किनवट : किनवटकरांनी प्रशासनाच्या सर्व उपक्रमांना सहकार्य केलेले आहे. सध्याला कोरोनाची तीव्रता पाहता शासनाने दिवसा 144 कलम व रात्रीची संचारबंदी लागू केली असल्याने पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. तेव्हा स्वतःला, गावाला व समाजाला वाचविण्यासाठी उत्साहाच्या भरात न जाता आगामी सर्व सण-उत्सव आपण आपापल्या घरातच साजरे करावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण पूजार,भाप्रसे यांनी केले.
येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात गुरुवार (दि. 8 एप्रिल) रोजी सकाळी 11 वाजता शांतता समितीची बैठक आयोजित केली होती, यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते.
तहसिलदार उत्तम कागणे यांनी प्रास्ताविक केले. उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांनी सध्याची स्थिती पाहता सर्वांनी कायद्याचं पालन करुन सुरक्षित रहावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष हाजी इसाखान सरदारखान, अरुण आळणे, साजिद खान, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, राष्ट्रवादीचे वैजनाथ करपुडे पाटील, भाजपाचे शिवराज राघू मामा, प्रहारचे शहराध्यक्ष अभय नगराळे, अर्षद खान, ऍड. सम्राट सर्पे यांनी मनोगत व्यक्त केले.
कोरोनाच्या वैश्विक प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या (एसओपी ) नियमावलीचे पालन करूनच गतवर्षी प्रमाणेच याही वर्षी महात्मा फुले जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुडी पाडवा, रामनवमी, रमजान व इतर आगामी सण साधेपणाने घरच्या घरीच साजरे करावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले.
बैठकीस पोलीस निरीक्षक मारोती थोरात, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्माणीवार,के. मूर्ती, उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्माणीवार, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीपकेंद्रे,वंचितचे नेते सुरेश जाधव, मुफ्ती तनवीर, हाफिज शरफुदीन, हाजी हबीब आदिंसह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, पत्रकार व मौलाना उपस्थित होते असे तालुका मिडिया समन्वय अधिकारी उत्तम कानिंदे यांनी कळविले आहे.




No comments:
Post a Comment