सविता राठोड
सारखणी ( किनवट ) : माहूर कडून किनवट कडे भरधाव जात असलेल्या रेती वाहतूक करणार्या ट्रक क्र. एम एच 3Q 4894 या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक देऊन चिरडल्याने गंगाराम मेघा राठोड वय पन्नास वर्ष राहणारा वानोळा या इसमाचा जागीच मृत्यू झाला. तर चिरडलेली दुचाकी ट्रक खाली गेल्याने पूर्णत: चेंदामेंदा झाल्याचे घटनास्थळी दिसून येत आहे. रविवारी (ता. दोन ) सकाळी सात ते साडे सातच्या दरम्यान माहूर किनवट रोडवर पालाईगुडा फाटा ते सिंदखेड चौरस्त्यावर ही घटना घडली.
सदरची घटना पोलीस ठाण्यात कळतात सिंदखेड पोलीस ठाण्याचे सपोनि मल्हार शिवरकर व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. रस्त्यावर निपचीत पडलेलं प्रेत शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र दहेली तांडा येथे पाठविलं.
वानोळा येथील मयत गंगाजीनगर, करंजी येथून भाजीपाला घेऊन जाण्यास आला होता. नांदेड जिल्ह्यातील टाळेबंदी लागू केल्याचं वेळापत्रक पाहून तो आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी गंगानगर,करंजी येथील शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेऊन गावोगावी फिरून घरोघरी नेऊन विकण्याचा व्यवसाय करत होता. अखेर पोट भरण्यासाठी भटकंती करतांना काळाने घाव घातला व ट्रक अपघातात त्यांना आपला नाहक जीव गमवावा लागला. घटनेनंतर चालक ट्रक तिथेच सोडून पसार झाला.




No comments:
Post a Comment