पोलिसांनी दिली कोलाम पाड्यातील आदिमांना मायेची ऊब ; फराळ व ब्लँकेट देऊन केली दिवाळी साजरी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, November 21, 2020

पोलिसांनी दिली कोलाम पाड्यातील आदिमांना मायेची ऊब ; फराळ व ब्लँकेट देऊन केली दिवाळी साजरी

 



किनवट (नांदेड) : डोंगराच्या पायथ्यावर बांबूच्या तट्यांचा आडोसा बनवून राहणाऱ्या कोलामपोड येथील आदिम कोलाम जमातीच्या कुटुंबीयांना फराळ व ब्लँकेट भेट देऊन किनवट पोलिसांनी मायेची ऊब देऊन आदिवासी पाड्यात दिवाळी साजरी केली.


          याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबाडी ग्राम पंचायती अंतर्गत येणाऱ्या शिवराम खेडा आदिवासी वस्तीतील चौदा कोलाम आदिम जमातीची कुटुंबं तिथून दोन किलोमीटर अंतरावर डोंगर पायथ्याच्या  कपारीत बांबूच्या तट्यांच्या भिंती करून वर टीन पत्राचा आधार देऊन बनववलेल्या झोपड्यात  वास्तव्य करतात. जायला ना रस्ता, ना गावात रात्रीची वीज. अशाही अवस्थेत वन उपज व लगतच्या वनजमिनीवर तेआपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. 


            

                कोलामगुडा येथे त्यांच्या सोबत यावर्षीची दिवाळी साजरी करायची उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांची संकल्पना. येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कंत्राटदार अजय नेम्माणीवार यांनी प्रत्येक कुटुंबाकरिता ब्लँकेट आणि पोलीस स्टेशन किनवटच्या वतीने पोलीस निरीक्षक मारुती थोरात यांनी प्रत्येक कुटुंबासाठी फराळाची व्यवस्था केली. 


         अंबाडीतांडा नंतर रेल्वेमार्गापर्यंत गाडी जाते. लोहमार्ग ओलांडून शिवराम खेडा. तेथील पारंपारिक मोरपिसांचा टोप घातलेल्या घुसाडी नृत्य संघाने स्वागत करून वाजतगाजत गावाबाहेरच्या वाटेपर्यंत सोडलं. त्यानंतर पुन्हा लोहमार्ग पायवाटने जाऊन तो ओलांडून जंगलवाटेनं दीड किमी अंतर चालून गेल्यानंतर कोलामपोड येतं. डोंगराच्या पायथ्यावर असलेल्या त्या पाड्यात आल्याशिवाय झोपड्या दिसत नाहीत. ग्राम पंचायतीनं एक उंच हायमास लाईटचा पोल उभारला ; परंतु रात्री अंधारच. 


एकेकाळी नक्षलवादी विजयकुमार येथे यायचा असं लक्षीमबाई सांगतात. परंतु यावर्षीच्या दिवाळीच्या दिवशी मात्र त्यांच्या वस्तीत चक्क पोलिस आले. तेही  सर्वांशी सुसंवाद साधून आपल्या अडीअडचणी धाडसानं पोलीस बांधवांकडे  भाऊ म्हणून कळवाव्यात अशी विनंती करीत. नुसतीच बोलभाषण नाही त्यांच्यासाठी दिवाळीचा फराळ व थंडीपासून बचावासाठी उबदार दर्जेदार ब्लँकेट. 


             याप्रसंगी उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, कंत्राटदार तथा सामाजिक कार्यकर्ते अजय नेम्माणीवार, पोलिस निरिक्षक मारोती थोरात यांनी मार्गदर्शन केले. प्रा. डाॅ. सुनील व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले व उत्तम कानिंदे यांनी आभार मानले.


                  यावेळी अंबाडी तांडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रेमसिंग जाधव, नागोराव आत्राम, गुलाब मडावी, लक्ष्मण कोडापे, रामा टेकाम आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एएसआय चाँद, जमादार पांडुरंग बोंडलेवाड, पांढरे, पोलीस कर्मचारी गजानन चौधरी, संदुपटलेवाड, कागणे, सिद्धीकी, परमेश्वर गाडेकर, रापतवार, आत्राम, कनाके, बोधमवाड, सुनील कोलबुधे, राजू पाटोदे, ज्ञानबा लोकरे, कुऱ्हे, संदीप वानखेडे, सुरेश माने, नागनाथ जेठे, लक्ष्मण भालेराव, गंगाराम कनकावार आदींनी पुढाकार घेतला. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News