तथागत बुद्ध, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव कवी गायक व शाहीर यांच्यावर असल्यामुळे त्यांच्या कल्पक बुद्धीतून समाजाला प्रबुद्ध बनवण्यासाठी, जागृत करण्यासाठी प्रबोधन चळवळीत यांनी या गीताचा वापर केला. समाजातील अंधश्रद्धा नाहीशी करण्यासाठी अज्ञानरूपी अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी मानवाच्या कल्याणासाठी व अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची निकड समजून प्रबोधन करण्याचे काम प्रत्यक्ष समाजामध्ये जाऊन कवी, गीतकार, गायक, शाहीर, जलसाकार, कीर्तनकार व कला पथकातील कलावंतांनी केले. त्यातील आंबेडकरी चळवळीतील अग्रणी कवी गायक गीतकार संगीतकाराची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, राजानंद गडपायले, शाहीर नागोराव पाटणकर, लक्ष्मण राजगुरू, दीनबंधू, शाहीर आत्माराम साळवे, विठ्ठल उमप, शाहीर साबळे, अशा कितीतरी कवी गीतकार व शाहिरांनी आपल्या लेखणीचा प्रबोधनासाठी खेडोपाडी जाऊन झोपलेल्या लोकांना जागृत केले. त्यांच्या प्रबोधन कार्याबरोबरच सर्वसामान्य माणूस जगताना दिसतो.
बुद्ध फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सक्रिय व्यक्तिमत्व महेंद्र नरवाडे यांच्या अथक मेहनतीचा आणि उद्दात निष्ठेचा परिमळ म्हणजे 'प्रबोधन चळवळीतील शिलेदार' हा ग्रंथ. पुरोगामी महामानवाचा प्रबोधन सिद्धांत साध्यासोप्या प्रवाही भाषेत आपल्या गायन कलेद्वारे गाव स्तरापर्यंत घेऊन जाणारे ध्येयवेडे कलावंत हे त्या त्या काळातील समाजाचे जागलेच. व्यवस्था परिवर्तन हे पुरोगामी महामानवाच्या आयुष्याचे उद्दिष्ट. प्रस्तुत उद्दिष्टाला जीवनध्येय बनवून त्यांनी आपले प्रफुल्लित तारुण्य वेचले. गायक कलावंतांनी ही याच पथावरून अविश्रांत प्रवास करत आपले देह चंदनासारखे झिजवले. सत्यशोधकीय आणि आंबेडकरी जलसे हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण होय.
नांदेड जिल्ह्यातील सळसळत्या अशा प्रतिभावंत परंतु दुर्लक्षित हिऱ्यांचा शोध घेऊन त्यांना ग्रांथिक मंच उपलब्ध करून दिला आहे. हे केवळ महानच नाही तर ते एक ऐतिहासिक कार्य आहे. अशा शब्दात प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. आनंद इंजेगावकर यांनी या पुस्तकाची पाठराखण करताना लिहिल्याने हे पुस्तक विकत घेऊन वाचावं असंच सर्वांना आवर्जून वाटेल.
'प्रबोधन चळवळीतील शिलेदार' हे महेंद्र नरवाडे यांचं चौथ पुस्तक. तथागत गौतम सम्यक सम्बुद्ध यांनी ल्या जीवन संघर्षात्यातून जे ज्ञान प्राप्त केले, त्यातून त्यांनी जगाला दिलेला धम्म. त्या धम्माचे तत्वज्ञान, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे त्यांच्या जीवन संघर्षातून तयार झालेले सत्यशोधक तत्वज्ञान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षातून त्यांनी मिळवलेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी लिहिलेले संविधान व भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हे मानवी मूल्य व तत्वज्ञान हे समाजाच्या उत्थानासाठी, जनजागृतीसाठी आवश्यक असलेले ज्ञान भांडार आहे. रमाईने स्वतः खस्ता खाऊन महासुर्य बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली साथ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी क्रांतिसूर्य जोतिराव फुले यांना दिलेली साथ यातील प्रेरक विचार संत साहित्यामध्ये असलेले विपुल ज्ञान-विज्ञान संत कबीर यांच्या दोह्यामध्ये, संत तुकारामांच्या अभंगांमध्ये आपणास पाहावयास मिळते. त्याचबरोबर विचारवंताच्या साहित्यात कवींच्या कवनात, गीतकारांच्या - शाहिरांच्या गाण्यात पाहायला मिळते. हे ज्ञान कशासाठी तर प्रबोधनासाठी आहे.
लेखक जे लिहितात ते माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी घडवून आणणारी नवनिर्मितीची प्रक्रिया म्हणजेच प्रबोधन. जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता असते. त्यामुळे मानवतावादाला चालना मिळते. नवे विचार नव्या संकल्पना प्रबोधनामुळे समाजापर्यंत पोचतात. त्यामुळे अपेक्षित परिवर्तन होते. शाहीर नागोराव पाटणकर, आत्माराम साळवे, प्रभाकर धाकडे, विठ्ठल उमप, शाहीर साबळे, प्रभाकर पोखरीकर यांचे प्रबोधन चळवळीतील महत्त्वाचे स्थान आहे. या प्रबोधनकारांनी आपल्या प्रभावीगीत गायनातून उपरोक्त महापुरुषाचे विचार व त्यांचे तत्वज्ञान समाज मनामध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रबोधन कार्याबरोबरच नांदेड जिल्ह्यातील गायक, गीतकार, संगीतकार, शाहीर व प्रबोधनकार यांनी प्रबोधन चळवळीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. 'प्रबोधन चळवळीतील शिलेदार' या पुस्तकाच्या रूपाने त्यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान, त्यांचा जीवन परिचय, त्यांची प्रेरणा, प्रभाव म्हणून पसंत गीते, कलाकारांचा सहवास, प्रभावीपणे सादर केलेले कार्यक्रम, त्यांचा झालेला सन्मान व त्यांच्या प्रबोधनातून दिलेला संदेश हा प्रबोधन चळवळीला निश्चितच गती देणारा आहे. आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवणारे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या प्रबोधन कार्याबरोबरच काही नामवंत कवी, गायक, गीतकार, संगीतकार व शाहिरांनी ही चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. त्यांचे प्रबोधन कार्य समाजासमोर उजागर करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न लेखक या पुस्तकातून करतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली सर्व आंदोलने मानव मुक्तीसाठी होती. भारतीय संविधान या देशाच्या पवित्र अशा राष्ट्रीय ग्रंथाच्या माध्यमातून सर्वांना हक्क अधिकार मिळाले. ज्या काळात शिक्षणाची दारे दलित वंचित लोकांसाठी खुली नव्हते त्या काळात शैक्षणिक क्रांति महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून जगात विद्वान म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. धम्मक्रांती करुन विश्वशांतीचा तथागत बुद्धाच्या धम्म या देशात बहुजनांना त्याने दिला. त्यामुळे आज नव्याने वैज्ञानिक दृष्टिकोनातून सामान्य माणूस प्रगतीच्या पथाने प्रवास करताना दिसतो. हजारो वर्षाचा अंधार नाहीसा करून लखलखाट प्रकाशाच्या झोतात हा सामान्य माणूस जाताना दिसतो. तो फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने.
'प्रबोधन चळवळीतील शिलेदार' या पुस्तकात लेखक महेंद्र नरवाडे यांनी स्वतः चळवळीमध्ये स्वतःला वाहून घेतलेल्यांची माहिती लेख स्वरूपात उपलब्ध करून प्रबोधनकारांना नवी दिशा देण्याचे कार्य केले आहे. नरवाडे हे सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी या पुस्तकात आपल्या संपूर्ण आयुष्यभर जलसाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन क्रांतीसूर्याच्या विचारांची पेरणी करणारे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या कार्याची ओळख करून दिली. समाजात निर्माण होणारी दुफळी, रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार होत आहेत. अशा वेळी वामनदादांनी त्यासंदर्भात अनेक गीते लिहिली. बाबासाहेबांच्या विचारांची माणसं येथे निर्माण होऊन समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय हे मूल्य प्रस्थापित करावेत म्हणून प्रामाणिक प्रयत्न केला, त्याची मांडणी केली.
या पुस्तकाची प्रेरणादायी प्रस्तावना बळीराम पाटील महाविद्यालय, किनवटचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी लिहिली आहे. ८८ पानाच्या या पुस्तकाची बांधणी मजबूत आहे. शिवराज बामणीकर या कला शिक्षकांनी मुखपृष्ठ सुंदर तयार केलं. आपल्या आदर्शांच्या प्रतिमा आणि डफावर हात असलेला शाहीर मुखपृष्ठावर रेखाटून ह्या पुस्तकाचं आकर्षण वाढविलं आहे. उत्तम कानिंदे व रमेश मुनेश्वर यांनी सुबक मांडणी केली आहे. डॉ. अशोक गायकवाड यांच्या कौशल्य प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित करून चळवळीस योगदान दिलं आहे.
'प्रबोधन चळवळीतील शिलेदार ' हे पुस्तक वैचारिक रुपाने वाचकांच्या हाती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकात नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी, गायक व भीशाहीर जसे काशीनाथ भवरे, माधवराव मुनेश्वर, सदाशिव वाठोरे, बळीराम हनवते, क्षिरसागर हटकर, नरेंद्र दोराटे, चंद्रकांत धोटे, संतोष राऊत, कैलास राऊत, माधव वाढवे, बाबुराव पाटील, रामदास पारडे, दीपक ओंकार, डॉ. विलासराज भद्रे, संगीतकार सदाशिव गच्चे, श्रीपती ढोले, सुरेश पाटील, प्रज्ञाचक्षू अनिल उमरे, गायिका विशाखा राऊत, मंगला कावळे, आम्रपाली वाठोरे, त्रिरत्नकुमार भवरे, छोटाराजा सिद्धार्थ मुनेश्वर, गौतम शेळके अशा पंचवीस कलावंताची ओळख नव्या पिढीला व्हावी म्हणून हा सारा प्रपंच लेखक करताना दिसतात. तसे पहाता नांदेड जिल्ह्यात खुप नामवंत कलावंत आहेत. सर्वच कलावंतांना प्रत्यक्ष भेटून जाणण्याची मर्यादा असल्याने अनेकांना या पुस्तकात संधी मिळाली नाही. अशा पुस्तकांचे काही भाग सुद्धा पुढील काळात लेखकाने काढावेत असे मला वाटते. मान्यवरांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांचा गौरव आणि दीर्घ काळ ठरणारा इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून राहणार आहे म्हणून अशा या चळवळीतील पुस्तकाला अनेक शुभेच्छा देतो.
*पुस्तकाचे नाव : प्रबोधन चळवळीतील शिलेदार*
*लेखक : महेंद्र नरवाडे*
प्रकाशक : कौशल्य प्रकाशन, औरंगाबाद
मूल्य - रुपये 90
*पुस्तक परिचय : रमेश मुनेश्वर*
स्तंभलेखक, किनवट जि. नांदेड
संवाद - ७५८८४२४७३५




No comments:
Post a Comment