इंग्रजाच्या जुलमी गुलामगिरीतुन दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. परंतु हैद्राबाद संस्थानमधील लोकाना स्वातंत्र्य मिळाले नव्हते. हैद्राबाद संस्थानचे निजाम राजे यांनी आपला प्रांत स्वतंत्र भारतात समाविष्ट करण्यास तयार नव्हते. निजाम सरकारच्या काळात लोकांचा खूप छळ होत असे. त्यांच्या या कार्यकाळात अनेक लोकांना अतोनात त्रास सहन करावा लागला. निजामाचा सेनापती कासीम रझवी अत्यंत क्रूर आणि राक्षस प्रवृत्तीचा होता. त्याचे सैन्य लोकांच्या घरात घुसून मारहाण करत असत. त्या राज्याच्या सैनिकांना रझाकर असे म्हटले जाई. रझाकरचे सैनिक प्रांतातील हिंदू लोकांवर अनेक प्रकारचे अत्याचार व जुलुम करीत असत. दिवसेंदिवस त्यांचा छळ वाढत चालले असताना समाजातून सुद्धा त्याला मोठा विरोध मिळू लागला. हैद्राबाद मुक्ती संग्राम चळवळीचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. त्यांना गावोगावी अनेक लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. याच कालावधीत या रझाकार सैनिकांनी गोविंदराव पानसरे यांचा नांदेड जिल्ह्यातील अर्जापुर येथे खून केला . त्याचे पडसाद समाजातून फार मोठ्या प्रमाणावर पडले. भारताचे पोलादी पुरुष असलेले सरदार वल्लभभाई पटेल हे त्यावेळी भारताचे गृहमंत्री होते. लोकांचा जनक्षोभ आणि पटेलांची कणखर वृत्ती यामुळे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना दोन दिवस उलटल्यानंतर म्हणजेच 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलिनीकरण करण्यात आले आणि आताचा मराठवाडा त्यादिवशी खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला.
या मराठवाडा मुक्तीसंग्रामात अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता लढा दिला. यात संपूर्ण मराठवाडा विभाग सुध्दा सामिल झाला. अर्थातच इंग्रजांनी दीडशे वर्षात जेवढा अत्याचार किंवा जुलुम केला नाही त्यापेक्षा किती तरी जास्त त्रास या कालावधीत लोकांना सहन करावा लागला हे सत्य सांगतानाही लोकांच्या अंगावर आजही काटा उभा राहतो. या लढ्यातील काही प्रमुख व्यक्ती ज्यांच्यामुळे हा लढा यशस्वी होऊ शकला.
स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागेल. त्यांचे खरे नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर असे होते. ते संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे प्रमुख होते होते. रामानंद तीर्थ यांचा जन्म 03 ऑक्टोबर 1903 रोजी विजापूर जिल्ह्यातीलसिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबाजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले. हैदराबाद येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रझाकार’ या संघटनेने मराठवाडा जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. सन १९७२ साली त्यांचे हैदराबाद येथे निधन झाले. नांदेड येथे त्यांच्या नावाने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ संकुल उभारण्यात आले आहे.
हुतात्मा गोविंदराव पानसरे -
मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिला बळी म्हणजे गोविंदराव पानसरे असल्याची नोंद इतिहासात आढळते. हुतात्मा गोविंदराव पानसरे यांनी कसलीही पर्वा न करता आपल्या प्राणाचे बलिदान दिले. गोविंदराव यांच्या वडिलांचे नाव विनायकराव तर आईचे नाव यमुनाबाई होते. त्यांचे मामा शंकरराव हे स्टेशन मास्तर होते. त्यांच्याच घरी 15 मे 1913 रोजी बदनापूर येथे त्यांचा जन्म झाला. गोविंदराव अवघे सहा महिन्यांचे असतांना त्यांचे आई-वडील वारले. अशा अनाथ गोविंदरावचे पालनपोषण आणि शिक्षण त्यांच्या मामांनी केले. मामाची बदली धर्माबादच्या रेल्वे स्टेशनमध्ये झाल्यामुळे ते धर्माबादला स्थायिक झाले. गोविंदराव हे अत्यंत बुद्धिमान, विचारी आणि चिकित्सक होते. ते स्वाभिमानी, स्वावलंबी आणि प्रखर राष्ट्राभिमानी होते. जीवनभर विवाह आणि नोकरी न करता जनसेवा करण्याचे व्रत त्यांनी घेतले आणि वागले देखील. वयाच्या ३३ व्या वर्षी गोविंदराव पानसरे यांची अर्जापूरजवळ रझाकारच्या लोकांनी हत्या केली. २१ आॅक्टोबर १९४६ रोजी बिलोलीच्या न्यायालयातून धर्माबादकडे बैलगाडीतून जात असताना रजाकाराच्या जुलमी सत्ताधाऱ्यांनी त्यांची हत्या केली. त्यांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे म्हणून अर्जापूर येथे स्मारक उभारण्यात आले़ असून धर्माबाद शहरातही असे स्मारक उभारण्यात आले आहे. त्यांच्या नावाने अर्जापुर व धर्माबाद येथे शाळा आणि महाविद्यालय देखील उघडण्यात आले आहेत.
गोविंदभाई श्रॉफ हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात. त्यांचा जन्म 24 जुलै 1911 रोजी कर्नाटक राज्यातील विजापूर येथे झाला. हैदराबाद राज्याचे त्रिभाजन करून भाषिक राज्ये निर्माण करावीत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मराठवाडयाच्या विकासप्रश्नांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली. शिक्षण आणि खादी या दोन क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. श्री सरस्वती शिक्षण संस्था, औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापिलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई इ. शिक्षणसंस्थांचे ते एक मार्गदर्शक व पदाधिकारी होते. मराठवाडा विदयापीठाच्या स्थापनेसाठी, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ स्थापन करण्यासाठी आणि औरंगाबाद रेल्वे विभाग ब्रॉडगेजवर आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भाऊराव भिमाजी पाटील मतसागर
औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील जरूळ या गावी सन १९२३ साली श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणापासून त्यांना वंचित रहावे लागले. तथापि प्रचंड जिज्ञासा व इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी मोडी लिपी आणि मराठी भाषेसह तेलुगू, गुजराती, ऊर्दू, इंग्रजी या इतर भाषादेखील स्वपरिश्रमाने आत्मसात केल्या. त्याचबरोबर त्यांनी पौराणिक ग्रंथांचे विश्लेषण करून इतिहास संशोधन केले. हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाऊराव भिमाजी पाटलांचे तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे योगदान व त्यांनी उचललेले कष्ट विशेष उल्लेखनीय आहेत. आपल्या जरूळ येथील स्वतःच्या घरावर त्यांनी भारताचा तिरंगा फडकावल्यामुळे निजामी राजवटीत रझाकारांनी त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. त्यानंतरही लाठीहल्ल्यात जखमी होऊन बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी भारतीय ध्वज उतरविला नाही.
औरंगाबाद येथे केलेल्या सत्याग्रहामुळे श्री. माणिकचंद पहाडे यांच्यावर रझाकार फारूकी यांनी अत्याचार केल्यामुळे तेथे पुन्हा कुणीही सत्याग्रह करण्यास धजावत नव्हते. श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांनी हे आव्हान स्वीकारून तेथील सिटीचौकात सत्याग्रह केला. त्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला, तसेच फटक्यांची (टिकटिकीची) सजाही सुनावण्यात आली. परंतु तुरुंगातील सर्व राजकीय कैद्यांनी या सजेविरूद्ध पुकारलेल्या आंदोलनामुळे ही सजा मागे घेण्यात आली. हैद्राबाद मुक्तिसंग्राम संघर्षानंतर त्यांनी औरंगाबादेतील सामाजिक व राजकीय कार्यात भाग घेतला. श्री. विनायकराव पाटील यांच्या सोबत त्यांनी शिक्षण प्रसार आणि सामाजिक सुधारणांच्या कामी स्वतःला वाहून घेतले. याची दखल घेऊन थोर समाजसुधारक श्री. धोंडो केशव कर्वे यांनी त्यांना पारितोषिकही प्रदान केले होते. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती श्री. वि. वि. गिरी यांनी त्यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन सामाजिक आणि शेतकऱ्य़ांच्या समस्यांवर त्यांच्याशी चर्चा केली, तसेच तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील भरीव योगदानाबद्दल त्यांना ताम्रपत्र बहाल केले. कृषिक्षेत्रातही श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांनी आपल्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवून ओसाड शेतजमिनीवर भरघोस उत्पादन घेऊन दाखविले. ह्या कामगिरीबद्दल त्यांना तत्कालीन राज्यपाल अली यावर जंग यांनी १९७० साली शेतीनिष्ठ शेतकरी या सन्मानाने पुरस्कृत केले. ह्या कार्यक्रमानंतरच श्रीलंकेच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती सिरीमावो भंडारनायके यांनी राजभवनात त्यांची भेट घेऊन कृषिक्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांच्या इतर शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांबद्दल माजी पंतप्रधान राजीव गांधी, तसेच पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांना सोनेरी पदके देऊन गौरविले होते. या थोर व्यक्तीचे सन १९९५ साली वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले.
सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मरण करणे आवश्यक आहे. स्वतंत्र भारताचे ते पहिले गृहमंत्री होते. निजामाच्या जुलमी राजवटीपासून मराठवाडा मुक्त करण्यात सरदार पटेल यांचा सिंहाचा वाटा आहे. वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरात राज्यात नाडीयाद येथे त्यांच्या मामाच्या गावी झाला. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली. वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी विविध संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात.
मुक्तीसंग्रामात महिलांचा सहभाग -
या मुक्तीलढ्यात स्त्रियांचा सहभाग महत्वाचा नसले तरी उल्लेखनीय आहे. त्यांनी ग्रंथालय चालविणे, राजकीय प्रचारातील पत्रके वाटणे, गणपती मेळ्यात भाग घेणे, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेणे, चळवळीतील कार्यकर्त्यांना अन्न पुरविणे, चळवळीतील कार्यकर्त्यांची गृहिणी म्हणून घर सांभाळणे इत्यादी कामे केलेली दिसून येतात. पहिल्या कालखंडातील महिलांचा सहभाग हा सामाजिक व संस्कृती स्वरूपाचा होता. ज्या महिलांनी सहभाग नोंदवला त्यात आशाताई वाघमारे, सुशीलाताई दिवाण, पानकुंवर कोटेचा, सुलोचनाबाई बोधनकर, कावेरीबाई, गोदावरीबाई, लताबाई, उषा पांगुरीबाई, गिताबाई चारठाणकर, प्रतिभाताई वैशंपायन, दगडाबाई शेळके, तारा परांजपे, करुणाबाई चौधरी, शकुंतला साळे इत्यादी महिलांचा सहभाग होता.
जमीन मिळविण्यासाठी लढा -
निजामाच्या जहागीरदार, जमीनदार आणि सरंजामशाही व्यवस्थेविरुद्ध १९४६ साली तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यातील चितल्ल्या ऐलम्मा या दलित महिलेने चळवळ सुरू केली. जमीनदाराकडून आपली अनधिकृतपणे बळकावली जाणारी जमीन वाचवण्याकरिता तिने जमीनदारांविरुद्ध आंदोलनाची सुरवात केली. या आंदोलनास आंध्रमहासभा नावाच्या तत्कालीन भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मदत होती. १९४६ ते १९५१ या काळात झालेले हे सशस्त्र आंदोलन वेट्टी चेकिरि उद्यमम नावाने ओळखले जाते. हे आंदोलन कर्नाटकच्या बिदर आणि वरंगल मिळून एकूण चार हजार खेड्यांत पसरले.
आर्य समाज - हैदराबादच्या मुक्तीलढ्यात आर्य समाजाने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. केशवराव कोरटकर यांनी हैदराबाद येथे आर्य समाजाची स्थापना केली. १९०४-२१ या काळात ते आर्य समाजाचे अध्यक्ष होते. प्रारंभीच्या काळात हैदराबाद संस्थानामध्ये जनतेत जागृती निर्माण करण्याचे काम केशवराव कोरटकर व वामनराव नाईक यांनी केले. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणणे हे आर्य समाजाचे मूळ कार्य होते. इ. स. १० एप्रिल १८७५ मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणांसाठी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. त्यात पंडित भगवती प्रसाद, कुंदन प्रसाद, बन्सीलाल तिवारी, बाबू गणेशसिंह वर्मा, माणिक प्रसाद, गोकुळ प्रसाद इत्यादींचा सहभाग होता. इस. १८९२ मध्ये आर्य समाजाची शाखा हैदराबाद येथे स्थलांतरीत झाली. नंतर मराठवाड्यात औरंगाबाद ,लातूर, उस्मानाबाद, उदगीर, बीड, अहमदनगर, हिंगोली, परभणी व जालना या ठिकाणी आर्य समाजाच्या शाखा स्थापन झाल्या. १९३० पर्यंत हैदराबाद संस्थानातील प्रत्येक जिल्ह्यात आर्य समाजाच्या शाखा स्थापन करण्यात आल्या. आर्य समाजास डॉ.अघोरनाथ टोपाध्याय, गुलबर्ग्याचे केशवराव कोरटकर व पंडित श्रीपाद सातवळेकर यांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी राजकीय, सामाजिक, आणि शैक्षणिक जागृतीचे कार्य मोठ्या धडाडीने हाती घेतले. मातृभूमीवरील प्रेम आणि वैदिक धर्मावरील निष्ठा यासाठी हैद्राबाद विभागात आर्य धर्माची स्थापना करण्यात आली. अर्थात यास निजामाचा स्पष्ट विरोध होता. त्यांचे काही अनुयायी गरीब लोकांना लाचलुचपत दाखवून प्रसंगी जबरीने धर्मांतर करण्यास भाग पाडत होते. पण त्यावेळी आर्य समाज आपल्या वैदिक संदेशच्या पत्रकाद्वारे लोकांना जागे करण्याचे काम केले. पंडीत नरेंद्र, भाई बन्सीलाल आणि श्यामलाल यांनी संस्थानात खूप मोठे कार्य केले. अत्यंत निर्भयी आणि धाडसी असे शेषेराव वाघमारे यांनी शस्त्रसज्ज आर्य समाज संघटना उभी केली. नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील गणपतराव, गंगाराम आणि दत्तात्रय या तीन आर्य प्रचारकाना त्या लोकांनी दगडाने ठेचून मारले. असे अनेक शूरवीरांना त्यांनी आपल्या क्रूर विचाराने हत्या केली. हा लढा सर्वदूर पसरला. गावागावातील लोकं या अन्यायाच्या विरोधात उभी राहू लागली.
स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी लष्करी कारवाई करीत हैद्राबाद संस्थान भारतात विलीन केले तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर होय. पहिल्यांदा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्याची कल्पना पुढे आली. त्यातूनच मराठवाडा मुक्तीदिन समिती स्थापन झाली आणि हा दिवस मोठ्या उत्साहात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये साजरा केला जाऊ लागला. मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्या ज्ञात व अज्ञात स्वातंत्रवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या स्वातंत्रवीरांना मानाचा मुजरा. सर्व मराठवाडा वासीयांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दीक शुभेच्छा...
संकलन :- नागोराव सा. येवतीकर
पदवीधर शिक्षक, धर्माबाद जि. नांदेड
9423625769




No comments:
Post a Comment