्हटली.प्रत्येक व्यक्तीला काही ना काही छंद असतो जसे पोस्टाची तिकिटे जमविणे, जुनी नाणी जमा करणे, चित्रकला, रंगकाम. परंतु वाचन हा छंद असणारी माणसे फार विरळाच. वाचन हा उत्तम छंद आहे. वाचनामुळे मनोरंजना- बरोबरच ज्ञानप्राप्तीही होते. वाचणाने वेळ खूप चांगला जातो. नवनव्या लोकांच्या लिखाणाची, विषयांची ओळख होते. लेखकाला भेटल्याचा आनंद मिळतो. संगणकाच्या युगात हीच पुस्तकेआपणास इंटरनेटवरही वाचायला मिळतात.
         इंटरनेटवरही याची माहिती सखोल व सविस्तरपणे मिळते. बालपणीच वाचनाचा छंद लागणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबात आजी आजोबा लहान मुलांना गोष्टी सांगत. घरातील ताई-दादा गोष्टींची पुस्तके वाचून दाखवत. त्यामुळे मुलांना आपोआपच वाचनाची गोडी लागे. वाचनाने ज्ञान वाढण्यास मदत होई. पूर्वीच्या काळी गुरुजी वर्गात येण्यापूर्वी सर्व विषयांच्या पाठांचे वाचन झाले पाहिजे अशी त्यांची सक्त ताकीद असे. त्यामुळे प्रार्थना होताच मुले धडे वाचायला चालू करत.  प्रत्येक जण एकेक पान असे वाचन सुरू करत. असे मोठ्याने वाचन करण्यामुळे उच्चार देखील सुधारत असत. सततच्या वाचनामुळे कविता नि धड्यांचे पाठांतरही होई. 
  ‌‌ वाचनामुळे माणूस विचार करू लागतो. पुस्तके वाचून आपले आपण जीवन नव्याने जगू शकतो. थोर स्वातंत्र्यसेनानी, उद्योजक, शास्त्रज्ञ, राज्यकर्ते यांची चरित्रे वाचून नवचैतन्य प्राप्त होते. आपण काहीतरी करावे अशी स्फूर्ती मिळते. संत साहित्याने जगण्याची नवी दिशा मिळते. अध्यात्मिक, भक्तीपर ग्रंथ मनःशांती देतात. वाचनामुळे मनुष्य बहुश्रुत होतो. संतांमुळे व्यवहार किंवा जगण्याची एक नवीन शिकवण मिळते. ग्रंथ आपल्याशी हितगूज करतात. आपण एकटे असलो, आजारी असलो, जवळ कोणी आपली जवळची व्यक्ती नसेल तर हे ग्रंथ आपल्या एकटेपणाची जाणीव दूर करतात.आपल्याशी सुखसंवाद साधतात. सुप्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी आजारपणातच ग्रंथनिर्मिती केली होती. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर हे तुरुंगात असताना ग्रंथ हे त्यांचे सोबती होते. त्यांनी तुरुंगात राहूनच अचाट अशा ग्रंथांची निर्मिती केली. परिस्थितीशी झुंज देण्याची वेळ आली तर माणसाने ग्रंथरूपी सोबत्याची मदत घ्यावी. ग्रंथा सारखा दुसरा सोबती नाही. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामांच्या अभंगगाथा यासारखे ग्रंथ जीवनातील प्रत्येक वळणावर, चढ-उतारावर आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतात. जीवनातील प्रत्येक उपाय कोणत्या ना कोणत्या ग्रंथात आपल्याला पहावयास मिळतात. कधी मन दु:खी असेल तर तत्वज्ञानाचे ग्रंथ मनाला दिलासा देतात. मन आनंदी असेल तर हलक्याफुलक्या कविता नि कथा, कादंबऱ्या वाचताना त्या आनंदाला बहर येतो. विनोदी ग्रंथ मनाची मरगळ घालवायला मोलाची मदत करतात. संसाराला कंटाळून विजनवासात जाणारी मंडळी स्वतः- बरोबर  ग्रंथ सोबत म्हणून घेऊन जातात. त्यामागे वेळेसही ग्रंथ हेच सोबती होय हेच कारण असावे.
       ग्रंथ आपल्याला गुरुप्रमाणे मार्गदर्शन करतात. कोपर्निकसला त्यांनीच मार्ग दाखवला रस्किनच्या ग्रंथांचे वाचन करताच बॅरिस्टर मोहनदास गांधी यांच्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन झाले आणि त्याच क्षणी त्यांच्यातील महात्म्याचा अवतार उदयास आला. चरक, सुश्रुत यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील ग्रंथ आजच्या पिढीलाही मार्गदर्शक ठरले आहेत. थोर व्यक्तींचे चरित्रग्रंथ ध्रुवताऱ्याप्रमाणे मार्गदर्शन करतात, आपणाला योग्य दिशा दाखवतात. हजारो पाकक्रिया, सुरुची, रुचिरा, अन्नपूर्णा यासारखे ग्रंथ गृहिणींना पाककला शिकवतात. खऱ्या सहचारिणी पेक्षा जवळच्या बनतात. एखादी पाकक्रिया बिघडली तरी सख्या हसतात, चेष्टा करतात. परंतु ग्रंथ त्याच्यावर नवीन पर्याय शोधून सांगतात. पु. ल. देशपांडे यांचे पूर्वरंग, अपूर्वाई यासारखे ग्रंथ काकासाहेब कालेलकर, गंगाधर गाडगीळ यांच्यासारख्या प्रवासवर्णनात्मक ग्रंथांच्या सहवासात आपल्याला जगाची सहल घडवते.ग्रंथांना आपण कसेही वागवले तरी ते आपल्याला दूजाभाव देत नाहीत. ते आपल्याला ज्ञानच पुरवत राहतात. चैतन्य, आनंद फुलवतात. म्हणून ग्रंथ हेच आपले खरे सोबती असतात. आणि वाचनाचा छंद आपणास आयुष्यभर आनंदच देऊन जातो.

-भारती सावंत,मुंबई
9653445835

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News