नांदेड : नांदेड आकाशवाणी केंद्राचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक भीमराव शेळके यांचे मंगळवारी (ता. 21 जुलै रोजी ) दुपारी एकच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या जाण्याने कला, साहित्य व सांस्कृतीक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
भीमराव शेळके यांना सोमवारी अचानक प्रकृती अस्वास्थामुळे नांदेड शहरातील श्री. गुरुगोविंदसिंघजी स्मारक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्रीतून अधिकच प्रकृती खालावत गेल्यामुळे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
काही वर्षांपूर्वी आकाशवाणी नांदेड येथे कार्यक्रमाधिकारी म्हणून ते रुजू झाले होते. येथेच सह केंद्र संचालक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. कला, साहित्य व सांस्कृतीक क्षेत्रामध्ये ते अग्रेसर होते. आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना घडविण्याचे कार्य केले. अनेक वंचित, उपेक्षित कलावंतांना त्यांनी आकाशवाणीवर झळकविले होते. सध्या ते भारतीय बौध्द महासभा सिडको शहर शाखा (दक्षिण)चे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.
उद्या अंत्यसंस्कार होणार
नांदेड, आकाशवाणीचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक भीमराव शेळके यांचे आज सकाळी ११ वाजता येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात भाऊ,पत्नी , दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
परभणी जिल्ह्यातील चुडावा या गावचे ते मुळ रहिवासी होत. त्यांचे प्राथमिक शिक्षण चुडावा येथे तर महाविद्यालयीन शिक्षण नांदेडमध्ये पीपल्स महाविद्यालयात झाले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन ते मुंबईमध्ये आकाशवाणीत कार्यक्रम अधिकारी पदावर रुजू झाले. त्यानंतर नांदेड येथे नव्याने नांदेड आकाशवाणी एफएम केंद्र सुरू झाल्यानंतर नांदेड आकाशवाणी चा कार्यभार त्यांनी सांभाळला. २०१७ मध्ये आकाशवाणीच्या सह केंद्र संचालक या पदावरुन ते सेवानिवृत्त झाले. आकाशवाणीच्या नांदेड येथील सेवा काळात त्यांनी आकाशवाणीला लोकाभिमुख करण्याचे काम केले. ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाला त्यांनी आकाशवाणी खुली करून दिली. खेडोपाड्यातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांचा आवाज त्यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला. मुलाखत घेण्याचे त्यांचे विलक्षण तंत्र होते. आकाशवाणीसाठी विविध सदरे त्यांनी चालवली. आकाशवाणीला विविध पुरस्कार मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान होते. सर्वसामान्य साहित्यिक, कवी, लेखक यांच्यासाठी भीमराव शेळके यांनी आकाशवाणीची दारे नेहमी उघडी ठेवली. त्यांना प्रोत्साहन देऊन लिहिते करण्यात त्यांनी भरीव कार्य केले. कल्चरल असोसिएशन त्याचबरोबर ऑफिसर्स फोरम अशा सामाजिक संघटनामधून त्यांनी अनेक विधायक कार्यामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. नांदेड येथील पंचशील बुद्ध विहाराच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान राहिले. आकाशवाणीमध्ये नवोदित कलाकारांना संधी देण्या सोबतच नैमित्तिक उद्घोषक म्हणून अनेक युवकांना त्यांनी संधी दिली. स्मृतिशेष भीमराव शेळके यांचे निधनाबद्दल नांदेडच्या आकाशवाणी आणि श्रोतृवर्ग वर्गाकडून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
प्रबोधनाचा प्रवर्तक निवर्तला
नांदेड जिल्ह्याच्या सामाजिक, साहित्यिक, संस्कृतिक क्षेत्रासाठी अत्यंत दुःखद बातमी नुकतीच समोर आलीय. नांदेड आकाशवाणीचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले अत्यंत उमद्या व्यक्तिमत्वाचे सह केंद्रसंचालक भीमराव शेळके साहेब यांचं देहावसान.
अविश्वसनीय, धक्कादायक.
नेमकं काय झालं अजून स्पष्टपणे कळलं नाही.
मी प्रा.विकास कदम, डॉ. विजयकुमार माहुरे साहेबांशी संपर्क केला. ते दवाखान्यात त्यांच्या जवळच आहेत. अजून मलाही काही डिटेल कळलं नाही असं ते म्हणाले.
... शेळके साहेबांचं सळसळतं व्यक्तिमत्व चित्रपटासारखं जिवंतपणे समोर उभं राहिलं. त्यांच्या अत्यंत उमेदीच्या वयापासून मी त्यांना अनुभवलंय. सावळ्याशा वर्णाचं अत्यंत देखणं व्यक्तिमत्व म्हणजे भीमराव शेळके साहेब.
कर्तव्यदक्ष, उत्साही, सर्वसमावेशक, प्रकल्भ सामाजिक जाणिवेचा, आकाशवाणीमध्ये अनेक प्रयोग करणारा, नावीन्याचा शोध घेऊन त्याला प्रोत्साहित करणारा, निर्भिड स्वभावाचा नांदेड आकाशवाणीचा कार्यक्रम अधिकारी म्हणजे भीमराव शेळके साहेब.
" बहुजन हिताय बहुजन सुखाय " ही आकाशवाणीची भूमिकाच ते जगत होते.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राच्या संदर्भातलं प्रबोधन आकाशवाणीने केलं पाहिजे, ही भूमिका घेऊन ते जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे कार्यक्रम नांदेड आकाशवाणीच्या वतीने तयार करत होते.प्रसारित करत होते. त्यांची माझी वैचारिक भूमिका सारखी होती म्हणून मैत्रीही घट्ट होती.
भारतात संविधान संस्कृती रुजवण्यासाठी प्रबोधन प्रक्रिया गतिमान करण्याच्या माझ्या आग्रहाला शेळके साहेबांनी फार सक्रिय प्रतिसाद दिला होता. प्रारंभी
माझ्या भाषणांची ' जीवन नीतीमूल्ये ' नावाची एक प्रदीर्घ अशी भाषण मला त्यांनी आकाशवाणीवरून प्रसारित केली. त्या भाषण मालेत स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मानवता, सत्य, शांती, अहिंसा, सेवा, त्याग, करुणा, सहकार, स्वाभिमान अशी सारी सांविधानिक मूल्ये होती. पुढे इ.स.२००२ पासून 'युवा प्रबोधन मंच'च्या माध्यमातून संविधान मूल्यांच्या रुजवणुकीसाठी आम्ही “ संविधान गौरव महोत्सव” हा आगळा वेगळा उपक्रम नांदेड मधून सुरू केला. आमच्या संघटनेच्या वतीने हा उपक्रम घडवून आणत असताना आमचा आग्रह असा होता की शासकीय प्रसारमाध्यमांनी देखील संविधान संस्कृतीच्या विचारांचा प्रचार प्रसार केला पाहिजे. माझ्या आग्रहास्तव, असं म्हणण्यापेक्षा त्यांचीही भूमिका तशीच असल्यामुळे शेळके साहेबांनी संविधानकेंद्री आशय मांडणारे अनेक कार्यक्रम आकाशवाणीवरून घडवून आणले. त्यातला माझ्या लक्षात राहिलेला एक कार्यक्रम म्हणजे संगीत विद्यालयातील अंध विद्यार्थ्यांना मी लिहिलेली आणि इतर काही संविधान गीतं त्यांनी गायला लावली. त्यांच्या त्या गायनाचा कार्यक्रम आकाशवाणीवरून तर प्रसारित केलाच, परंतु त्याचबरोबर एका संविधान गौरव महोत्सवातही तो साजरा केला. ते नंतरही सातत्याने सांविधानिक प्रबोधनाच्या संदर्भातले अनेक कार्यक्रम घडवून आणत राहिले. महाराष्ट्रभरातील सामाजिक चळवळींशी त्यांचे फार चांगले संबंध होते. महाराष्ट्रातल्या इतर काही जिल्ह्यातल्या महत्त्वपूर्ण व्याख्यान मालांमध्ये त्यांनी प्रमुख वक्ता म्हणून मला ग्रहाने पाठवलं होतं.
नांदेड जिल्ह्यातल्या जवळजवळ सार्याच परिवर्तनवादी सामाजिक, संस्कृतिक चळवळींशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. विशेषतः कल्चरल असोसिएशनच्या माध्यमातून चालणाऱ्या प्रबोधनाच्या उपक्रमांमध्ये ते फार सक्रियपणे सहभागी होत असत. सध्या कल्चरल असोसिएशनचं अध्यक्षपद देखील त्यांच्याकडंच होतं. भीमराव शेळके साहेब एक अधिकारी म्हणून वावरत नव्हते, तर एका तळमळीच्या सामाजिक कार्यकर्त्यासारखे वागत होते. निष्ठेने काम करत होते. आकाशवाणीचे सर्व कार्यक्रमही ते कार्यकर्त्याच्या तळमळीनेच राबवत होते. आकाशवाणीसारखं शासकीय प्रसारमाध्यम परिवर्तनाच्या चळवळीचं केंद्र कसं बनवावं याचा एक आदर्शपाठच भीमराव शेळके साहेबांनी घालून दिला होता.
भीमराव शेळके साहेबांचं असं अचानक जाणं मनाला फारच वेदना देणारं आहे. त्यांच्या जाण्यामुळं नांदेड जिल्ह्याच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.
त्यांना मी विनम्र आदरांजली अर्पण करतो.
-प्रा.डॉ. अनंत राऊत




No comments:
Post a Comment