शाहीर नरेंद्र दोराटे यांचे पँथर चळवळीतील प्रबोधनाचे योगदान.. - महेंद्र नरवाडे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, August 3, 2020

शाहीर नरेंद्र दोराटे यांचे पँथर चळवळीतील प्रबोधनाचे योगदान.. - महेंद्र नरवाडे


प्रबोधन चळवळीत कवी गायक व शाहीराचे योगदान...
शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती  ते लोककवी वामनदादा कर्डक जयंती निमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा विशेष उपक्रम देत आहोत -संपादक 

                  शाहीर नरेंद्र दोराटे यांचा जन्म उमरखेड तालुक्यातील कुरोळी येथे झाला. चातारी येथे त्यांचे सातवी पर्यंत शिक्षण झाले. कोपरा येथील नागोराव परसराम वानखेडे यांनी सुरवातीला गीत गायन शिकविले . तेव्हापासून कुरोळी परीसरात भजनपार्टीच्या माध्यमातून बुद्ध भीमगीते गाण्याला सुरवात केली. खेडोपाडी कार्यक्रम व्हायचे. दोन गायन पार्टीला बोलावून बुद्ध भीमगीतांचा  प्रबोधनपर सामना रंगायचा. समाज प्रबोधन करण्यासाठी आपण पुढे आलो पाहिजे असे मनाला वाटले व स्वत:ला या प्रबोधन चळवळीत झोकून दिले.

                 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीने समाज जागृत झाला होता. समाजात चैतन्य निर्माण झाले.शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा विचार पेरण्याचे काम सुरू झाले. दुसरीकडे मागास वर्गीय लोकांवर जातीयवादी लोक अन्याय करत .अशातच दुष्काळ पडला . लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर १ जानेवारी १९७७ ला नरेंद्र दोराटे किनवट जवळील नागझरी कँपला  कामानिमित्त आले आणि तेथे ते स्थिरावले. किनवट हे शहर त्यावेळी चळवळीचे केंद्र बनले होते. या भागात दलित पँथर  १९७७ ला स्थापन झाली. सामाजिक कार्यकर्ते दादाराव कयापाक  नेतृत्व करत होते. शेख सरदार भाई अध्यक्ष असलेल्या त्या चळवळीत ते सहभागी झाले. पँथर चळवळीने अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढे उभारले होते. त्यानंतर नामांतराचाही लढा तिव्र झाला होता. अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलनं झाली तर यात नागझरी कॅम्प येथील दिगांबर पंडीत, गोमाजी विणकरे, भीमराव भालेराव, जळबा दोराटे, पांडुरंग नरवाडे सोबत असायचे. त्याच कालावधीत नागझरी कँप येथे त्यांनी भजनी मंडळ स्थापन केले.त्रीरत्न गायन पार्टी असं नाव ठेवलं होतं. या भजन पार्टीचे किनवट व आदिलाबाद परीसरात प्रबोधनाचे कार्यक्रम झाले. तथागत गौतम बुद्ध यांचा समतावादी विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष, माता रमाईचा त्याग समाजाला आपल्या पहाडी आवाजात शाहीरीच्या माध्यमातून पटवून देण्यासाठी ते गावोगावी जात. पेटी मास्तर दिगांबर पंडीत, तबला मास्तर भिवा ससाणे, गायक बालाजी वाढवे, कैलास विणकरे आणि शाहीर नरेंद्र दोराटे. असा हा त्यांचा संच  भीमजयंती, बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महापरीनिर्वाण दिन या निमित्ताने गावोगावी जात असत. भाषणं करणे, गीतं गाणे यामुळे लोकं कार्यक्रम ठेवत तेथे त्यांना आवर्जुन बोलावत.

अनेक ठिकाणी कार्यक्रम- किनवट, हदगाव उमरखेड, परभणी, लातूर , हिंगोली, यवतमाळ,  नागपूर, जळकोट, आदिलाबाद, निर्मल ईत्यादी ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम झाले. बौद्धाचार्य या नात्याने आनेकांचे विवाह लावले. या प्रबोधन कार्यामुळे विष्णु शिंदे, दत्ता शिंदे, लक्ष्मण राजगुरु यांची भेट झाली. परीवर्तन कलामहासंघाचा सचिव म्हणुन वीस जिल्ह्यात  फिरता आले. उत्तर प्रदेशात मायावतीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात गीतगायन केले.
                    २०१० मध्ये छत्तिसगढ येथे कार्यक्रम झाला तसेच कर्नाटक बेंगलोर, नंतर हैद्राबाद येथे शासकीय कार्यक्रम प्रा.डाँ. मार्तंड कुलकर्णी यांच्या सोबतीने जनजागृती करीता सादर केला. लेक वाचवा लेक शिकवा, बेटी बचाव बेटी पढाव, पाणी आडवा पाणी जिरवा, तंटामुक्ती, स्त्रीभ्रूण हत्त्या व मतदार जनजागृती या बाबत गीतं लिहिली व शासनाच्या वतीने अनेक ठिकाणी कार्यक्रम सादर केले. परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून  छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते या बाबत नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यात फिरुन जनजागृती केली. नांदेड आकाशवाणीवर प्रबोधनपर गीत गायन केले. आज कलावंत म्हणुन महाराष्ट्र शासनातर्फे व केंद्रशासनाचे मानधन मिळत आहे. तालुक्यातील अनेक उपेक्षित कलावंतांना त्यांनी शासनाचं मानधन मिळवून दिलं. खेड्या -पाड्यात, अतिदूर्गम गावापर्यंत जाऊन वंचित, उपेक्षित, वृद्ध कलावंतांची भेट घेतात. त्यांना प्रोत्साहन व जगण्याचं बळ देतात. अशा माध्यमातून कलावंत संघटनेचं जाळं उभं करण्याचं काम ते नेटानं करतात.

मनपसंत गीतं-
१)त्रिसरणाची मंगलवाणी घुमते आमच्या कानी.
२)काय सांगु तुला आता,भीम माझा कसा होता.
३)आज बहुजनानो,दलित जनानो, संघर्ष आपसातील टाळा|
फुले आंबेडकरांच्या ज्ञानाची दौलत सांभाळा||
४)झडुद्या क्रांतीच्या ठिणग्या खुशाल|
पेटवा मशाल$$पेटवा मशाल||
५)केलीस का गं रमा,जाण्याची एवढी घाई|
मी जनतेच्या सेवेमध्ये,तुझे दुःख जाणिले नाही||
प्रकाशित गीत संग्रह-
१)भीमक्रांतीसूर्य -भाग १(२००३)
२)प्रज्ञासूर्य गीतमाला (२००८)
३)भीमक्रांतीसूर्य-भाग२

पुरस्कार-
१) मराठवाडा समाजरत्न, नागपूर
२) महाराष्ट्र रत्न, नागपूर.
३)क्रांतीसूर्य म.फुले समाज रत्न नागपूर.
४) वामनदादा कर्डक संगीत पुरस्कार, आदिलाबाद.
५) समाज सेवा पुरस्कार, हिंगोली.

आदर्श समाज निर्माण होण्यासाठी धम्माचे काटेकोर पालन करावे, तरुणांनी धम्म प्रसाराचे काम करावे असा संदेश प्रबोधन करतांना देतात. पँथरच्या प्रबोधन चळवळीत हयात व्यथीत करणारे शाहीर नरेंद्र दोराटे यांचे  कार्य निरंतर चालू राहण्यासाठी त्यांना आयुरारोग्य लाभो ही मंगल कामना!

  -आयु.महेंद्र नरवाडे,
किनवट. मो.न.९४२१७६८६५०.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News