दलितांचा पॅन्थर : नामांतर शहिद जनार्दन मवाडे -डॉ. अभि. विवेक जर्नादन मवाडे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, August 5, 2020

दलितांचा पॅन्थर : नामांतर शहिद जनार्दन मवाडे -डॉ. अभि. विवेक जर्नादन मवाडे





              


    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्यप्रदेशातील महू या गावात झाला असला तरी त्यांनी मात्र आपली कर्मभूमी सर्वच क्षेत्रात मागासलेल्या, हजारो वर्षापासून मूलभूत हक्कापासून वंचीत राहिलेल्या आणि निजामाच्या राजवटीत अन्याय, अत्याचारांने ग्रासलेल्या ' मराठवाड्याला ' मानली . मागासलेपणाचे मूळ अशिक्षीतपणात आहे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कळून चुकले होते म्हणून औरंगाबाद येथे नागसेन परिसरातील मिलींद या महाविद्यालयीन शिक्षण संस्थेची निर्मिती केली. आचार्य बौद्ध भिक्खू नागसेन यांच्या प्रभावाने प्रेरीत झालेला बौद्धराजा राजा मिलींद एक आदर्श राजा ठरला . नागसेन व मिलींद या नावाने बौद्धधम्माची निव पून्हा मजबूत केली.  

                    मराठवाड्यातील महाविद्यालयीन शैक्षणिक चळवळीचे आद्य प्रवर्तक डॉ . बाबासाहेब आंबेडकर होते असे असतांना देखील कुठल्याही संस्थेला त्यांनी आपले नाव देऊ नये असे मत मांडले म्हणून त्यावेळी या विद्यापीठाला ' मराठवाडा विद्यापीठ ' असे नाव देण्यात आले. त्यावेळी जर या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असे नाव दिले असते तर कदाचित नामांतर शहिदांना आपल्या प्राणाची आहूती द्यावी लागली नसती . ज्या मिलींद महाविद्यालयाची पाया भरणी गोविंदभाई श्रॉफ यांच्या हस्ते झाली ते महाविद्यालय चालणार नाही असे त्यांना वाटत होते. तेच विचार पूढे विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी विरोध करण्यात खर्ची पडले . 
           सन १९५० साली महाविद्यालयाची स्थापना करतांना पूढे विद्यापीठाची गरज भासेल हे स्वप्न बाबासाहेबांचे असतांना गोविंदभाई श्रॉफ यांच्या हयातीत १९५८ साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली . याच मराठवाडा विद्यापीठाला डॉ . बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी तमाम आंबेडकरी जनता प्राण हातावर घेवून रस्त्यावर उतरली. ही अस्मिता गोविंदभाई श्रॉफ शेवट पर्यंत समजू शकले नाही . याची खंत आजही धगधगत आहे . ज्या डॉ . बाबासाहेबांनी समग्र समाजाच्या शैक्षणिक उत्थानासाठी आपले आयुष्य खर्ची घातले . त्यांचे नाव देणे हा भावनिक प्रश्न नव्हता तर ही एक सांस्कृतिक लढ्याची अस्मिती होती , सामाजिक तेढ व दुरावा कमी करण्याची लढाई होती . नामांतराने दलितांना विशेष लाभ होणार होता असे नसले तरी डॉ . बाबासाहेबांच्या नावाला विरोध करुन त्यांच्याच कर्मभूमीत त्यांचाच झालेला आपमान दलित जनता कदापीही सहन करुन घेणार नव्हती . यासाठी दलितांनी कशाचीही पर्वा न करता डू और डाय समजून घराघरातून रस्त्या रस्त्यावर येऊन सतरा वर्ष लढली . या सम्यक क्रांतीच्या यशासाठी ज्यांनी ज्यांनी शहिदत्व पत्कारले ते धन्य झाले . त्यामुळे दलित मनाची संवेदना ताजी झाली . पुरुषांसोबत स्त्रियांचा देखील सहभाग उल्लेखनिय होता . त्यापेक्षा बौद्धभिक्खूचा सहभाग हा सम्यक श्रद्धेची जाणीव करून देणारा होता . १७ वर्षे चाललेल्या या नामांतर लढ्यात १३ जणांना शहिदत्व पत्कारावे लागले . 
           त्यामध्ये उल्लेखनिय नाव प्रथम शहिद जनार्दन मवाडे सुगाव ( बु ) , नांदेड यांचे घ्यावे लागेल त्यानंतर काहि तासाने पोथीराम कांबळे टेभूर्णी हे शहिद झाले . त्यानंतर पुढील १७ वर्षाच्या कालावधीत गोविंदराव भुरेवार ; अहमदपूर , कु . प्रतिभा तायडे , बुलढाणा कु . सुहासिनी बनसोडे , भंडारा , सोलापूरचा शरद पाटोळे अमरावतीचा रोशन बोरकर , औरंगाबादचा कैलास पंडीत , नागपूरचे दिलीप रामटेके , अविनाश डोंगरे , सोलापूरचे नारायण गायकवाड , नांदेडचे गौतम वाघमारे , चंदर कांबळे याही पेक्षा अज्ञात शहिदांची नांवे अनेक आसावीत .
            या लढ्यात प्रत्यक्ष लढणाऱ्यांचा इतिहास काही औरच आहे तो रणांगणावरचा इतिहास सांगतांना अंगावर शहारे उठावेत अन् चळवळीला नविन बळ मिळावं असं होत असातांना शहिदांची फळीच तयार झाल्याचं वाटत होतं . आडीच हजार लोकांच्या उपक्रमाणाला बोथट तलवारीवर एक घाव दोन तुकडे करून फेकणारा सुगावचा शेर शहिद जर्नादन मवाडे मरतांना दिडशे घाव अंगावर झेलून तेव्हढ्याच ताकदिने पाचशे लोकांना प्रत्यक्ष लढा देवून ' भगवान बुद्ध की जय ' म्हणून प्राण सोडला तर दुसरी कडे पोचिराम कांबळे यांनी एकाकी २५० लोकांच्या जमावाला जळे पर्यंत शह दिला .
         भारतीय समाजाला सामाजिक न्याय , समता व बंधूत्वाच्या हक्कासाठी , सम्यक परिवर्तनाच्या चळवळीसाठी अनेक चळवळी उभ्या कराव्या लागल्या . त्याचा गुरुमंत्र महात्मा फुलेंनी दिला . डॉ . बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना लिहून त्याला अंतिम स्वरुप दिले . महाराष्ट्र पूरोगामी आहे . संतांची भूमी आहे . शुरांची भूमी आहे त्या ठिकाणी एका विद्यापीठाला महापुरुषाचे नाव देण्यासाठी येथील दलित जनतेला आत्मबलीदान देवून १७ वर्षे संघर्ष द्यावा लागला ही किती दुर्देवाची बाब आहे . सन १९७१ ला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत नामांतराचा ठराव एकमताने संमत झाला अन् दलितांच्या वस्त्यावस्त्यावर रात्रीला हल्ले करुन जाळल्या जावू लागल्या . मनात सुडाची भावना धगधगत ठेवून ज्यांनी विद्यापीठ कधी स्वप्नात देखील बघितलं नव्हंत त्यांना षंढपणाने सामुहिकरीत्या हल्ले करून ठार मारण्यात आले . दलितांवरील हल्ल्याचा निषेध करणाऱ्या जमावावर नागपूरला गोळीबार केला त्यात पाच लोकं ठार झाले , तर पन्नासहून अधिक जखमी झाले . मराठवाडा विद्यापीठ नामांतर हे काही देशातील पहिले नामांतर नव्हते . त्या आधी छ . शिवाजी विद्यापीठ , लोकमान्य टिळक विद्यापीठ , महात्मा ज्योतीबा फुले यांच्या नावाचे अनेक विद्यापीठ झाली . अनेक नावे दिली व पुढे देतीलही पण त्यांना डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे नाव नको आहे याची कारणे इतिहासाला हवी आहेत . आता पर्यंत बारा विद्यापीठाचे नामांतर करण्यात आलेले असून ते कुणाच्या ही लक्षात कसे आलेले नाही . पण हा नामांतराचा लढा इतिहासात काळाराम मंदिर लढा , चवदारतळे येथील लढा या सारखाच भक्कमपणे दलितांच्या मनात तरळत राहिल . फक्त डॉ . बाबासाहेबांच्या नावासाठी डझनाने शहिद होवू शकतात तीथे कधीही न्याय व हक्कासाठी हजारो शहिद होवू शकतात याची जाण सत्ताधाऱ्यांनी ठेवावी . म्हणूनच नामांतराचा लढा देशाच्या इतिहासात आज अजरामर ठरलेला आहे . सम्यक न्याय व अस्मितेचा मानबिंदू झालेला आहे.
                    दि .२७ जुलै १९७८ साली शासनानं मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत केला अन् नामांतर विरोधी कृतीसमितीने मराठवाड्यात बंद पूकारला. मराठवाडा पेटला याची बोंब करण्यात आली या ठरावांची अंमलबजावणी होऊ नये म्हणून गोविंदभाई श्रॉफ व दैनिक मराठवाडाचे संपादक अनंत भालेराव , नरहर कुरुंदकर यांच्या नेतृत्वाखाली दबावगट निर्माण केला . नियोजनबद्ध पद्धतीने कटाची आखणी करण्यात आली . ज्यांचा नामांतर काय व कशासाठी याचा काडीचा ही संबंध नसलेल्यांची घरे व वस्त्या पेटवली जाऊ लागली . नामांतरचा ठराव पास होई पर्यंत एकत्र राहिलेले पुन्हा मात्र विरोधात कामाला लागले हे चित्र दिसायला लागले . महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाने निर्कज्जपणे खेळलेला हा एक अमानवीय राजकीय खेळ होता . दोन्ही सभागृहात संमत झालेला ठराव या खेळीमुळे १४ जानेवारी १९९४ पर्यंत राजकीय टेबलावर धूळखांत पडलेला होता . या कालावधीत न भुतो न भविष्य ती असा ' लाँगमार्च ' प्रा . जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ते औरंगाबाद निघाला. उद्देश जनजागरण अन् हल्ले थांबवणे एवढाच होता . पण पुढे त्याचे पुर्णपणे राजकीय रुपांतर केले . नामांतरात शहिद झालेल्यांची नावे देखील माहित नसतांना प्रत्येक पुढाऱ्यांनी त्यांची नावे आपआपल्या संघटनेला जोडून त्यांचा पुरेपर राजकीय फायदा उठवला . कुणी मंत्री ही झाले . पण त्यांची कुटुंबाकडे त्यांच्या समस्यांकडे पुन्हा कधी जावून विचारपूस केली नाही . याची खंत शहिद कुटुंबाना नामांतराच्या इतिहासासारखीचं कायमची आठवणीत आहे . शहिद जनार्दन मवाडे यांच्या कुटुंबाना शासनाने पूनवर्सन म्हणून नांदेड मध्ये जागा दिली पण आज नामांतराचा वर्धापण दिवस आलेला असतांना देखील गेली २८ वर्षे ती जागा त्या शहिदांच्या परिवाराच्या नावावर झालेली नसून संबंधीत अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होत आहे ही सत्य परिस्थिती नजरे आड करुन राजकिय पुढारी आपला स्वार्थ साधत आहेत . हीच ती शहिदांच्या बलीदानाची किंमत पुढारी देत आहेत काय ? यापेक्षा का वेगळी पोचिराम कांबळे यांच्या पत्नीची परिस्थिती आहे . भांडे - कुंडे घासून उधरनिर्वाह करतांना नामांतराच्या वर्धापन दिनी समारंभात बोलावले जाते एवढेच ते काय ? त्याहीपेक्षा गौतम वाघमारे यांच्या कुटुबीयाची परिस्थिती आज हालाखीची आहे . तात्पुरती रोजगाराची संधी उपलब्ध करुन पुन्हा वेळ येताच कायमची संधी हिसकावून घेतली जाते यावेळी राजकीय खेळी खेळणार नेते मात्र राजकारणात इतर पेंडालच्या खुऱ्या शोधण्यात मग्न असतात अन् हा अस्मितेचा वर्धापण दिवस आला की मोठ मोठी भाषणं द्यायला लागतात . जी जीवांची पर्वा न करता आत्मसन्मानासाठी जीवाचे बलीदान करतात ते पॅन्थरच असतात ' दलितांचे पॅन्थर ' पण राजकीय नाव वापरुन त्याचा गैरफायदा घेतला याची खंत नेहमी वाटते . 
                    शहिद जनार्दन मवाडे यांची पत्नी ताईबाई जेव्हा १४ जानेवारी १९९४ ला नामविस्ताराची घोषणा झाली तेव्हा विद्यापीठाला डॉ . बाबासाहेबांचे नाव मिळाले या जाणीवेने डोळ्यात पाणी आणून रडतांना विद्यापीठाला डॉ . बाबासाहेबांचं नाव मिळवण्यासाठी कुंक कामाला आलं याचं समाधान डोळ्यात वारंवार तरळत होतं . विद्यापीठाचं गेट डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या कोरलेल्या नावाने कसं दिसत असेल हे पाहण्यासाठी सकाळीच आया बापड्यांची गर्दी जमा झाली होती . प्रत्येक जण विद्यापीठाच्या गेटला हात जोडून अभिवादन करत होते ते अभिवादन डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना होते , न्याय , समता व हक्कांला होते , प्रज्ञा - शिल - करुणेला होते . शिका , संघटीत व्हा संघर्ष करा या मंत्राला होते . 
                      नामांतराचे श्रेय एकदोघांना नक्कीच नाही या लढ्यात लाखो दलितांच्या भावना , वेदना यात गुंतल्या होत्या . ज्या समाजाने सामुहिकपणे रस्त्यावर येवून नामांतरासाठी १७ वर्षे लढा दिला त्या दलित चळवळीचे राजकीय स्वार्थापोटी राजकारण्यांनी तुकडे तुकडे करु  चघळण्यासाठी वाटणी करुन ठेवले . नामांतराने जनतेला स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला तो एक इतिहास झाला. डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला जेव्हा स्वाभिमान शिकविला तेव्हा गळ्यातील मडके अन् कमरेचा झाडू गळून पडला . ज्या हिंदू शब्दाचाच अर्थ ' गुलाम ' होतो त्याच गुलाम समाजानेच इतर जातीला गुलाम करुन अपमानास्पद वागणूक दिली . 
             महारांनी शिकू नये . आपली पायरी पाहून राहवं , प्रगती करु नये , नविन कपडे किंवा स्त्रीयांनी दागीणे घालू नये. या सर्व खुळचट मनुवादी परंपरे विरुद्ध शहिद जनार्दन मवाडे यांनी दंड थोपटले होते . आपल्या गावात कुण्या अबलास्त्रीयांवर होणारा अत्याचार कधी खपवून घेत नसे . त्याला सडतोड उत्तर देत असे . समाजाच्या अनेक अडीअडचणी ते सोडवत असत. भजनी मंडळ स्थापन करुन समाज प्रबोधन करत असत . त्यामध्ये आपल्या कुंटुबासाठी दिवसभर शेतात राबराब राबायचे कधी हात रिक्षा तर कधी मेहनतीचे काम करायचे . या संघर्षाच्या दिवसातच त्यांना नांदेड येथे अग्नीशमन खात्यात नोकरीवर घेतले . होमगार्ड म्हणून ते नेहमी इतरांच्या सेवेसाठी तत्पर असत . तीकडचे काम संपले की आपल्या समाजाच्या सुखं दुःखात सहभागी होवून रात्री अपरात्री ते धावून जात असत ... असाच त्यांचा जीवनक्रम चालू होतो ... अन् ऐकेदिवशी . मराठवाडा विद्यापिठाला डॉ . बाबासाहेबांचे नाव मिळणार म्हणून बोद्धसमाज आनंदित असतांना दुसरीकडे दलितांच्या वस्त्यान् वस्त्या स्मशान होत होत्या . तो दिवस ४ ऑगस्ट , १९७८ चा होता ... त्याच्या दोन दिवस आधी २ ऑगस्ट , १९७८ रोजी नामांतरविरोधी व गावांतील इतर समाजाच्या लोकांची बैठक झाली . बैठक गुप्तपणे बोलावण्यात आलेली होती . सुगाववर हल्ला करुन दलित वस्ती बेचिराख करायची असा पूर्व नियोजित कट शिजला . जर वस्ती जाळली तर जर्नादन मवाडे आपल्याला जिवंत ठेवणार नाही याची भिती त्या सर्वांना वाटली . एकएकाने ओळखून तो बदला घेईल याची शंका त्यांच्या मनात घर करुन गेली . जनार्दनला जीवे मारायचे नसता ते आपल्याला जिवंत ठेवणार नाही , याची सुरुवात म्हणून त्यांनी सुगाव बु ।। येथील प्राथमिक शाळेवर दगडफेक करुन शाळा बंद करण्याचा प्रयत्न केला . ढाण्यावाघ जनार्दन मवाडे यांना ही बातमी कळताच आपल्या साथीदार मित्रांसह शाळेकडे गेला तेव्हा त्याला बधूनच त्या हल्लेखोर २०० लोकांनी तीथून पळ काढला व शाळा पुन्हा सुरु झाली . वाघासारखं धाडस अन् आत्मबळ यामुळे गावांतील सर्व घाबरत असत . पळून गेलेले हल्लेखोर आपमानीत झालेले असतांना त्यांनी उद्या म्हणजे ३ ऑगस्ट , १९७८ ला तेथील सरपंच देवीदास भोसले व पोलिस पाटील प्रल्हाद भोसले यांना ह्या घटनेची माहिती दिली व पंढरपूरहून आल्यामुळे त्यांनी प्रसाद म्हणून मावंदाच जेवण देण्याच्या बाहाण्याने दहा बरा गावची दोन हजार ते अडीच हजार माणसे मारुती मंदिराच्या पारावर बोलावली . बाजूचे गावं मुगाय , थुगाव , सुगाव खु ॥ बोरगांव , कोडतीर , वाघी , बिंदगाव , पार्थी , ढोकी , कानापूर , वलेगाव , दर्यापूर , लिंबगाव , नाळेश्वर , पिंपळगाव इत्यादी गावच्या लोकांना खास मावंदाच्या जेवण्यासाठी बोलवलं . गावाचं रक्षण करणारा पोलीस पाटील तोच दलित वस्तीचा कर्दनकाळ ठरला . त्यांनी जेवण केले . कोंबडे , बकरे कापून दारु प्याली अन् एका इशाऱ्याची वाट बधू लागले , पारावर टाळ मृदूंगांच्या गजरात भजन सुरु केलं . विठ्ठलाचे नामस्मरण सुरु केले जसे पाप करण्या आधीच पापाचा मोक्ष मागत असावे असे वाटत होते ... इकडे जनार्दन मवाडे व त्यांचे साथीदार का लच्या घटने विषयी विचार विमर्श करत रात्र जागत होते . हातात काठ्या अन् बोथट तळवारी दगडावर घासत समाजाला, वस्तीला कसे वाचविता येईल याचाच विचार करु लागले . रात्र अधिकच काळोखी होत होती . टाळ मृदुंगाचा गजर हळूहळू वाढू लागला तो आवाज स्पष्टपणे ऐकू येवू लागला . रात्र जसजशी वाढू लागली तसतसे एकएक हळूहळू झोपण्यास जावू लागले . पण जनार्दन एकटा आपली जूनी तलवार दगडावर घासून पाजळत पहारा देवू लागला . ज्या महापुरुषांच्या चळवळीला महारांनी साथ दिली ज्या जीवा महारामुळे शिवाजीचे प्राण वाचले त्या शिवाजी महाराजाचे नाव घेवून शिवाजी महाराज की जय , ' जय भवानी ' , ' जय शिवाजी'चा जयघोष सुरु झाले .... मारुतीच्या पारावरील घंटा वाजवली . तोच हा इशारा होता .... दलितवस्ती बेसावधपणे रात्रीच्या काळोखात झोपलेली होती एक दोन साथीदाराच्या सोबत जनार्दन तलवार घासत असतांना घंटा वाजल्याचे ऐकू आले अन् मनात पाल चूकचूकली ... हिन्दी सिनेमातील प्रसंगाप्रमाणे घटना अधिकच गुठ होत चालली होती ... जनार्दन तुला उद्या बधून घेवू तुझ्या दलितवस्तीला बी बधून घेवू असा इशारा काळ जमाव पांगतांना त्यांनी दिल्याचे आठवले अन् सैनिकावीणा तो सैनापती बोथट तलावारीच्या ताज्या धारेला हात लावून डोक्याला जर्मनची थाली व वर पटका लपेटून युद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला . प्रथम त्याने घरी धाव घेवून आपल्या लहान मुलांना व पत्नीला आपल्या झोपडी बाहेर काढले व सुरक्षित जागी मित्राकडे लपवले ... वेळ हळूहळू चाल करत होती ... एकच आरडा ओरड हल्लेखोर हातात पेटत्या मशाली , तलवारी , कुऱ्हाडी , भाले , बर्चा , उस तोडायच्या कत्या , लोखंडी सळ्या , लहान मुलांच्या डोक्यांवर दगडांच्या टोपल्या घेवून दलित वस्तित पाठीमागून घुसले जिकडे जनार्दन मवाडेचे घर होते , झोपडी होती . जमावाने संपूर्ण गावाची नाके बंदी केली . प्रथम जनार्दनचे घर जाळण्यात आले . त्यांना वाटले जनार्दन व त्याचे मुले पत्नी घरात असतील तर सर्वांना एकदाच जाळून टाकले पाहिजे म्हणून रॉकेल ओतून मागून व पुढन घर जाळण्यात आले .... उभा संसार , घर , भांडी कुंडी , कपडा लत्ता , पैसे सारे सारे हळूहळू बेचिराख होतांना दिसत होते ... . झोपडीचा आगडोंब झाला जसा सकाळी सकाळी सूर्य उगवावा अन् लाल भडक गोळा दिसावा तसे झाले होते .... दलितवस्तीतील घरं जशी जळू लागली तशी एकच धावपळ व हाहाकार माजला . लोक सैरावैरा पळू लागले . लहानमुले घाबरुन आईच्या कुशीला बिलगली . काही लोकं झाडावर चढून जीव घेवून बसली . हल्ले खोर ' धरा , मारा ' च्या आरोळ्या देत ' जाऊ देवू नका खतम करुन टाका ' या घोषणा देत स्त्रीया मुलं म्हातारी माणसं यांना काठ्यांनी बेदम मारत होती . हाताने धरुन फरफटत नेत होती . दलितांचा आक्रोश धावा , वाचवा - वाचवा , मेलो ... कुणाला ऐकायला देखील येत नसावा . इकडे जनार्दन साथीदारांना शोधत हल्ले खोरांवर तुटून पडला होता . साथीदार जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळून लपून बसले . कुणी गावाच्या मागे गेले , कुणी गवऱ्याच्या हुडव्यात जावून लपून बसले ... रात्री एकत्र राहिलेले साथीदार ऐन वेळी दिसेनासे झाले ... प्रतिकार निकराने चालू होता . सैनिकांविना सैनापती विजयसाठी प्राणपणाने लढत होता . हल्लेखोरावर झालेले सपासप वार त्यांना घायाळ करत असतांना नजरा साथीदार शोधत होत्या पण ... कुणी दिसत नव्हते . ऐकु येत होता तो ' मेला - वाचवा ' मारा - सोडू नका चा आवाज . हल्लेखोर पूर्णपणे माणसूकी विसरुन आपला राग शांत करत होते ... प्रत्येकांच्या घरात घूसून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा व बुद्धाचा फोटो बाहेर फेकून फोडत होते ... मौल्यवान सामानाची चोरी करुन घरं जाळून टाकत होते . जीथे जाता येत नव्हते तिथे आगीचे बोळे फेकत होते . हातातील मिरची पावडर स्त्रीया - मुलं , म्हातारी माणसं यांच्या डोळ्यात टाकून त्यांना मरे पर्यंत काठ्यांनी झोडपत होते . त्यांना माणसांची दया आली नाही. पण गोठ्यातील आगी मात्र लावण्यात येत होत्या . सर्वत्र हाहाकार , जाळपोळ , आरडाओरडा , धावा - मेलोचा आक्रोश ... सर्व कसं मने विषन्न करणारं दृश्य . सैरावैरा धावणाऱ्या लोकांवर डोक्यावर लहान मुलं दगडांने भरलेल्या टोपल्यातून दगडांचा तुफान वर्षाव होत होता . दगडा दगडाला लोकं घायाळ होऊन पडू लागली ज्यांना मरे पर्यंत मारले ते फरफटत आसरा शोधू लागली . अनेक रक्तबंबाळ झाले , अनेक बेहोश झाले . अनेक तर मरनासन्न पडलेले तुडवल्या गेले . जनार्दनचे घर जळत असतांना त्यांनी दुरुनच पाहिले , डोळ्यात उभा संसार जळतांना पाहूण मन गहिवरुन गेले . घरातील सामान काढण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता . त्यापेक्षा हल्लेखोरांना प्रतिकार करणं जास्त महत्वाचं त्यांनी समजून पुन्हा लढण्यासाठी मागे फिरला . ७५ दलितांच्या घरापैकी ६५ घरे जाळून बेचीराख झाली . एवढेच करुन हल्लेखोर थांबले नाही . तर त्यांनी पाण्याचे रांजणं - मडके काठ्यांनी फोडले व घायाळ लोक पाणी पीतील म्हणून दलितांच्या त्या सार्वजनिक विहिरीत एन्ड्रील सारखे विष टाकले जेणेकरुन सर्वच मरु न जातील. केवढा हा क्रूरपणा अन् अन् जातीयवाद ..... आपआपले माणसे ओळखू येण्यासाठी त्यांनी प्रत्येकाच्या बनीयनवर मागून व पुढून लाल रंगाने फुल्या मारल्या होत्या . त्यांचे इशारे त्याच्यासाठी त्याचे मनसूबे पक्के करत होते . हल्ला चालूच होता सकाळचे ५ वाजले असावेत. इकडे जर्नादनची पत्नी आपल्या लहान तीन मुलां सोबत एका घरात लपून वसलेली होती . दोन मुलांना उतरंडीत घालून एकावर एक एका कोपऱ्यात रचून लपून ठेवले . एका दोन वर्षाच्या मुलाला जवळ घेवून आपल्या पतीची वाट पाहत खिडकीकडे नजर लावून भयभीत झालेली . एवढयात ढाण्यावाघ पॅन्थर सारखा खिडकीत येवून आपलं कुटूंब सुखरुप आहे किंवा नाहि म्हणून डोकावून पाहतांनी पती - पत्नीची नजरा नजर झाली . उद्याची स्वप्न जळतांना डोळ्यात आसवं तराळली . एकमेकांना इशारा केला . आपण सुखरुप आहोत असा डोळ्यांनी इशारा केला . तसा मर्द जनार्दन पुन्हा हातात तलवार घेवून जीथे आरडाओरड होत होती तीकडे धावत गेला .... तेवढ्यात हल्लेखोरांचा जमाव त्या घरात दरवाजा तोडून शिरला ... कुठे आहे जर्नादन आज त्याला आम्ही जिवंत ठेवणार नाही ... विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव पाहिजे काय ? त्याची सर्व खानदान जाळून टाका . त्याची मुलं कुठं आहेत त्यांना जळत्या घरात टाका , त्याचं बी ठेवू नका .... हल्लेखोर ओरडत होते ... मारा त्याच्या पत्नीला ... जाळा .... जाळा पलीकडल्या गावातील एक हल्लेखोर म्हणाला ... आरे ह्या लेकबाळीन काय केलं .. . हिला मारुन काय मिळणार आहे ... पण जनार्दन वाचला तर आपल्याला जिवंत ठेवणार नाही .... त्याला शोधा ... पळा ... पळा ... नकटया नाणेराव नाव होतं त्याचं त्यानं जाता जाता जनार्दनच्या पत्नीचं ताईबाईचं तीच्याच पदरानं कुंक पुसलं . .. अन् जमाव वाघाच्या शोधात निघाला . ताईबाईच्या कपाळाचं कुंकू पुसण्याचं घाडस करणारे हात कलम झाले असते जर त्या मर्द जनार्दन ने पाहिले असते तर ... पण तो तर इतरांचे प्राण वाचविण्यात ... लढा देण्यात गुंतला होता . ताईबाईच्या डोळ्यात ज्वाला उफाळू लागल्या एका दिड वर्षाच्या मुलाला कडेवर घेवून पतीला शोधण्यास बाहेर पडली ... सकाळचे ६.३० वाजले असतील सुर्य मातीतून निघाला होता ... जळणाऱ्या झोपड्या पुढे फिका दिसते होता ... सर्वत्र हाहाकार माजलेला . हल्लेखोर हळूहळू जमा होऊ लागले शंभर ... दोनशे ... तीनशे ... पाचशे ... कुणीतरी ओरडले ... तीकडे आहे जनार्दन ... आपल्या लोकांना तलवारीने मारत आहे ... चला ... सर्व जमाव त्या दिशेने निघाला हल्लेखोरांना लढणाऱ्या मर्द जनार्दनला घेरले . जनार्दनच्या अंगात भिमशक्ती संचारलेली होती . तलवारीच्या मुठी वळल्या चक्रव्यूव्हात शिरल्याप्रमाणे जनार्दन हल्ले खोरावर जोरदार सपासपवार करु लागला . एक एक हल्लेखोर रक्ताळून जमीनीवर कोसळू लागला ... तसा एक एक माणूस पूढे येवू लागला ... पहिला घायाळ झालेला उचलून नेवू लागले ... एका मागून एक तलवारीचे वार ५०० शत्रूशी झुंज देत होते . जनार्दन  देहभान विसरुन गेला होता . त्याला फक्त पूढे हल्लेखोर दिसत होते . शासनाच्या फायर फायटिंग व होमगार्ड सेवेमध्ये प्रशिक्षण घेतलेला जनार्दन शत्रूवर एका योध्यासारखा तुटन पडला होता . युद्ध व्हावे तसेच वाटत होते .... इकडे त्याची पत्नी त्याचा शोध घेत कपाळाच्या कुंकवाला सावरत होती . हल्लेखोरांचे एक एक वार अंगावर झेलत निकराने तलवार चालवत होता ... एकटा ढाण्यावाघ ... मर्द जनार्दन अन् दुसरीकडे ५०० हल्लेखोर जनार्दन संपूर्ण रक्ताने अन् एक एका जखमेने न्हावून निघत होता ... एक एक घाव अंगावर वाढत होता . तरी देखील मुठीतली तलवार गळून पडली नाही . तेवढाच जोश तीच ताकद ... हल्लेखोरांपुढे एकटा जनार्दन किती वेळ लढणार ... तेवढ्यात वाघीच्या गन्यामांगाने डाव साधला .... घरावर जावून लढणाऱ्या जनार्दनच्या अंगावर फास फेकला ... हा डाव षंढ होता ... हल्लेखोरानी पिंजऱ्यातील वाघावर , जनार्दनवर सपासप वार कराच सुरुवात केली ... सर्व जन सैतानासारखे तुटून पडले ... पाऊस भिरभिर चालू होता .... जसा जनार्दनला सलाम करत त्याला अखेरचा निरोप देत असावा ... पाहता पाहता जनार्दनच्या अंगावर दिडशे घाव झाले .... वाघ फडफडत धारातीर्थ पडला ... इतिहासात आज पर्यंत कुठे असा पराक्रम नोंदला गेलेला नाही . जीथे एकट्या पराक्रमी मर्दाने ५०० लोकांशी शौर्याने लढा देवून एक इतिहास केला . अंगावर घाव , पडत असतांना अखेरचा सलाम म्हणून ' डॉ . बाबासाहेब आंबेडकर की जय ... भगवान बुद्ध की जय ' म्हणून आपला प्राण डोळ्यातून सोडला ... जसा जाता जाता डोळ्याने जाब विचारावा ... जनार्दनचे उघडे डोळे पाहून हल्लेखोरांना वाघ मेला ह्यावर विश्वासच बसेना म्हणून पुन्हा मेलेल्या जनार्दनवर षंढ हल्लेखोर घाव घालून वर उसळणाऱ्या रक्ताचा टिळा कपाळाला लावून शिवाजी महाराज की जय ची घोषणा देत ... आम्ही वाघ मारला .... म्हणून एक एक निघून जात होते ... सकाळचे ७.३० वाजले. पत्नी शोधत आपल्या वाघाकडे आली. अन् पडलेला वाघ अन् घट्ट रक्ताचा वाहणारा पाट पाहून धायमोकळून रडू लागली . कुणी पाण्यासाठी विहिरीवर गेले तर रात्री टाकलेल्या ' एंड्रील ' मुळे मासे मरुन वर तरंगताना दिसत होते ... कुणीही पाणी पीले नाही ... सगळीकडे शोककळा .... घरांच्या जळणाऱ्या धगधगत्या ज्वाला ... दलितांचा पॅन्थर मर्द जनार्दन शहिद झालेला ... उध्वस्त जीवन अन् जळालेला संसार डोळ्यात टिपून घेत ... खळखळणारे ताईबाईचे डोळे कोरडे पडू लागले ... मर्द जनार्दन स्वाभिमानी वाघासारखा लढला ... शेवट पर्यंत झुकला नाही ... मोडला पण वाकला नाही .... ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. कुणाचा विश्वास बसेना म्हणून की काय पोलीस सुद्धा तीन तासाने उशीरा आली .... सगळीकडे जमावबंदी ... कपर्यु ... लागू केला . पोलीस बंदोबस्तात एका दलितांच्या पॅन्थरला नांदेडला नेण्यात आले .... पाऊस हळूहळू चालू होता ... पतीच्या मृत देहा सोबतच ताईबाईने आपल्या मुलांसह सुगाव सोडले ... ना राहायला घर ना खायला काही ... पुढचा संघर्षमय प्रवास अता सुरु होणार होता ... त्या संघर्षाची सुरुवात पुन्हा एकदा लढण्यासाठी ताईबाई नांदेडच्या दिशेने चालू लागली ... तो ही एक इतिहासच आहे ... शासनाच्या छळवणूकीचा .... न्याय देण्याऱ्या कोर्टाचा ... अन् आयुष्याचा .... ! नामांतर शहिद जनार्दन मवाडे यांचा खरा इतिहास बाजूला ठेवून चुकीची माहिती पुढे करणारे खूप आहेत ... खरा इतिहास पुस्तक रुपाने पुन्हा एके दिवशी तो शब्दबद्ध होणार आहे .... त्याची तमाम आंबेडकरी जनतेला प्रतिक्षा राहील ... !

- डॉ. अभि. विवेक जनार्दन मवाडे,
मो.न. 9665533671


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News