किनवट : किनवट व माहूर तालुक्यातील स्टेट बँकेच्या कार्यरत शाखेत पीककर्ज वाटपासाठी शेतक-यांची होत असलेली अडवणूक व बँकेकडून दिल्या जात असलेल्या अपमानास्पद वागणूकीच्या पार्श्वभुमिवर बँकांमधून होत असलेला गंभीर प्रकार वेळीच थांबवून नियोजनबद्धरित्या शेतक-यांना पीककर्ज वाटप करावे अन्यथा शेतक-यांसोबत स्टेट बँकेच्या शाखांना टाळे ठोकू असा निर्वाणीचा लेखी इशारा आ. भीमराव केराम यांनी स्टेट बँक प्रशासनाला दिला आहे.
भारतीय स्टेट बँकेचे सहाय्यक जनरल मँनेजर विभागीय कार्यालय नांदेड यांना दि.२२ सप्टेंबर रोजी आमदार भीमराव केराम यांनी लेखी पत्र देवून किनवट व माहूर तालुक्यातील मांडवी, इस्लापूर, सारखणी व माहूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखांमधून शेतकरी पीक कर्ज वाटपाबाबत शेतकऱ्यांना जाणीवपुर्वक त्रास होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सदर प्रकरणी शेतकऱ्यांकडून वारंवार प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे यापुर्वी देखील बँक प्रशासनाला अवगत केले असल्याचे नमूद करून मांडवी, इस्लापूर, सारखणी व माहूर येथील शाखा व्यवस्थापकांकडून शेतक-यांना अपमानास्पद वागणूकीबरोबरच अशक्यप्राय कागदपत्रांची यादी देवून वेठीस धरण्याचे काम सातत्याने सुरू असल्याचेही सांगीतले आहे.
वरील चारही ठिकाणच्या स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकांकडून सुरू असलेला हा प्रकार वेळीच थांबवून सर्व पात्र शेतक-यांना नियोजनबध्दरित्या पीक कर्ज वाटप करण्याच्या सूचना कराव्यात अन्यथा वरील चारही ठिकाणच्या संबंधित शाखांना शेतक-यांसोबत टाळे ठोकू असा खणखणीत इशारा आमदार भीमराव केराम यांनी सहाय्यक जनरल मँनेजर स्टेट बँक ऑफ इंडीया, विभागीय कार्यालय नांदेड यांना लेखी पत्राद्वारे दिला आहे.




No comments:
Post a Comment