लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जयंती ते महाकवी वामनदादा कर्डक जयंती १ ते १५ ऑगष्ट या कालावधीत क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या विशेष उपक्रमात महेंद्र नरवाडे लिखित 'प्रबोधन चळवळीत कवी, गायक व शाहिरांचे योगदान... ' ही लेखमाला देत आहोत. - संपादक
भाग - ५.
गीतकार संतोष मरीबा राऊत यांचा जन्म भीमा कोरेगाव विजयदिनी १ जानेवारी १९४७ ला माहुर तालुक्यातील पाचोंदा गावी झाला. आतिशय प्रतिकुल परीस्थिती. शिक्षण झाले नाही. मिस्त्री काम हा त्यांचा व्यवसाय. वडील तबलावादक,आई पेटी वाजवायची. गायन कलेचा वारसा घरातच असल्याने संतोष राऊत यांना गायनाची आवड निर्माण झाली. घरीच संच तयार झाला. नंतर मुळावा येथील पूज्य भदंत धम्मसेवकजी महाथेरो यांनी मुळाव्याला पहिली धम्म परिषद घेतली. त्या धम्मपरिषदेत त्यांना गीत गाण्याची संधी मिळाली. त्यांचं कर्णमधूर गीत ऐकून भदंत धम्मसेवकजींनी खुप मोठा गायक हो अशी शाबासकी दिली. तेथूनच प्रेरणा मिळाली. नंतर भजन पार्टीत गीतं गाण्याला सुरवात केली.
नंतर तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव वाढत गेला चिंतन सुरू झाले त्यातुनच आपणही आपल्या गीत कल्पना समाजासमोर मांडायला पाहिजे म्हणुन त्यांनी गीतं लिहिली. बुद्ध भिम प्रेरणा गीते हा गीत संग्रह प्रकाशित झाला. भजन पार्टीत स्वरचित गीताबरोबर लोककवी वामनदादा कर्डक यांची गीते गात असत. नंतर ते किनवटला आले. एस.एस.गायकवाड यांची संगीत साथ मिळाली, पुंडलिक घुले, सुदाम मुनेश्वर,जीवन लाठे, तबला साथ अशोक दवणे यांची मिळायची.
अशा रितीने माहुर व किनवट परिसरात गावोगावी जाऊन ते प्रबोधन करीत असत. आजुनही त्यांचं प्रबोधनाचं कार्य अविरतपणे चालूच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीअंताच्या संदेशाची प्रेरणा घेऊन उपेक्षित वडार समाजाची मुलगी सून करून घेतली. यातून आपण बोलके नव्हे, कृतिशिल आहोत, हेच त्यांनी दाखवून दिलं.
मनपसंत गीते-
१) तळागाळातील बहुजनांना देऊनी आधार
आमचा केला भीमाने उद्धार.
२)असता जरी गरीबी,प्रेमाने निट नांदा, थोडावेळ काढून भीम गौतमास वंदा.
३)माणसा माणसा तुझ्यासाठी भीम झीजले किती रे,कशी भ्रष्ट झाली तुझी मती रे.
४)फेक गोधडी भीमसैनिका उठ आता तु पेटुन रं, उठ आता पेटुनी ही बोले भीमाची लेखनी रं
५)भीमा कोरेगावी गावगुंडाने केला आम्हावर हल्ला, तुला लढायचे आहे, समता सैनिक दला.
६)वादळाची झाली सावली रमाई
दिन दु:खीतांची माऊली रमाई.
अशा एकाहुन एक सरस गीत गायनातुन कवी गायक संतोष राऊत यांनी समाजाचे प्रबोधन केले. तसेच शासनाच्या योजनांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी ही त्यांच्या संचाने जनप्रबोधन केले. कृषी अधिकारी दिगांबर तपासकर व मोरे यांनी पाणलोट सप्ताहा निमित्त गावोगावी कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली होती. पाणी आडवा, पाणी जिरवा, फळबाग लागवड या विषयांची गीतं गाऊन त्यांनी जनजागृती केली.
संदेश-
समाज संघटित झाला पाहीजे, तरुणांनी संघटना बांधावी, समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी समता व सुरक्षा यासाठी काम करावे असा संदेश ते समाज बांधवांना देतात.
गीतकार संतोष मरीबा राऊत यांच्या प्रबोधन कार्याला आजुन बळ मिळो ही मंगल कामना!

किनवट जि.नांदेड.
मो.न.९४२१७६८५५०




No comments:
Post a Comment