नांदेड, 21 : तणावमुक्ती, तंदुरुस्ती व मनशांतीसाठी योगा महत्वाचा असून प्रत्येक व्यक्तीने योग जीवनशैली अंगीकारावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने सोमवार दिनांक 21 जुन रोजी पहाटे साडेपाच वाजता ऑनलाईन योग साधनेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या ऑनलार्इन संवाद साधतांना बोलत होत्या. याप्रसंगी योगशिक्षक सिताराम सोनटक्के, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, क्रीडा शिक्षक प्रलोभ कुलकर्णी, जिल्हा स्काऊट संघटक दिगांबर करंडे, जिल्हा गाईड संघटक शिवकाशी तांडे यांची उपस्थिती होती. जिल्हा स्काऊट गाईड कार्यालयात ऑनलाईन योगासनाचे प्रात्यक्षिक कोवीडच्या नियमांचे पालन करुन करण्यात आले. यावेळी जिल्हयातील अनेकांनी याचा लाभ घेतला.
पुढे त्या म्हणाल्या, कोरोना विषाणूची साथ लक्षात घेता यावर्षी योग दिनाची थीम बी विथ योगा, बी अॅट होम म्हणजेच ‘‘योगासह राहा, घरी रहा’’ थीम अशी आहे. दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे घरीच राहून योगा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. आयुष्यात सकारात्मता व उर्जा टिकविण्यासाठी योग महत्वपूर्ण असून कुटूंबातील सर्व व्यक्तींनी दररोज योगा करावा, कारण योग हा व्यक्तीला दीर्घ आयुष्य देखील प्रदान करते असेही त्या म्हणाल्या.
यावेळी पद्मासन, उष्ट्रासन, सर्वांगासन, हलासन, वज्रासन, अर्ध मत्सेंन्द्रासन, अर्ध कटि वक्रासन, भूजंगासन, उत्कटासन, पश्चिमोत्तानासन,घुटना संचालन, पवन मुक्तासन, भद्रासन, ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, कपालभाती, प्राणायाम यासह विविध आसनाचा सराव करण्यात आला. यावेळी शालेय विद्यर्थ्यांनी योगासनाचे सादरीकरण केले. याप्रसंगी संगणक प्रोग्रामर काझी खियामोद्दीन, भागीरथी बच्चेवार, शोभा निलपत्रेवार, रमेश फुलारी, वंदना खोकले, साईनाथ ठाकुरवार व विद्यार्थी यांचा उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment