किनवट : तालुक्यातील अतिमागास आदिवासी बहुल गावात ताटव्या कुडाची घरं, त्याकुडाला शेणामातीचं लिंपण देऊन सारवलेलं. ना येथे आरसीसी घरं, ना गिलाव्याच्या चोपड्या भिंती. मग मुलांना घरच्या घरी अभ्यास द्यायचा तरी कसा ? मग येथील शिक्षकांनी नवी युक्ती लढवली. शेणामातीनं सारवलेल्या कुडाच्या भिंतीवर अक्षरांचं लेणं लिहून चिमुकल्या लेकरांना दिलं अभ्यासाचं देणं.
सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असतांना शिक्षण विभागाने "शाळा बंद शिक्षण सुरु " हा ऑनलाईन- ऑफलाईन उपक्रम सुरु केला. परंतु आजही ग्रामीण भागात ब-याचशा पालकांकडे स्मार्ट फोन नाही. ज्यांच्याकडे आहे तेथे कव्हरेजची अडचण आहे. या सर्व अडचणीवर मात करीत जि.प.प्रा.शा.दिगडी (मं.) केंद्र-मांडवा येथील उपक्रमशील शिक्षक प्रसन्न धात्रक हे या उपक्रमांतर्गत गृहभेटी देवून विद्यार्थ्यांना घराच्या बाहेर त्यांच्या सोयीनुसार कुडाच्या शेणा-मातीने साखलेल्या भींतीवर तर कुठे रिकाम्या पत्र्यावर अक्षर, संख्या, शब्द व इंग्रजी मुळाक्षरे देवून विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेत आहेत.
मंदिराच्या पारावर त्यांनी स्वत: फरशी रेखाटन करून विद्यार्थ्यांना अभ्यास दिला. मुले हवे तेव्हा जाऊन मास्क व सामाजिक अंतर यांचे भान ठेवून शिकत आहेत, अशा मुलांसाठी हा उपक्रम स्तुत्य आहे. गावक-यांनी दोन्ही शिक्षकांचे कौतूक केले. त्याच बरोबर शिक्षकांनी स्वखर्चातून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना उजळणी पुस्तकाचे वाटप केले. भींत तेथे फळा हा उपक्रम राबवून दुर्लक्षित भींती, पत्र्याचे टीन शेड, निरुपयोगी बॅनर याचा उपयोग लिहिण्यासाठी सुंदर प्रकारे केला. या कामी त्यांना सह शिक्षक संदीप इंगोले, केंद्रीय मुख्याध्यापक गोवर्धन मुंडे, केंद्रप्रमुख बी. व्ही. थगनारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमाबद्दल गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, शिक्षण विस्तार अधिकारी नाना पांचाळ, सरपंच व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.






No comments:
Post a Comment