किनवट :विद्यमान महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना-2019 ची प्रभावी अंमलबजावणी करून 01 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतच्या काळातील थकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे.महाराष्ट्र शासनाचे सदर निर्णय निश्चितच अभिनंदनीय असून त्यांचे आभार व्यक्त करत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर रकमेचा लाभ देण्याची आग्रही मागणी किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी एका पत्रकाद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सन 2015 पासूनच्या थकीत शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.या पार्श्वभूमीवर सन 2017- 18,2018-19,2019-20 या काळात शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड दिनांक 30 जून 2020 पर्यंत पूर्णता: नियमित स्वरूपात परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही प्रोत्साहनपर रक्कमेची घोषणा शासनातर्फे करण्यात आली होती. परंतु कोविड-19 कारणाने काही शेतकरी कर्ज भरण्यापासून वंचित राहिले असून 30 जून च्या मुदती ऐवजी त्यानंतर भरणा केलेल्या नियमित कर्ज फेडणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना दोन महिने मुदतवाढ देऊन प्रोत्साहन 50 हजार रुपये एवढी रक्कम मंजूर करून थकबाकीदार व नियमित शेतकऱ्यांमध्ये दुजाभावाची वागणूक होऊ नये व भविष्यात नियमित कर्ज फेडीची परंपरा कायम राखण्यासाठी राज्यातील सर्व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम तातडीने मंजूर करण्याचा निर्णय घेऊन तत्काळ कार्यवाही करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आग्रही मागणी किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनी एका पत्रकाद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली असून त्या पत्राची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,कृषिमंत्री दादाजी भुसे यांनादेखील पाठविण्यात आल्याचे नमूद केले आहे. एकंदरीत खरोखरच कर्जमाफीचा लाभ घेणारे आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे दुफळी निर्माण होण्याची परिस्थिती आहे.कारण नियमित कर्ज भरणारे शेतकरी कर्ज फेडून देखील तोट्यात तर थकित कर्ज असलेले शेतकरी फायद्यात अशी अवस्था निर्माण झालेली आहे.या पार्श्वभूमीवर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील न्याय मिळावा त्यादृष्टीने शासनाकडून त्यांना देखील प्रोत्साहनपर 50 हजार रुपये एवढी रक्कम मंजूर करून घेणार असल्याचा मनोदय आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केले आहे.




No comments:
Post a Comment