समाजाभिमुख व्यक्तिमत्व : भीमराव शेळके -प्रा. विकास कदम - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, July 21, 2020

समाजाभिमुख व्यक्तिमत्व : भीमराव शेळके -प्रा. विकास कदम


समाजाभिमुख व्यक्तिमत्व : भीमरावशेळके

 -प्रा. विकास कदम
आकाशवाणीचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक भीमराव शेळके हे निवर्तले ; -प्रा.विकास कदम यांनी त्यांना अर्पिलेली शब्दांजली -संपादक

  अतिशय अविश्वसनीय.... धक्कादायक ...लिहिताना हात अडकतोय... डोळे डबडबून गेलेले... काय लिहावे? कसे लिहू की, भीमराव शेळके सर गेले?  भावचिंब अगदी गदगद झालेल्या अवस्थेत मला लिहावे लागतेय... ही जीवनातली भयंकर परिस्थिती अनुभवतोय. दुःख, यातना, वेदना, संकट हे जे काही असते त्याचा परमोच्च बिंदू हा तर नसावा?
◆ प्रसारमाध्यमांमध्ये अतिशय वेगवान अशा आकाशवाणीच्या प्रसारमाध्यमात उच्च पदावर पोहोचणारे अधिकारी भीमराव शेळके अतिशय प्रगल्भ सकारात्मक ऊर्जा शक्तीचे केंद्र होते. परभणी जिल्ह्यातील नांदेड लगतच्या चुडावा गावात त्यांचा जन्म झाला. जन्मापासून संघर्ष त्यांची साथ करीत राहिला. न कळत्या वयातच आईचे छत्र हरवले. वडिलांनीच माया लावत  त्यांना लहानाचे मोठे केले. प्रचंड गरिबी.. दारिद्र्य मात्र तशाही स्थितीत त्यांचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.

◆ नांदेड येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन पहिल्यांदा ते मुंबई येथे आकाशवाणीमध्ये रुजू झाले. त्यानंतर दोन-तीन वर्षात नांदेड आकाशवाणी केंद्रात आरंभीच्या काळात कार्यक्रमाधिकारी म्हणून ते रुजू झाले होते. नांदेड येथे रुजू झाल्यानंतर भीमराव शेळके यांनी आपल्या कल्पक आणि कृतिशील नेतृत्वात नांदेड आकाशवाणीचा चेहरा मोहराच बदलला.

◆ आकाशवाणी लोकाभिमुख करण्यात त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान शब्दातीत आहे. उत्तम प्रशासक, सामान्य प्रश्नांची जाण आणि भान असलेल्या भीमराव शेळके यांनी हरेक माणसाची आकाशवाणीशी नाळ जोडली. नांदेड येथे शहरी श्रोत्यांसोबत ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी श्रोत्याला नांदेड आकाशवाणी ही माझी आकाशवाणी आहे एवढा आपलेपणा निर्माण करून देण्यात भीमराव शेळके यांनी संपूर्ण कसब पणाला लावले.

◆ नांदेड आकाशवाणी घराघरात कशी पोहोचेल याचा भीमराव शेळके यांनी ध्यास घेतला होता. नांदेड आकाशवाणी येथे एक नामधारी अधिकारी म्हणून त्यांनी स्वतःला कधी समजले नाही. आकाशवाणीसाठी निर्धारित प्रशासकीय वेळ सोडून दिवसातील इतर सर्व वेळ सुद्धा भीमराव शेळके यांनी सर्वार्थाने आकाशवाणीसाठी खर्ची घातला. ग्रामीण भागातील श्रोता त्यांच्या केंद्रस्थानी होता. विशेषतः शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या संबंधाने भीमराव शेळके यांना विलक्षण लळा होता.

◆ भीमराव शेळके हे सदैव हसतमुख असे व्यक्तिमत्व होते. दुसऱ्यांच्या दुखात सहभागी होणे, धीर देणे हा त्यांचा अंगभूत स्वभाव होता. आकाशवाणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी अतिशय मनमोकळेपणाने बोलून समोरच्या माणसाला चुटकीसरशी ते आपलेसे करीत. मात्र आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सामान्य ते असामान्य व्यक्तीशी सुसंवाद साधण्याचे त्यांचे कसब अवर्णनीय होते. मुलाखत देणाऱ्याला अगदी सहजपणे ते बोलते करीत. स्टुडिओत मुलाखतीसाठी प्रवेश करणारा माणूस प्रचंड दडपणाखाली आत जायचा आणि बाहेर आल्यानंतर अगदी हसत हसत साहेबांसोबत बाहेर यायचा. मुलाखत आणि भीमराव शेळके हे जणू एकरूप होते. आकाशवाणीसाठी त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले.

◆ भीमराव शेळके यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून जनसामान्यांची मने जिंकली. त्यांचा प्रचंड जनसंपर्क होता. वैयक्तिक स्वरूपात त्यांनी ही नाती जपली. 'प्रत्येक माणसाला आपला वाटणारा माणूस म्हणजे भीमराव शेळके,' ही त्यांची आयुष्याची खरी कमाई. गरजू , गरीब यांना मदतीसाठी त्यांचा हात सदैव पुढे राहायचा. आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुणांना त्यांनी कामाची मोठी संधी दिली. त्याशिवाय विविध क्षेत्रात "मी आज शेळके साहेबांच्या मूळे उभा आहे", म्हणणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

◆ भीमराव शेळके यांनी अधिकारी म्हणून आकाशवाणीत आपली जबाबदारी लीलया आणि यशस्वीपणे पार पाडली. विविध सामाजिक कार्यातही त्यांचा हिरीरीने सहभाग होता. कल्चरल असोसिएशन, ऑफिसर्स फोरम या सामाजिक संघटनांच्या विविध उपक्रमात ते अग्रेसर होते. सिडको भागातील पंचशील बुद्ध विहाराचे उभारणीतही त्यांचे अतुलनीय योगदान राहिले.

◆ भीमराव शेळके यांची २०१७ मध्ये सेवानिवृत्ती झाली. निगर्वी, निर्व्यसनी, निर्मळ मनाचा खळाळता झरा आज अचानक स्तब्ध झाला... आकाशवाणीच्या माध्यमातून झऱ्यासारखं मधुर, मंजुळ ओघवतं बोलणं आता पुन्हा ऐकायला मिळणार नाही... आज समाजाचे मोठे नुकसान झाले आहे... न भरून निघणारी हानी झाली आहे... अनेकांचा आधार गेला.... खऱ्या अर्थाने माझ्यासारख्याचा आधारवड गेला ...याप्रसंगी आदरणीय भीमराव शेळके साहेबांच्या पावन पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन...

-प्रा. विकास कदम

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News