माहूर : येथे सोळा एप्रिल रोजी होणाऱ्या अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ ( महाराष्ट्र ) मराठवाडा विभाग आयोजित शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा गट शिक्षणाधिकारी रविंद्र जाधव यांनी दिली.
रेणुका देवी मंदिर परिसरातील सह्याद्रीच्या पायथ्याशी 'आनंद दत्त धाम' (वसमतकर महाराज यांचा आश्रम ) येथे होणाऱ्या एक दिवशीय शिक्षक साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी, कथाकथन, चित्रप्रदर्शन, कविसंमेलन, स्नेहभोजन असे विविध कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिक्षक साहित्यिकांचा सहभाग या संमेलनात राहणार आहे. जिल्ह्यातील शिक्षकांनी या संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन संमेलनाचे निमंत्रक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांनी केले आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.नांदेडच्या शिक्षणाधिकारी(प्राथमिक) डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी(माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर, अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ महाराष्ट्राचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष नटराज मोरे राहणार आहेत. तर विशेष उपस्थिती मध्ये तहसिलदार किशोर यादव, गट विकास अधिकारी सुरेश कांबळे, उप शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, ह.भ.प.सद्गुरु श्री.साईनाथ महाराज वसमतकर तथा बितनाळकर, गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष शेटकार, राजू मुधोळकर, सुधीर गुट्टे, संजय खडकेकर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी लेझीम-वाद्य वाजत मान्यवरांच्या उपस्थितीत 'ग्रंथदिंडी' निघेल. कार्यक्रमाच्या सुरवातीला सुरेश पाटील व प्रतिभा पाटील स्वागतगीत गातील तर "साहित्य गौरव गीत" 'भोला-मिलिंद' (गित-स्वर-संगत ) सादरीकरण करतील. आंतरराष्ट्रीय चित्रकार रणजीत वर्मा आणि प्रसिद्ध वारली चित्रकार मिलिंद जाधव यांचे चित्रप्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
सुप्रसिद्ध कथाकार तथा नांदेड जि.प.च्या समग्र शिक्षाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विलास ढवळे हे कथाकथनाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहे. तर कविसंमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध कवयित्री तथा शिक्षण विस्तार अधिकारी सुचिता खल्लाळ ह्या राहणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ शिक्षक कवीचे 'कविसंमेलन' होणार असल्याची माहिती संयोजक शेषराव पाटील आणि राजेंद्र चारोडे यांनी दिली.
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे श्याम राठोड (प्रमुख), दिगंबर जगताप, अरविंद जाधव, गौतम सावंत, अरुण धकाते, धनंजय गिऱ्हे (प्रमुख), महेश गोविंदवार, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, अविनाश शिंगणकर, रवी जाधव, प्रवीण वाघमारे, सचिन बटाले, बाबुराव माडगे(प्रमुख), के. डी कदम, भाग्यवान भवरे, मनोज बारसागडे, सागर चेक्के (प्रमुख), चैतन्य उबाळे, परमेश्वर कुसुमवाड , मिलिंद कंधारे, सुनील कांबळे, विजय घाटे, सुधीर जाधव (प्रमुख), क्रिष्णा माने, सुरेशकुमार शेरे, योगेश हेलगंड, विनोद सुरोशे, उत्तम कनिंदे, भोला सलाम, संजय खडकेकर, फाल्गुनी ढवळे, स्वप्नील खांडेकर, गोरख जगताप आदि विशेष परिश्रम घेत आहेत .
या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले धनंजय गुडसूरकर हे नामांकित लेखक असून त्यांची चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकांतून त्यांचे लिखाण प्रसिद्ध असून सातत्यपूर्ण लेखन करणाऱ्या गुडसूरकर यांचा बालसाहित्य, ललित लेखन, समीक्षा लेखन या प्रांतात वावर आहे. श्रमर्षी बाबा आमटे यांच्या कार्यावर 125 व्याख्याने देणाऱ्या गुडसूरकर यांचे साहित्य चळवळीत मोठे योगदान आहे. उदगीर येथील प्रबोधन साहित्य परिषदेचे ते संस्थापक अध्यक्ष असून या माध्यमातून ३० वर्षात त्यांनी साहित्यिक उपक्रम राबविले असून शिक्षक विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. कथाकथन, एकपात्री प्रयोग यामधून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे कार्यवाह राहिलेल्या गुडसूरकर यांचे ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात ही योगदान राहिले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते सदस्य आहेत.




No comments:
Post a Comment