नागरिकांच्या तक्रारी तालुकास्‍तरावर स्विकारण्‍यात येणार; जिल्‍हा परिषदेचा सेवा उपक्रम -मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची माहिती - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, October 30, 2020

नागरिकांच्या तक्रारी तालुकास्‍तरावर स्विकारण्‍यात येणार; जिल्‍हा परिषदेचा सेवा उपक्रम -मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची माहिती




 नांदेड : गावस्‍तरावरील योजना, पेंशन, विविध विकास कामासंदर्भात नागरीकांच्‍या अडचणी व तक्रारी अस‍तात. या अडचणींसाठी अर्जदार संबंधित विभागास तक्रारी देत असतात. जिल्‍हा परिषद अंतर्गत विविध विषयाच्‍या नागरीकांच्‍या तक्रारी असतात. या तक्रारींचे तालुकास्‍तरावर निवारण करण्‍यासाठी आता जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने सेवा उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती जिल्‍हा परिषदेच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.सोमवार दिनांक 26 ऑक्‍टोबर रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या कॉन्‍फरन्‍स हॉलमध्‍ये त्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली सर्व खाते प्रमुखांची बैठक घेण्‍यात आली, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्‍हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्‍यासह जिल्‍हा परिषदेतील सर्व विभागांचे खाते प्रमुखांची उपस्थिती होती.


     पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, ग्राम विकासाच्‍या विविध योजनांसह पंचायत समिती, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उपक्रेंद्र, पशु वैद्यकीय रुग्‍णालय, शाळा, अंगणवाडी, ग्राम पंचायत आदींना जिल्‍हा परिषदेतील खाते प्रमुख दर गुरुवारी क्षेत्रभेटी देवून विविध कामांची पाहणी करणार आहेत. जिल्‍हा परिषदेतील खाते प्रमुखांना तालुका समन्‍वय अधिकारी म्‍हणून एका तालुक्याची जबाबदारी देण्‍यात आली आहे. हे अधिकारी क्षेत्रभेटी दरम्‍यान दुपारी बारा ते एक वाजे दरम्‍यान पंचायत समितीमध्‍ये बसून राहणार आहेत. यावेळी अधिकारी, कर्मचारी व नागरीकांच्‍या तक्रारी असतील तर त्‍यांचे तक्रार अर्ज यावेळेत स्विकारल्‍या जातील. स्विकारलेल्‍या तक्रारी संबंधित विभागाकडे देवून त्‍या निकाली काढल्‍या जाणार आहेत. काही तक्रारींवर आवश्‍यकता असल्‍यास पंचायत समितीस्‍तरावरच सुनावणी घेतली जाईल. जर त्‍यांचे तालुकास्‍तरावर समाधान झाले नसेल तर ते जिल्‍हा परिषदमध्‍ये संबंधित अधिकारी किंवा वरिष्‍ठ अधिकारी यांची भेट घेऊ शकतात. परंतू यात कर्मचा-यांनी त्‍यांच्‍या बदली संदर्भात अर्ज देवू नयेत असे सुचित करण्‍यात आले आहे.


     तक्रारदाराची गैरसोय टाळण्‍यासाठी सेवा उपक्रम नावाने हा अभिनव उपक्रम जिल्‍हा परिषदेमार्फत सुरु करण्‍यात येत असून भविष्‍यकाळात व्‍हॉटसअॅपवरही नागरीकांच्‍या तक्रारी नोंदवून घेण्‍यात येणार आहेत. व्‍हॉटसअॅपवर आलेल्‍या तक्रारी संबंधित विभागाला पाठवून त्‍यावर कार्यवाही करुन प्रकरणे निकाली काढण्‍यात येतील असेही त्‍या म्‍हणाल्‍या. याप्रसंगी विविध विभागांच्‍या कामकाजा विषयी आढावा घेतला.


*असा असेल सेवा उपक्रम*

दर गुरुवारी जिल्‍हा परिषदेतील खाते प्रमुख यांना तालुका समन्‍वयक अधिकारी म्‍हणून नेमुन देण्‍यात आलेल्‍या तालुक्‍यात ते क्षेत्रभेटी करतील. तसेच पंचायत समितीमध्‍ये दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत जिल्‍हा परिषदेच्‍या सेवा उपक्रमातंर्गत ते नागरीकांच्‍या तक्रारी स्विकारतील. आवश्‍यक असले त्‍या प्रकरणात सुनावणी देखील घेवून प्रकरण निकाली काढले जाणार आहे.


*तालुका समन्‍वयक अधिकारी*

नांदेड जिल्‍हा परिषदे अंतर्गत तालुकास्‍तरावरील विकास कामांच्‍या पाठपुराव्‍यासाठी मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी तालुका समन्‍वयक अधिकारी यांच्‍या नेमणुका केल्‍या आहेत. यात अर्धापूर तालुक्‍यासाठी मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी आर.टी. कोलगणे, कंधार- दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता व्‍ही.बी. गहेरवार, हिमायतनगर- उत्‍तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ए.डी. चौधरी, मुखेड- ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. बारगळ, हदगाव- जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, उमरी- मग्रारोहयोचे उप जिल्‍हा कार्यक्रम समन्‍वयक व्‍ही.आर. पाटील, किनवट- पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डी.यू. इंगोले, लोहा- जिल्‍हा कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, भोकर– जिल्‍हा पशू संवर्धन अधिकारी डॉ.भूपेंद्र बोधनकर, धर्माबाद- जिल्‍हा समाजकल्‍याण अधिकारी तेजस माळवदकर, नायगाव- जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एम.जी. गुंडरे, मुदखेड- प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माहूर- माध्‍यमिक शिक्षणाधिकारी बी.आर.कुंडगीर, देगलूर- महिला व बाल कल्‍याण विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी एस.व्‍ही. शिंगणे, बिलोली- मग्रारोहयोचे सहाय्यक गट विकास अधिकारी एस.व्‍ही. गोरे तर नांदेड तालुक्‍यासाठी तालुका समन्‍वयक अधिकारी म्‍हणून सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे राहणार आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News