किनवट : बांबुच्या वस्तू तयार करून कुटूंबाचा उदर निर्वाह करणाऱ्या आदिम कोलाम जमातीच्या कष्टकरी हिरकण्यांच्या श्रमांचं कौतुक करून त्यांना उभारी देण्यासाठी गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्रीताई हेमंत पाटील पानझडीने बोडक्या झालेल्या परंतु फळसफुलांनी नटलेल्या डोंगरावरील अतिदुर्गम काजीपोडावर तळपत्या उन्हात पोहचल्या, अन् आमच्या कष्टाची कुणीतरी दखल घेतय याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं.
रविवार (दि. १४ ) किनवट मुख्यालयापासून उत्तरेस ५० किमी अंतरावर काजीपोड ही आदिम कोलाम जमातीची वस्ती आहे. अंबाडीघाट मार्गे १६ किलीमीटर जंगलझाडीतूनच वळणा-वळणाच्या रस्त्याने तिथे पोहचता येत. जेमतेम २८ - ३० उंबऱ्याचा पाडा. १०० टक्के आदिवासी. सकाळी सकाळी शिळं- पाकं जे असल ते खाऊन कष्टकरी महिला पोडाभोवतालच्या जंगलात जायचं, तिथे मोठं मोठे बांबू शोधायचे, जवळच्या धारदार कोयत्यानं तोडायचे, बारीक-सारीक सर्व फांद्या तोडून मधला लांब लचक बांबू डोक्यावर घेऊन घरी यायचं, त्याला मधोमद चिरून एक दीड इंचाची बदे पट्ट्या काढायच्या, अन् मग त्यापासून डाली, टोपली, सुपं, दुरड्या तयार करायच्या नजिकच्या बाजारात विकायच्या, मिळालेल्या पैशातून बाजारातून दाळ, ज्वारी, चटणी, मीठ आणायचं, दळून, निसून मग रांदून कुटूंबाला जगवायचं. हा इथल्या महिलांचा नित्य उपक्रम.
शहरातल्या पगारवाल्या महिलेची दरमहा मिळालेल्या आवकेची नोंद होते. कमवती म्हणून तिचं कोड कौतुक होतचं. एखादी जास्त चर्चेत आली तर मग तिच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड, परंतु अविरतपणे आपापल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिनरात, थंडीत,पावसापाण्यात, उन्हातान्हात , राब- राब राबणाऱ्या या कष्टकरी आदिवासी महिलांचं काय ? का घेऊ नये त्यांच्या कष्टाची दखल ? का करू नये त्यांच्या कुटूंबाप्रती असलेल्या समर्पणाचं कौतुक ? म्हणूनच तर अशा हिरकण्या शोधून त्यांची सुख, दुःख जाणून, त्यांच्या समस्या जाणून,त्यांच्या अपार मेहनतीची दखल घेऊन , त्यांना गोंजारून, त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्रीताई हेमंत पाटील थेट पोहचल्या कोलामांच्या वस्तीत. नांदेड जिल्ह्यातील एकमेव आदिवासी डोंगरी किनवट तालुक्यातील काजीपोड ही अनुसूचित जमाती मधील आदिम कोलाम जमातींची वस्ती.
ताईचं आदिवासी ढेमसा नृत्यांनी त्यांनी स्वागत केलं. पारंपारिक नृत्यावर सर्वांनी फेर धरला. एवढ्या रखरखत्या उन्हात आमच्यासाठी काहीतरी करावं, या उद्देशानं कुणीतरी आमचं म्हणून येतय, याचच या श्रमकरी महिलांना अप्रूप वाटतं. पळसफुलांनी बहरलेल्या 'वसंता'त खासदार 'हेमंता'ची राजश्री येऊन आशा पल्लवीत करते, याचं समाधान या आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतानाचं चित्र आज पाहायला मिळालं.





No comments:
Post a Comment