किनवट (रवि कानिंदे) : कर्जबाजारीपणाला कंटाळून किनवट तालुक्यातील मौजे आंदबोरी ( चि) येथील एका ( वय 48 वर्षे ) शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. 12 ) घडली असून याप्रकरणी किनवट पोलिसांनी पंचनामा करून आत्महत्येची नोंद केली आहे.
व्यंकटी गणपत चोपडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून आंदबोरी ( चि) येथे त्यांना चार एकर शेती आहे. मागील दोन-तीन वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील उत्पन्न पदरात पडले नाही.सततच्या नापीकीमुळे दरवर्षी कर्ज घेऊन शेती पिकविण्याची वेळ येत असल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शुक्रवारी (ता.12 ) व्यंकटी चोपडे यांनी त्यांच्या राहते घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.
घटनेची माहिती कळताच किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पार्थिवाचा पंचनामा केला. बोधडी ( बुद्रूक ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार्थिवावर शवविच्छेदन केले. मयत व्यंकटी चोपडे यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली व पत्नी असा परिवार आहे.




No comments:
Post a Comment