किनवट : महसूल विभागातील काही रावसाहेब शहरात ऑफिस थाटून बसलेल्या ठिकाणी सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार यांनी सोमवारी (दि.२१ ) दुपारी अचानक भेट देऊन तिथे उपस्थित असलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना आपण लोकसेवक आहोत याची जाणीव ठेऊन आपापल्या सज्जावर उपस्थित राहून आपले कर्तव्य बजावावे अशी तंबी दिली.
येथील सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी पदाचा पदभार घेतल्यानंतर कीर्तिकिरण एच. पुजार (भाप्रसे ) यांनी किनवट व माहूर तालुक्यात अनेक ठिकाणी भेटी देऊन स्थितीचा जायजा घेतला. त्यानंतर एकेका बाबीवर सूक्ष्मपणे काम करायचं ठरविलं. त्यांच्या पाहणीत असं आढळून आलं की, महसूल मधील ग्राम पातळीवरचा महत्वपूर्ण घटक तलाठी असून यातील बहुतांशी रावसाहेब अर्थात तलाठी यांनी तीन चार जणात एक खोली भाड्याने घेऊन आपले सज्जा कार्यालय शहरात थाटले. त्यामुळे शेतकरी तथा गोर गरीबांसह सर्व नागरिक हे ७ / १२ (सात बारा ), अन्य दाखले व इतर आवश्यक कामासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांना शोधत किनवट शहरात येतात. रोजंदारी बडवून, पदरमोड करून त्यांना नाहक पायपीट करावी लागते.
कोरोनाच्या प्रादुर्भावात गावाकडील मंडळींना शहरात तलाठी मंडळीकडे हेलपाटे मारनं उचित नाही. तेव्हा त्यांनी अशोक स्तंभ ते रेल्वे स्टेशन मार्गावरील एका इमारतीत मनमानीपणे थाटलेल्या तलाठी कार्यालयाला सोमवारी (दि. २१ ) दुपारी आकस्मिक भेट दिली. त्यावेळी जलधरा, शिवणीचे मंडळ अधिकारी व तलाठी हजर होते. शहरात कुणीही आपलं कार्यालय न स्थापित करता सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आपापल्या सज्जावर कार्यक्षेत्रात उपस्थित राहून कामे करावीत, आपण लोकसेवक आहोत तेव्हा लोकांपर्यंत जाऊन सेवा द्यावी, यापुढे कुणी हयगय केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी तंबी दिली .





No comments:
Post a Comment