किनवट (नांदेड ) : तालुक्यातील लोणी येथील निवृत्त डीवायएसपी दत्तात्र्यय भालेराव यांचे मंगळवार (दि.18 ) रोजी पहाटे रुबी हाॅस्पीटल पुणे येथे उपचार घेतांना निधन झाले. बुधवार (दि.19) रोजी सकाळी 8 वाजता लोणी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दत्तात्र्यय भालेराव यांचा जन्म चेरा ता. जळकोट जि. लातूर येथे झाला होता. त्यांचे दिवंगत भाऊ नारायण भालेराव हे कमी शिकलेले होते परंतु फार स्वाभिमानी, आंबेडकरवादी होते. सर्वांनी शिकले पाहिजे हा त्यांचा ध्यास असायचा, त्यावेळी स्वत:चे घर व समाज सुशिक्षीत झाला पाहिजे यावर त्यांनी विशेष लक्ष दिले होते. त्याच ध्यासातून दतात्र्यय भालेराव यांना त्यांनी चेरा येथील प्राथमिक शाळेत घातले, तिथून त्यांचे शिक्षण सुरू झाले.
दिवंगत नारायण भालेराव यांनी सामाजिक अन्याय सहन न करण्याच्या स्वाभिमानी वृतीमुळे चेरा हे गाव सोडण्याचा ५५ ते ६० वर्षांपूर्वी निर्णय घेतला. त्यांचे सर्व कुटूंबीय चंद्रपूर जिल्हा व आंध्र प्रदेश च्या सिमावर्ती गावात वस्ती करण्यासाठी गेले. तेथे जमिनी मिळवल्या. पण त्याकाळी त्यांना साधारण १५ वर्षे त्रास झाला. त्यांना अस्थिरतेचा कायम सामना करावा लागला. अशाही परिस्थितीत सुद्धा नारायणरावांनी भाऊ दतात्र्यय व शामराव यांचे शिक्षणात खंड पडू दिला नाही. दुर्लक्ष केले नाही. दतात्र्यय भालेराव यांना जांब येथील निती निकेतन विद्यालयात व तेथील बोर्डींग मधे प्रवेश दिला व दहावी चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दतात्र्यय भालेराव यांचे चंद्रपूर/नागपूर येथे पुढील शिक्षण झाले. यांचे शिक्षण सुरू असताना त्यांचे कुटुंब केकेझरी ता. जिवती जि.चंद्रपूर येथे तात्पुरते स्थिरावले. तेथेच शेती करत राहिले, तेथेच त्याच जमीनीत त्यांचे कष्टकरी वडील दिवंगत विठ्ठलराव भालेराव विसावले. त्यांची समाधी पण केकेझरीत आहे.
दतात्र्यय भालेराव यांचे शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली. यासाठी नारायणराव भालेराव जातीने लक्ष घालत होते. दतात्र्यय भालेराव यांना एसटी महामंडळात नोकरी मिळाली, पण त्यावर समाधान मानून ते स्वस्थ बसले नाहीत, अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते पी.एस.आय. झाले. केकेझरी येथील अश्चिखे त्यांचे कुटूंब लोणी ता. किनवट जि. नांदेड येथे स्थिरावले व सध्या ते येथे कायम वास्तव्यास आहे.
जीवनात नोकरीमुळे तसेच अस्थिरपणातसुद्धा दतात्र्यय भालेराव यांनी मुळ गाव चेरा व तेथील नातेवाईक , मित्रमंडळी व शाळा विसरली नाही. ते चेरा गावाच्या संपर्कात असायचे. शाळेला नेहमी सहकार्य करायचे. अशा परिस्थतीतही दतात्त्र्यय भालेराव यांनी त्यांच्या कुटूंबियांना शिक्षणापासून दूर होऊ दिले नाही. आज त्यांचे पुतणे, नातू , जावई, सून हे सर्व उच्चशिक्षीत आहेत, कोणी पीएचडी, प्राध्यापक , शिक्षक, डाॅक्टर, इंजिनीअर, राजकारणी , ड्रायव्हर असे अनेक प्रकारचे कामावर स्थिरावून आनंदी दिवस जगत आहेत. दतात्र्यय भालेराव हे पी.एस.आय. ते डि.वाय.एस.पी.असा नोकरीतील प्रवास करून नागपूर कामठी डिव्हीजन येथून सेवानिवृत झाले. त्यानंतर नांदेड येथे ते घर घेवून स्थिरावलेले होते. मुलगी पुजा ही पुणे येथे शिक्षण घेत असल्यामुळे तिच्याकडे ते नुकतेच गेले होते, तेथेच त्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांनी झुंज देवून कोरोनावर मात्त केली होती, पण पुढे शरीराने त्यांना साथ दिली नाही. त्यातच आज मंगळवार ( दि. 18 ) पहाटे 5 वाजता त्यांचे निधन झाले. सा. किनवट टुडेचे संपादक आनंद ना. भालेराव यांचे ते काका होत.




No comments:
Post a Comment