मुंबई, दि. 24 , to : सततचा दुष्काळ, अतिवृष्टी, बोंडअळी, किड आणि आता झालेली गारपीट यामुळे त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना एका रुपयाची सुद्धा मदत न करणाऱ्या ठाकरे सरकारने वाईन उत्पादकांवर मात्र प्रोत्साहनाच्या नावाखाली तब्बल चाळीस कोटी रुपयांची उधळण केली आहे, त्यामुळे 'वाईन उत्पादकांच्या बाबतीत उदार पण शेतकऱ्यांच्या बाबतीत गद्दार' असे हे ठाकरे सरकार, अशी टीका मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याचे कारण पुढे करून मागील वर्षभरात शेतकऱ्यांना व शेती संलग्न व्यवसायांना एका नव्या रुपयाची सुद्धा मदत न करणाऱ्या ठाकरे सरकारने अर्थपूर्ण संवाद साधत काही विशिष्ट लोकांची मर्जी सांभाळण्याचे काम केले आहे. कोरोनामुळे अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर मागील वर्षी मे, जून व जुलै या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व खराब बियाण्यांमुळे दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ आली, त्यानंतर अचानक काही भागात पाऊस न पडल्यामुळे कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले, त्यातही कापसावर आलेली बोंडअळी, तुरीला लागलेली कीड, कांदा व द्राक्ष उत्पादकांना सहन करावा लागलेला प्रचंड आर्थिक तोटा व कसेबसे पुन्हा शेती उभी करून चार पैसे मिळतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्याना मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक संकट ओढावले व त्यामुळे दुर्दैवाने मागील पंधरा महिन्यांच्या काळात साडेचार हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशा परिस्थितीत ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची आवश्यकता होती. परंतु प्रत्येक वेळी सरकारकडे पैसे नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. या संदर्भात मी स्वतः व भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभेच्या सभाग्रहात व सभाग्रहाच्या बाहेर आवाज उठविण्यात आला व अनेक वेळा आंदोलन करण्यात आले. परंतु याची कोणतीही तमा न बाळगता ठाकरे सरकारने मात्र अगोदर दारू विक्रेत्यांच्या वार्षिक फी व करात सवलत दिली आणि आता तर दारू व वाईन उत्पादनातून करोडो रुपये कमावणाऱ्या वाईन उत्पादकांना 2017 पासून ची प्रोत्साहनपर थकबाकी म्हणून चाळीस कोटी रुपयांची मदत केली, यातून या सरकारची शेतकऱ्यांप्रतीची मानसिकता लक्षात येते, त्यामुळे आगामी काळात ठाकरे सरकारला याची किंमत नक्कीच मोजावी लागेल, असा इशारा सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.




No comments:
Post a Comment