जगातील पहिले मानसशास्त्रज्ञ , वैज्ञानिक तथागत सम्यक सम्बुद्ध यांच्या जयंती निमित्त जेतवन बुद्ध विहार, सिद्धार्थनगर येथे आदीजन संचलित महाकवि वामनदादा कर्डक संगीत अकादमी प्रस्तुत "बुद्ध पहाट" या शास्त्रीय संगीताच्या भावरम्य अविष्काराने नटलेल्या बुद्ध गीतांचा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित "बुद्ध पहाट" या कार्यक्रमाची निर्मिती, संकल्पना निवेदन उत्तम कानिंदे यांचं होतं.
प्रज्ञाचक्षू गायक अनिल उमरे यांनी शिवमत भैरव रागातातील " त्रिशरणाची मंगल वाणी घुमते आमच्या कानी बुद्धं सरणं गच्छामी"... या वंदन गिताने कार्यक्रमाची सुरुवात करून "सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाले " या वामनदादांच्या गीताने रसिकांच्या टाळ्या मिळविल्या.
वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी हंसध्वनी रागातील "जाहली पहाट उठ शिंप सडा माऊले , दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले " हे प्रासंगिक पहाट गीत , तसेच कलावती रागातील "गौतमाचे चरणी फूल वाहिलेले, साकार झाले स्वप्न पाहिलेले" गाऊन श्रोत्यांना खिळवून ठेवले. उदयोन्मुख कवी , गायक रुपेश मुनेश्वर यांनी खमाज रागातील " बुद्ध पथाने चाल गड्या " व "जातो बुद्धाला शरण " हे मिश्र रागातील गीत गाईले.
संगीत विशारद गायीका आम्रपाली वाठोरे यांनी बैरागी रागातील " वैशाखी पुनवेला घडला ऐसा हा इतिहास, विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास" व "अमृतवाणी ही बुद्धाची एक देऊनी ध्यान , साधन्या या जन्मी निर्वाण" आणि प्रा. सुरेश पाटील यांच्या साथीने " बुद्ध विहारी जाऊ या' बुद्धाला वंदना गाऊ या " हे युगलगीत तयारीनिशी गाईले. एसबीआय बँक अधिकारी मधुकर उमरे यांनी " भोजन घ्या बुद्धदेवा" हे पद सादर केले.
कार्यक्रमाच्या शेवटी माणसांना जोडणाऱ्या तोडी रागातील " रथ समतेचा असा आणिला सांभाळूणी न्या हो " या गीताने भावपूर्ण सांगता झाली.
संगीत साथसंगत अनिल उमरे (कीबोर्ड), प्रशांत खाडे (तबला), साहेबराव वाढवे (ढोलकी) यांनी केली. रमेश मुनेश्वर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ली फॅशन मेन्स व वुमेन्स वेअरचे नाना भवरे, चांदोजी गायकवाड, वसंत सर्पे, ऍड. के. के. साबळे, देविदास वंजारे, विनोद कदम, अनमोल गायकवाड, प्रशांत शेरे , मारोती मुनेश्वर, निखिल कावळे, ऍड. सम्राट सर्पे , शिलवंत येरेकार आदींसह विशाखा महिला मंडळाच्या अध्यक्षा सूर्यकांता सर्पे यांचेसह सर्व महिलांनी परिश्रम घेतले. स्मृतिशेष जनाबाई दामोधर कानिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त खीरदान व विशाखा महिला मंडळांनी भोजनदान दिले. जगाला बुद्धाने दिलेला समता, स्वातंत्र्य व बंधुतेचा संदेश "बुद्ध पहाट" कार्यक्रमात प्रस्तृत झाल्याने रसिक खिळून बसले होते. हीच चर्चा सर्वत्र होती. ज्येष्ठ कार्यकर्ते राम भरणे यांचे हस्ते पंचरंगी धम्म धजारोहन झाले. माधव कावळे, यादव नगारे यांनी पुष्पपुजा केली. सुरेश पाटील यांनी धम्मधज गाथा व वंदना घेतली. प्रा. सुबोध सर्पे यांनी सूत्रसंचालन केले.




No comments:
Post a Comment