किनवट : उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर येथे उभारलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लँटचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांचे हस्ते शुक्रवार (दि.16 ) रोजी रात्री करण्यात आले.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण पुजार, तहसिलदार उत्तम कागणे, प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. विकास जाधव, डॉ. मोहन गोणेवार, नियोजन अधिकारी साबरे, मेंडके उपस्थित होते.
कोरोना प्रादुर्भावाने बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर (डीसीएचसी) स्थापित केले आहे. येथील जोखमींच्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागते. 150 किमी अंतरावर असलेल्या जिल्हा मुख्यालयापासून ऑक्सिजन सिलेंडर मिळविणे मोठे कठीणाईचे होते. तेव्हा येथेच ऑक्सिजन सुलभपणे कसा उपलब्ध करता येईल, याकरिता आमदार भीमराव केराम यांनी जिल्हास्तरीय बैठकीत विचार मांडला. त्यावरून सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांनी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना 2020 -21 अंतर्गत 36 लक्ष रुपये उपलब्धतेबद्दल अवगत केले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या संमतीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या उपक्रमास तातडीने मान्यता दिली. निधी उपलब्धतेनंतर उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा (डीसीएचसी) येथे "ऑक्सिजन जनरेशन प्लँट " उभारले. शुक्रवार (दि.16 ) रोजी रात्री या प्लँटचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, माजी नगराध्यक्ष अनिल तिरमनवार, शेख रफीक, कंत्राटदार उत्तम पाटील, जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार भीमराव केराम व सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार पोहचले थेट कोविड वार्डात
बाधित रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठीच्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करून कोणतीही किट न घालता आमदार भीमराव केराम व सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर (डीसीएचसी) च्या कोविड वार्डात गेले. तेथील उपलब्ध सोयी सुविधांची त्यांनी पाहणी करून माहिती घेतली. रुग्णांशी संवाद साधला. कार्यरत वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी यांचेशी सुसंवाद साधला. जीवाची बाजी लावून सेवा करणाऱ्या या "कारोना योध्द्यांना " त्यांनी शाबासकीची थाप दिली. अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा दिली.
अविरत प्राणवायू उपलब्ध होणाऱ्या प्रकल्पाचे कार्यान्वयन केल्यानंतर कोविड वार्डात जाऊन बाधितांना धीर देण्याच्या धाडसाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.






No comments:
Post a Comment